स्वातंत्र्यवीर सावरकर - एक स्वातंत्र्य यज्ञ
सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे २८ मे १८८३ साली झाला. भगूर हे सावरकर कुटुंबाच्या जहागिरीचे गाव होते. सावरकरांच्या आईचे सावरकर १० वर्षांचे असताना निधन झाले. वयाच्या १२ व्य वर्षांपासून सावरकरांना केसरी या वृत्तपत्राचे वाचन करण्याची आवड लागली. केसरीतील देशभक्तीपर लेखांचा त्यांच्या बालमनावर एवढा प्रभाव पडला की त्यांनी भगूर येथील देवीच्या मंदिरात देशसेवेची शपथ घेतली.
सावरकरांचे प्राथमिक शिक्षण भगूर व माध्यमिक शिक्षण हे नाशिक येथे झाले. पुढील शिक्षणासाठी सावरकरांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज मध्ये प्रवेश घेतला व तेथून १९०५ साली कला शाखेची पदवी प्राप्त केली. फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी विदेशी उत्पादनांच्या बहिष्काराची चळवळ सुरु केली व पुण्यात विदेशी कपडयांची होळी केली.
पुण्यात कला शाखेची पदवी प्राप्त केल्यावर सावरकरांनी मुंबईस एल.एल.बी. चा अभ्यास सुरु केला त्यावेळी त्यांना श्यामजी कृष्णवर्मा शिष्यवृत्ती मिळून त्यांना उच्च शिक्षणाकरिता इंग्लंडला जाण्याची संधी मिळाली.
इंग्लंडला इंडिया हाऊस येथे राहून सावरकरांनी वकिलीचा अभ्यास सुरु केला मात्र बालपणापासूनच मनात मायभूमीविषयी अतोनात प्रेम असल्याने इंग्लंडमध्येही ते १८५७ सालच्या स्वातंत्र्य युद्धाचा स्मरण दिन, शिवाजी महाराज जयंती इत्यादी उत्सव इतर भारतीय विद्यार्थांना सोबत घेऊन साजरे करीत. त्याकाळी मदनलाल धिंग्रा या सावरकरांच्या समवयस्क अशा तरुणाने क्रांतीने प्रेरित होऊन कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याचा वध केला त्यावेळी मदनलाल धिंग्रा यांच्या निषेधाचा ठराव इंडिया हाऊसमध्ये मांडण्यात आला तेव्हा सावरकरांनी या ठरावास विरोध केला. निषेधाच्या ठरावास विरोध केल्याने ब्रिटिश सरकारने सावरकरांची वकिलीची पदवी रद्द करण्यात आली.
सावरकरांचे बंधू सुद्धा भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अग्रणी होते. १९०९ साली सावरकरांचे ज्येष्ठ बंधू गणेश उर्फ बाबा सावरकर यांना अभिनव भारत मित्र मेळ्याच्या एका कार्यक्रमामुळे थेट जन्मठेपेची शिक्षा झाली त्याचा निषेध म्हणून अनंत लक्ष्मण कान्हेरे या युवकाने तेथील कलेक्टर जॅक्सन यांचा वध केला.
१९१० साली सावरकर पॅरिसहून लंडन येथे उतरले असता ब्रिटिश साम्राज्यविरोधात बंड उभारल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवून त्यांना स्टेशनवरच अटक करण्यात आले. तेथून त्यांची रवानगी भारतात करण्यात आली. तेथून एका जहाजातून सावरकरांना भारतात आणण्यात येत होते त्याचवेळी मार्सेलिस बंदरात जहाज आले असता सावरकरांनी जहाजाच्या स्वच्छता गृहाच्या पोर्ट होलमधून समुद्रात उडी घेतली आणि पोहोत पोहोत फ्रान्सचा किनारा गाठला.
फ्रान्सच्या किनाऱ्यास लागल्यावर तेथून ते 'गाडी गाडी' असे ओरडत वाहन थांबवण्याचा प्रयत्न करू लागले मात्र त्यामुळे फ्रान्समधील पोलिसांना संशय येऊन त्यांनी सावरकरांना पुन्हा अटक केली आणि पाठलाग करत आलेल्या ब्रिटिश पोलिसांच्या स्वाधीन केले. तेथून सावरकरांना मुंबई व मुंबईहून नाशिक येथे नेण्यात आले.
