सरसेनापती हंबीरराव मोहिते समाधी स्थळ - तळबीड

तळबीड येथे हंबीरराव मोहिते यांची भव्य समाधी असून तिचे दर्शन घेण्यास विविध ठिकाणाहून शिवप्रेमी येत असतात. 

सरसेनापती हंबीरराव मोहिते समाधी स्थळ - तळबीड
सरसेनापती हंबीरराव मोहिते समाधी स्थळ

आपल्या कर्तुत्वाने व पराक्रमाने शिवकाळ व शंभू काळ गाजवणारे स्वराज्याचे मुख्य सेनापती हंसाजी बाजी अर्थात हंबीरराव मोहिते यांचे समाधीस्थळ सातारा जिल्ह्याचा तळबीड गावात आहे. 

तळबीड येथे हंबीरराव मोहिते यांची भव्य समाधी असून तिचे दर्शन घेण्यास विविध ठिकाणाहून शिवप्रेमी येत असतात. 

कराड शहराचे अलीकडे १३ किलोमीटर अंतरावर किल्ले वसंतगडाच्या पायथ्याशी वसलेल्या तळबीड गावातील हंबीरराव मोहिते यांच्या समाधीचा परिसर अत्यंत प्रशस्त असून समाधी परिसराचे अत्यंत चांगल्या पद्धतीने सुशोभीकरण आले आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक प्रसंगी मुख्य सेनापती या नात्याने हंबीराव मोहिते उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर हंबीररावांनी छत्रपती संभाजी महाराजांना प्रत्येक प्रसंगात मोलाची साथ दिली. 

१६ डिसेंबर १६८७ साली मोगल सरदार सर्जाखान आणि हंबीरराव मोहिते यांच्यात वाडी येथे तुंबळ युद्ध झाले व या युद्धात तोफेचा एक गोळा हंबीर राव यांच्या शरीरावर आदळून त्यांना वीरमरण प्राप्त झाले. 

मात्र सेनापती हंबीरराव यांच्या मृत्यूनंतरही मराठ्यांनी ही लढाई जिंकून मोगलांना पराभवाचे पाणी पाजले आणि हंबीरराव याना खऱ्या अर्थी श्रद्धांजली वाहिली. 

एका भव्य षटकोनी घुमटाकृती अशा वास्तूमध्ये हंबीररावांची चिरेबंदी पाषाणातील समाधी असून तिचे दर्शन होताच आपण आपोआपच समाधी समोर नतमस्तक होतो.

समाधीच्या मागील बाजूस छत्रपती शिवाजी महाराज, सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या तसबिरी आहेत. 

सातारा जिल्ह्यातून आजही सर्वाधिक तरुण भारतीय सैन्यदलात भरती होतात व या सर्वांसाठी हंबीरराव मोहिते यांची समाधी एक श्रद्धास्थान असून दरवर्षी या समाधीचे दर्शन घेऊनच सैनिक हंबीररावांनी स्वराज्यासाठी केलेल्या कार्याचा आदर्श घेऊन पुन्हा एकदा देशाच्या संरक्षणासाठी सिद्ध होऊन परततात.