मणिकर्णिका घाट - वाराणसीतील पवित्र तीर्थ

मणिकर्णिका घाटाचे अर्थात तीर्थाचे महत्व हे आहे की हे तीर्थ गंगा किनाऱ्याच्या मध्यभागी असून अर्धचंद्राकृती आहे व या तीर्थाच्या आसमंतात अनेक मंदिरे आहेत.

मणिकर्णिका घाट - वाराणसीतील पवित्र तीर्थ

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

भारतामध्ये जी स्थाने प्राचीन काळापासून पुण्यक्षेत्रे मानली गेली आहेत त्यापैकी एक स्थान म्हणजे वाराणसी. वाराणसी हे हिंदू धर्मीयांसाठी एक पवित्र स्थळ असून या ठिकाणी आल्यावर अनेक जन्मांचा उद्धार होतो असे मानले जाते. 

वाराणसी क्षेत्रात पाहण्यासारखी अनेक स्थळे आहेत व यापैकी एक प्रसिद्ध स्थळ म्हणजे मणिकर्णिका घाट. मणिकर्णिका घाटास मणिकर्णिका तीर्थ या नावाने सुद्धा ओळखले जाते व या तीर्थास सर्व तीर्थांचा राजा म्हटले जाते.

मणिकर्णिका तीर्थात स्नान केल्यास सर्व पापांचे क्षालन होते अशी प्राचीन काळापासून भाविकांची धारणा असून आजही या तीर्थात स्नान करण्यासाठी देशो विदेशातून भाविक येत असतात.

मणिकर्णिका घाटाचे अर्थात तीर्थाचे महत्व हे आहे की हे तीर्थ गंगा किनाऱ्याच्या मध्यभागी असून अर्धचंद्राकृती आहे व या तीर्थाच्या आसमंतात अनेक मंदिरे आहेत.

मणिकर्णिका तीर्थाचे माहात्म्य काशीखंड नामक पुराण ग्रंथात वर्णिले असून या तीर्थाविषयी काशीखंडात एक कथा सांगितली गेली आहे व ती म्हणजे साक्षात विष्णूंनी आपल्या चक्राने या ठिकाणी जमिनीस खोल खणून तीर्थ निर्माण करण्याचे कार्य सुरु केले मात्र पुष्कळ खोल खणूनही या तीर्थात पाणी लागत नव्हते मात्र या परिश्रमाने विष्णूंना प्रचंड घाम येऊन त्या घामाच्या धारांनी हे तीर्थ भरून गेले त्यामुळे या तीर्थास प्रथम चक्र पुष्करणी असे नाव मिळाले.

कालांतराने महादेवांचे या स्थळी आगमन झाले व या कुंडातील कोटी तीर्थांचे तेज त्यांच्या दृष्टीस पडून त्या दिव्य तेजाच्या दर्शनाने ते प्रसन्न झाले आणि ते विष्णूंना म्हणाले की हे तीर्थ पाहून मी अत्यंत आनंदी झालो असून तुम्हाला जो वर माझ्याकडून हवा आहे तो मागा.

यावेळी विष्णूंनी एकच वर मागितला की तुम्ही कायम माझ्या सोबत राहावेत हीच माझी इच्छा आहे व हे ऐकून महादेव अधिक प्रसन्न झाले आणि त्यांनी विष्णूंना तथास्तु म्हटले.

याच वेळी महादेवांच्या कानातून एक कर्णकुंडल या तीर्थात पडले त्यामुळे महादेवांनी या तीर्थाचे मणिकर्णिका असे नामकरण केले. त्यामुळे या तीर्थास अधिक महत्व प्राप्त झाले. साक्षात विष्णू व महादेव या दोन देवतांच्या आशीर्वादाने पावन झालेले हे प्राचीन स्थान असल्याने मणिकर्णिका घाट हे समस्त हिंदू जनांसाठी अत्यंत पवित्र स्थळ बनले आहे.