अंबाजीपंत पुरंदरे - पुरंदरे घराण्याचे संस्थापक

छत्रपती शाहू महाराज मोगलांच्या कैदेतून सुटून आल्यावर अगदी सुरुवातीस त्यांना जी माणसे मिळाली त्यामध्ये अंबाजीपंत एक होते.

अंबाजीपंत पुरंदरे - पुरंदरे घराण्याचे संस्थापक
अंबाजीपंत पुरंदरे

छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीत जी कर्तबगार माणसे उदयास आली त्यापैकी एक म्हणजे अंबाजीपंत पुरंदरे. अंबाजीपंत यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील सासवड असून या गावाचे देशपांडे व कुलकर्णी म्हणून त्यांचे घराणे कार्य पाहत होते. 

अंबाजीपंत यांचा उल्लेख काही पत्रांत आबाजी असाही आढळतो. त्यांच्या पत्नीचे नाव बयाबाई असे होते. अंबाजीपंत यांना तात्या या टोपणनावाने सुद्धा ओळखले जाई. 

छत्रपती शाहू महाराज मोगलांच्या कैदेतून सुटून आल्यावर अगदी सुरुवातीस त्यांना जी माणसे मिळाली त्यामध्ये अंबाजीपंत एक होते. अंबाजीपंत हे आपले बंधू तुकोपंत आणि तुकोपंतांचे पुत्र मल्हार पुरंदरे यांच्यासहित शाहू महाराजांच्या पक्षास जाऊन मिळाले होते.

बाळाजी विश्वनाथ आणि दमाजी थोरात यांच्यात झालेल्या वादात दमाजी थोरात यांनी बाळाजी विश्वनाथ यांना अटक केली असता छत्रपती शाहू महाराज यांच्या आज्ञेनुसार अंबाजीपंत यांनी दंड भरून बाळाजी विश्वनाथ यांची सुटका केली होती. १७२४ साली अंबाजीपंत यांनी स्वतंत्रपणे माळव्यावर मोहीम काढून माळवा प्रांत जिंकला होता.

छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीस त्यांना अंबाजीपंत यांनी उत्तम साथ दिल्याने शाहू महाराजांनी त्यांची मुतालिक या पदावर नेमणूक केली तसेच बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी अंबाजीपंत यांच्याकडे पोतनीशी आणि जामदारखान्याची जबाबदारी सोपवली होती.

बाळाजी विश्वनाथ पेशवे यांच्यानंतर बाजीराव यांच्याकडे पेशवेपद आले त्यावेळी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीस अंबाजीपंत यांनी त्यांना कारभाराचे शिक्षण दिले. बाजीराव यांची पेशवेपदी निवड झाल्यावर त्यांनी अंबाजीपंत यांची दिवाणपदी नेमणूक केली आणि त्यांचे पुतणे मल्हार पुरंदरे यांच्याकडे मुतालिक पदाची जबाबदारी आली.

छत्रपती शाहू महाराजांच्या अतिशय जवळच्या लोकांमध्ये अंबाजीपंत यांचा समावेश असल्याने राज्यातील अनेक सरदारांकडे अंबाजीपंत यांच्या असाम्या असत. पहिले बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीत त्यांच्याविरोधात काही सरदार एकत्र आले होते त्यावेळी त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी बाजीराव पेशवे यांनी अंबाजीपंत आणि इतर सरदारांना पाठवल्याचा उल्लेख आढळतो.

१७३५ साली अंबाजीपंत पुरंदरे यांचा मृत्यू माहुली येथे झाला. अंबाजीपंत यांना महादोबा आणि सदाशिव असे दोन पुत्र होते. अंबाजीपंत पुरंदरे हे सासवडच्या प्रसिद्ध पुरंदरे घराण्याचे संस्थापक मानले जातात आणि पेशव्यांचे कारभारी व छत्रपती शाहू महाराजांचे एकनिष्ठ उपमंत्री म्हणून त्यांनी केलेले कार्य चिरंतन आहे. सासवड येथे असलेला पुरंदरे वाडा आजही अंबाजी पुरंदरे यांच्या इतिहासाची साक्ष देत उभा आहे.