केरो लक्ष्मण छत्रे - एक प्रसिद्ध गणितज्ञ व खगोलतज्ज्ञ

१८७७ साली तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड लिटन यांनी दिल्लीच्या एका सभेत त्यांना रावबहादूर हा किताब दिला.

केरो लक्ष्मण छत्रे - एक प्रसिद्ध गणितज्ञ व खगोलतज्ज्ञ
केरो लक्ष्मण छत्रे

गणित व खगोलशास्त्रात आपल्या ज्ञानाने मोलाची कामगिरी करणाऱ्या भारतीयांमध्ये केरो लक्ष्मण छत्रे उर्फ केरूनाना छत्रे यांचे नाव आदराने घेतले जाते. केरूनाना यांचा जन्म सध्याच्या रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातील नागांव येथे १८२४ साली झाला. केरूनाना यांच्या वडिलांचे म्हणजे लक्ष्मणरावांचे निधन केरूनाना बालवयात असतानाच झाले असल्याने काकांनी केरुनानांचा सांभाळ केला. 

केरूनाना यांचे काका हे मुंबईस राहत असल्याने केरूनाना सुद्धा नागांव हुन मुंबईस राहावयास गेले आणि तिथेच त्यांचे पुढील शिक्षण झाले. मुंबईस जे एल्फिस्टन कॉलेज आहे त्यातील आद्य विद्यार्थ्यांपैकी एक केरूनाना हे होते.

लहानपणापासून केरूनाना यांना गणिताची आवड होती याबद्दल असे सांगितले जाते की जेवत असताना सुद्धा भाताच्या आकृती करून ती गणिते सोडवणाच्या छंदांत त्यांना तासनतास जेवणाचा विसर पडत असे.

केरूनाना शिक्षण घेत असताना त्यांना अर्लीबार आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे शिक्षक म्हणून लाभले. या दोघांचेही केरूनाना हे अत्यंत लाडके विद्यार्थी होते. केरूनाना हे स्वभावाने शांत आणि अभ्यासात रुची दाखवणारे असल्याने कॉलेजमधील सर्वच शिक्षकांचे ते अत्यंत लाडके विद्यार्थी होते. 

महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर १८४० साली त्यांना कुलाब्याच्या दांडीवर दर महा पन्नास रुपयांची नोकरी मिळाली. त्यानंतर १८६५ साली पुण्याच्या एका विद्यालयात ते गणित या विषयाचे शिक्षक म्हणून रुजू झाले.

हळूहळू त्यांची या हुद्द्यावर बढती होऊन त्यांना महिना हजार बाराशे रुपये पगार प्राप्त होऊ लागला आणि त्यांचा नावलौकिक खूप वाढला. त्यांच्या शिष्यांमध्ये लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर आदी प्रसिद्ध व्यक्ती होत्या.

१८७७ साली तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड लिटन यांनी दिल्लीच्या एका सभेत त्यांना रावबहादूर हा किताब दिला. १८७९ साली केरूनाना निवृत्त झाले व त्यांना दरमहा पाच हजार रुपये पेन्शन मिळू लागले.

निवृत्तीनंतरही केरूनाना यांनी विद्यादान, विद्याव्यासंग व संशोधनकार्य सुरूच ठेवले होते व अनेक होतकरू विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शनही करीत. पृथ्वीची रचना, पंचाग विद्या आदी विषयांवर त्यांनी अनेक प्रयोग केले होते. सूर्यावरचे डाग आणि पृथ्वीवरील वातावरण यांचा जवळचा संबंध आहे असे त्यांचे मत होते व याची अनेक प्रमाणे सुद्धा त्यांनी दिली होती.

१८८४ साली अल्पशा आजाराने केरूनाना छत्रे यांचे निधन झाले व देश एका महान अशा गणितज्ञास, खगोलतज्ज्ञास व शिक्षकास मुकला मात्र आपल्या कार्याने गणित व खगोल आदी शास्त्रांत मोलाची भर घातल्याने आजही केरूनाना छत्रे यांचे नाव अजरामर झाले आहे.