पुढे सावरकरांनी ब्रिटिशांच्या भारतातील सत्तेविरोधात विरोधात लढण्याकरिता फ्रान्स देशाचा आधार घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी हा प्रश्न हेग येथील आंतराष्ट्रीय न्यायालयात गेला होता मात्र हा खटला सावरकरांविरुद्ध लागला आणि त्याच वेळी जॅक्सन खून खटल्यात सावरकरांवर कटासाठी पिस्तूल पुरवणे व कटात सामील असण्याचे गुन्हे दाखल झाले आणि या गुन्ह्यांबद्दल त्यांना दोन जन्मठेपांची शिक्षा सुनावण्यात आली.
जन्मठेपेची ही कैद हा सावरकरांच्या कारकिर्दीतील अतिशय कठीण काळ होता. सुरुवातीस त्यांना मुंबईतील डोंगरी, भायखळा, ठाणे आणि मद्रास अशा तुरुंगातून मग अंदमानात नेण्यात आले. अंदमानास त्याकाळी काला पानी असे म्हणत त्यामुळे त्याठिकाणी मिळणाऱ्या बंदिवासास काळ्या पाण्याची शिक्षा असे म्हटले जात असे.
१९११ ते १९२४ अशी १४ वर्षे सावरकरांनी अंदमानात काढली. अंदमानातून सुटका झाल्यावर सावरकरांची रवानगी सुरुवातीस अलीपूर, रत्नागिरी आणि येरवडा येथील तुरुंगात करण्यात आली व येरवड्यातून त्यांना पुढे रत्नागिरी येथे स्थानबद्ध करण्यात आले. यावेळी त्यांच्यावर राजकीय कार्य करण्यास पूर्णतः निर्बंध घालण्यात आले. रत्नागिरी येथे स्थानबद्ध असताना सावरकरांनी अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतले. अस्पृश्यता निवारण, पतित पावन मंदीराची स्थापना आणि भाषा शुद्धी असे महत्वपूर्ण विषय त्यांनी रत्नागिरी येथे असताना हाती घेतले. या काळात त्यांनी विपुल लिखाणही केले.
१९३७ साली सावरकरांवरील निर्बंध काढून घेण्यात आले व यानंतर सावरकर मुंबई येथे राहू लागले. येथे आल्यापासून सावरकरांनी राष्ट्रसभेत सामील न होता हिंदू महासभेच्या कार्यात लक्ष घालण्याची सुरुवात केली. हिंदू महासभेच्या अहमदाबाद अधिवेशनाचे अध्यक्षपद सावकारांनी स्वीकारले त्या अधिवेशनात त्यांनी हिंदू महासभेचे एका पक्षात रूपांतर करून राष्ट्रसभेची प्रतिस्पर्धी संस्था म्हणून राजकीय प्रांतात उतरण्याची घोषणा केली.
हिंदू महासभेच्या निमित्ताने त्यांनी देशभरात अनेक दौरे काढले याशिवाय हिंदू महासभेच्या नागपूर, कलकत्ता, मदुरा, भागलपूर आणि कानपुर येथील अधिवेशनांमध्ये त्यांनी अध्यक्ष या नात्याने अप्रतिम कामगिरी बजावली मात्र पुढे प्रकृतीच्या तक्रारींमुळे त्यांनी पदाचा राजीनामा दिला.
आपली संपूर्ण कारकीर्द क्षणाचीही उसंत न घेता भारतभूमीच्या व धर्माच्या पुनरुत्थानासाठी व्यतीत केल्यावर आता आपल्या कार्याची पूर्तता झाली असे समजून २६ फेब्रुवारी १९६६ मध्ये वयाच्या ८२ व्या वर्षी सावरकरांनी या जगाचा निरोप घेतला. या अगोदर त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केला. मृत्यूपूर्वी सावरकरांनी 'आत्महत्या की आत्मर्पण' या लेखात त्यांचे जीवितकार्य आता पूर्ण झाल्याचे विधान केले आणि लिहिले की, जेव्हा एखाद्या मनुष्यास आपले पृथ्वीतळावरील कार्य पूर्ण झाले आहे याची जाणीव होते अशावेळी त्याने आपल्या आत्म्यास अर्पण करणे यात गुन्हा नाही।
आपल्या मातेस्वरुप मातृभुमीसाठी अगदी लहान वयापासून त्यांनी अतोनात कष्ट सोसले, सावरकरांची दुरदृष्टी एवढी प्रखर की पुढे काय घडणार हे त्यांच्या तीक्ष्ण बुद्धीने आधीच हेरलेले असायचे. आजही त्यांचे लिखाण अनेकांसाठी प्रेरणादायी आहे व भविष्यातही राहील. भारतमातेसाठी सर्वाधिक कष्ट भोगणार्या स्वातंत्र्यविरांमध्ये सावरकर हे अग्रस्थानी आहेत.