श्री भुलेश्वर मंदिर - यवत माळशिरस पुणे

भुलेश्वर मंदिराच्या विधानाचे एकूण चार भाग असून ते नंदीमंडप, चौरसमंडप, अंतराळ आणि गर्भगृह असे आहेत. 

श्री भुलेश्वर मंदिर - यवत माळशिरस पुणे

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील भुलेश्वर हे एक अतिशय प्रसिद्ध असे प्राचीन देवस्थान आहे.

भुलेश्वर डोंगराच्या दक्षिणेस असलेल्या माळशिरस या गावातून भुलेश्वर मंदिराकडे जाणारी मुख्य वाट आहे.

भुलेश्वर मंदिराकडे जात असताना शिवपूर्वकाळात आदिलशाही सरदार मुरार जगदेव यांनी बांधलेला दौलतमंगळ हा किल्ला दिसतो. 

किल्ला आता भग्न झाला असला तरी किल्ल्याच्या बांधकामाचे अवशेष आणि बुरुज आपल्याला आजही पाहावयास मिळतात.

भुलेश्वर टेकडीच्या माथ्यावर आल्यावर आपल्याला समोर भुलेश्वराचे भव्य असे मंदिर दृष्टीस पडते. 

मंदिराच्या व्यवस्थापनाने मंदिराचा परिसर अत्यंत स्वच्छ व सुशोभित ठेवला असून पर्यटकांना बसण्याची व्यवस्था व एक प्रेक्षणीय बाग या ठिकाणी करण्यात आली आहे.

भुलेश्वर मंदिर हे अदमासे बारा फूट उंच अशा पाषाणी चौथऱ्यावर बांधलेले असल्याने मंदिराच्या प्रांगणात येण्यासाठी काही पायऱ्या चढून वर जावे लागते.

पायऱ्या चढून चौथऱ्यावर प्रवेश केल्यावर एक सुरेख कोरीव शिल्प दृष्टीस पडते. येथून मुख्य मंदिरात जाण्याचा मार्ग आहे.

मंदिराच्या सभागृहातील लादीवर काही लेख कोरलेले दिसून येतात.

अतिशय शांत व धीरगंभीर अशा मंदिराच्या सभागृहातून आपण जेव्हा गर्भगृहात प्रवेश करतो त्यावेळी समोर भुलेश्वर महादेवाचे शिवलिंग असेल अशी अपेक्षा असते मात्र समोर शिवलिंग न दिसल्याने सुरुवातीस चकित व्हायला होते मात्र भुलेश्वर मंदिराचे हे मुख्य वैशिट्य आहे की खालील गर्भगृहाच्या वर आणखी एक गर्भगृह असून या गर्भगृहात भुलेश्वर महादेवाचे मुख्य शिवलिंग स्थापित आहे.

वरील गर्भगृहात असलेल्या भुलेश्वराच्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी खालील गर्भगृहाच्या उजव्या बाजूस असलेल्या पायऱ्या चढून वर जावे लागते.

मुख्य गर्भगृहा समोर काळ्या पाषाणातील एक भव्य कोरीव नंदी दिसून येतो.

गर्भगृहातील शिवलिंगाच्या संगमरवरी बाणावर पितळी मुखवटा बसवलेला असून बाण काढल्यावर खाली आत तीन मुख्य लिंग तीन कोपऱ्यात उंचवट्याच्या स्वरूपात असून ती ब्रह्मा, विष्णू व महेश यांची प्रतीके आहेत. 

मंदिराच्या भिंतींच्या प्रत्येक मोडणी वर अतिशय घाटदार अशा मूर्ती आहेत व यामध्ये देवदेवता, सप्तमातृका, नर्तिका, वादिका, दर्पण धारणी, पत्रलेखिका, महाभारत व रामायणयातील कथांचे पट्टे व इतर अनेक शिल्पकृती आढळून येतात मात्र यातील अनेक मूर्ती आता परकीय आक्रमणामुळे भग्नावस्थेत आढळून येतात. 

