हरिश्चंद्रगड - एक प्राचीन दुर्गवैभव
कळसुबाई रांगेच्या दक्षिणेस सह्याद्रीतील जे पहाड आहेत ते हरिश्चंद्रगडाचे पहाड म्हणून प्रसिद्ध आहेत. सह्याद्रीच्या घाटमाथ्याची सुरुवात ही खऱ्या अर्थी कळसुबाई हरिश्चंद्रगड येथून सुरु होऊन ती दक्षिणेस फोंडा घाटापर्यंत जाते.
समुद्रसपाटीपासून अदमासे ४५०० फूट उंचीवर वसलेला हरिश्चंद्रगड म्हणजे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध दुर्ग. सह्याद्रीतील नाणेघाट, माळशेज घाट आणि टोलार खिंड या प्राचीन घाटवाटांचा पहारेकरी म्हणून या गडाची ख्याती होती.
महाराष्ट्रातील ठाणे, नगर आणि नाशिक या जिल्ह्यांच्या सीमा कळसुबाई डोंगररांगेत एकमेकांना मिळाल्या आहेत. याच कळसुबाई रांगेच्या दक्षिणेस सह्याद्रीतील जे पहाड आहेत ते हरिश्चंद्रगडाचे पहाड म्हणून प्रसिद्ध आहेत. सह्याद्रीच्या घाटमाथ्याची सुरुवात ही खऱ्या अर्थी कळसुबाई हरिश्चंद्रगड येथून सुरु होऊन ती दक्षिणेस फोंडा घाटापर्यंत जाते.
गडावर जाण्यास एकूण चार मार्ग आहेत. पुण्याहून खिरेश्वर मार्ग, कल्याणहून सावर्णे-बेलपाडा मार्ग, नगर येथून पाचनई मार्ग आणि नळीची वाट. या चार मार्गांमध्ये पाचनई मार्ग सर्वाधिक प्रचलित आहे.
पाचनई हे गाव समुद्रसपाटीपासून ८६६ मीटर उंचीवर असून येथून जाणारी वाट ही सदाहरित अशा अरण्यातून आपल्याला गडाच्या माथ्यावर घेऊन जाते. माथ्यावर सुरुवातीस एक छोटेखानी मात्र प्राचीन असे शिवमंदिर दृष्टीस पडते. मंदिराची स्थापत्यशैली ही १२ व्या शतकाहून पूर्वीची असावी असे लक्षात येते. मंदिरात शिवलिंग असून बाजूला मूर्ती व वीरगळ पाहावयास मिळते. मंदिराच्या समोर पाण्याचे एक छोटे कुंड देखील आहे.
येथून काही अंतरावर गडावरील लेण्यांचा प्रसिद्ध समूह दृष्टीस पडतो. या लेण्या प्राचीन असून लेण्यांच्या समोर एक भव्य पुष्करणी तलाव आहे. हा संपूर्ण परिसर हरिश्चंद्रेश्वर मंदिर आणि केदारेश्वर लेण्यांचा परिसर म्हणून ओळखला जातो व या परिसरात एकूण ८ यादवकालीन शिलालेख आढळले आहेत. याच आसमंतात यादवकालीन चक्रपाणी वटेश्वर यांनी तत्त्वसार या ग्रंथाची निर्मिती केली होती. पुष्करणीच्या बाजूस एका भग्न मंदिराचे जोते व पाण्याचे खोदलेले टाके दृष्टीस पडते.
बाजूलाच गडाचे आदिदैवत हरिश्चंद्रेश्वराचे अतिशय देखणे हेमाडपंथी मंदिर आहे. अतिशय अद्भुत पद्धतीने बांधलेल्या या मंदिराची तुलना बुद्धगयेच्या मंदिरासोबत केली जाते. काळ्या पाषाणात घडवलेल्या या मंदिरातील देवाची पूजा चारही दिशांनी आत जाऊन करता येते मात्र मंदिराच्या गाभाऱ्यात शिरण्यापूर्वी मंगळगंगेवर बांधलेला छोटासा पूल ओलांडावा लागतो. पूल ओलांडताच समोर प्रवेशद्वाराच्या दोन बाजूस भव्य कीर्तिमुखे दिसतात. मंदिराच्या आवारात एक गणेशमंदिर असून आतील गणेशमूर्ती अतिशय भव्य व देखणी आहे व आवारात अनेक वीरगळी सुद्धा पाहावयास मिळतात.
परिसरात असंख्य मंदिरे, लेणी, गुहा आणि टाकी आहेत. हे सर्व स्थापत्य उभारण्यास किती कलाकारांचे हात लागले असतील याचा विचार करून मन थक्क होते. याच परिसरात प्रसिद्ध असे केदारेश्वराचे लेणे आहे. अदमासे ६०० फूट रुंद असलेली ही लेणी आतमध्ये पाच फूट खोदलेली असल्याने यामध्ये वर्षभर पाणी भरलेले असते. लेण्यात केदारेश्वराचे ३ फूट उंच व ६ फूट रुंद असे भव्य शिवलिंग असून शिवलिंगाच्या भोवती असलेल्या एकूण चार खांबांपैकी एकच खांब सुस्थितीत आढळतो. या संदर्भात अशी आख्यायिका आहे की हा खांब समस्त विश्वाचा भार सांभाळून आहे व ज्यावेळी हा खांब पडेल त्यावेळी प्रलय ओढवेल. लेण्याच्या डाव्या बाजूच्या भिंतीवर शिवपूजनाचा प्रसंग कोरलेला दिसून येतो.
हे सर्व बांधकाम पाहता हा किल्ला पूर्वी एखाद्या राजवटीचे प्रमुख ठिकाण असावा हे लक्षात येण्यास वेळ लागत नाही मात्र गेल्या शेकडो वर्षात झालेल्या नैसर्गिक आणि परकीय आघातांनी या गडावरील पूर्वीचे वैभव आता राहिलेले नाही.
हरिश्चंद्रगडाचा सर्वात रोमांचित करणारा भाग म्हणजे सुप्रसिद्ध असा कोकणकडा. मंदिरामागील सोंड ओलांडून पश्चिमेकडे पाऊण मैल पायवाटेने चालत गेल्यावर हा रौद्र भीषण कडा दृष्टीस पडतो. माथ्यापासून पायथ्यापर्यंत खाली ४००० फूट तुटलेला हा कडा अंतर्गोलाकार असून मध्यभागी अदमासे ५० फुटी भकळ आहे. कोकणकड्याची लांबी सुद्धा अदमासे २ मैल एवढी असावी.
हा किल्ला इतर किल्ल्यांहून अतिशय वेगळा असून प्राचीन काळातील दुर्ग जसाच्या तसा पाहावयाचा असल्यास हरिश्चंद्रगड हा किल्ला डोळ्यासमोर उभा राहतो. गडास एकूण तीन शिखरे असून त्यांची नावे तारामती, रोहिदास आणि हरिश्चंद्र अशी आहेत. यामधील तारामती हे शिखर सर्वोच्च असून त्यांची उंची समुद्रसपाटीपासून १४०० मीटर आहे.
महाराष्ट्राच्या प्राचीन दुर्ग संस्कृतीचे प्रतीक असा हा हरिश्चंद्रगड हा नुसताच गड नसून खऱ्या अर्थी हरिश्चंद्र पर्वतच आहे.