भुलेश्वर मंदिरांइतके सुरेख शिल्प कार्य फार ठराविक मंदिरांमध्ये पहावयास मिळते. 

भुलेश्वर मंदिराच्या विधानाचे एकूण चार भाग असून ते नंदीमंडप, चौरसमंडप, अंतराळ आणि गर्भगृह असे आहेत. 

मंदिराचा गाभारा नक्षत्राकृती आहे. मुख्य मंदिराच्या अंतराळात इतर अनेक देवतांची मंदिरे असून त्यातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सुरेख आहे. 

अंतराळातील अनेक देवळ्या सध्या रिकाम्या दिसत असल्या तरी कधीकाळी येथे सुद्धा कुठल्यातरी देवता स्थानापन्न असाव्यात असे जाणवते. 

मंदिरावरील मूर्तींच्या शरीराची लयबद्धता, घाटदार पणा आणि हालचालीतील लालित्य यामुळे या सर्व मूर्ती मनाचा ठाव घेतात. 

भुलेश्वर मंदिराची स्थापत्यशैली अभ्यासकांच्या मते आठव्या शतकातील असावी व पुढे बाराव्या शतकापर्यंत मंदिराच्या स्थापत्य शैलीत सुधारणा करण्यात आली असावी मात्र पुढील काळातील परचक्रात येथील अनेक शिल्पे भग्न झालीआणि अठराव्या शतकाच्या सुरुवातीस मंदिराचा पुन्हा एकदा जीर्णोद्धार झाला असावा. 

मंदिराचा मंडप आणि गाभाऱ्यावरील शिखर ही बांधकामे उत्तरकालीन असावीत असे अभ्यासकांचे मत आहे. 

नंदीच्या बाजूस एक कूर्मशील्प शिल्प दृष्टीस पडते.

भुलेश्वर मंदिराचा बाह्यभाग हा अतिशय भव्य असून चिरेबंदी पाषाणांनी युक्त आहे. 

प्रथम दर्शनी एखाद्या दुर्गाच्या तटबंदी सारखे हे दृश्य भासते. 

भुलेश्वर मंदिर ज्या टेकडीवर आहे त्या टेकडीस पूर्वी बेलसरची टेकडी असे नाव होते. मुळात बेलसर हा भुलेश्वर या शब्दाचा अपभ्रंश आहे. 

सह्याद्रीच्या मुख्य रांगेतून एक शाखा पुण्याच्या किंचित दक्षिण दिशेवरून होऊन पूर्वेकडे सरकली आहे व ही रांग भुलेश्वर डोंगररांग या नावाने ओळखली जाते.

याच रांगेत समुद्रसपाटीपासून अदमासे ८२२ मीटर उंचीवर भुलेश्वर मंदिर आहे.

मुख्य मंदिरापासून थोड्याच बाजूला एक छोटे मंदिर आहे मात्र ते कुठल्या देवतेचे आहे याचा अंदाज येत नाही. 

मंदिराचा मुख्य चौथरा उतरून खाली आल्यावर आणखी एक चौथरा दिसून येतो व तेथे एका ठिकाणी आत जाणाऱ्या पायऱ्या असून भुयार सदृश्य बांधकाम  आढळून येते.

भुयाराच्या प्रवेशद्वारावर आनंदाश्रम हे नाव आणि बांधणीचा काळ कोरलेला दिसून येतो. 

भुलेश्वर मंदिराच्या आसमंतात इतर अनेक मंदिरे असून त्यापैकी रामचंद्राचे व शिवमंदिर प्रेक्षणीय आहेत. 

महाराष्ट्रातील मंदिर स्थापत्याचे उत्कृष्ट उदाहरण असलेले भुलेश्वर हे मंदिर एकदातरी पाहणे अगत्याचे आहे.