शेषशायी विष्णू वाघेश्वर

१९७२ साली पवना धरण झाल्यावर हे मंदिर पाण्यात गेले. त्यामुळे गावात एक नवीन मंदिर बांधले गेले. त्या मंदिरात एक सुंदर असे शिल्पनवल आहे. शेषशायी विष्णूची सुंदर मूर्ती नवीन मंदिराच्या एका भिंतीत बसवली आहे.

शेषशायी विष्णू वाघेश्वर
शेषशायी विष्णू वाघेश्वर

गेल्याच रविवारी अकस्मात मावळातले भालगुडी हे सुंदर गाव आणि तिथे असलेली देखणी विष्णूमूर्ती बघायचा योग आलेला. काही मित्रांनी मावळात अजून एक विष्णुमूर्ती आणि जुने विष्णूमंदिर असल्याचे सांगितले. आंतरजालावर काही शोधाशोध केल्यावर मावळातल्या शिळीम गावी असे एक मंदिर असल्याचे समजले. काही मित्रांना ही गोष्ट सांगितल्यावर मंडळी एका पायावर तयार झाली आणि लगेचच आज रविवारी पुन्हा एकदा मावळात जायची संधी मिळाली.

गेल्या रविवारी गेलेल्या भालगुडीला परत एकदा भेट दिली. सोबत आलेली मंडळी पहिल्यांदाच हे बघत होते. त्यामुळे तिथे पुन्हा एकदा देखण्या विष्णूमूर्तीचे दर्शन झाले. तिथून पुढे जेमतेम ११ कि.मी. वर असलेल्या शिळिंब गावी जायचे. पवना नदीवर बांधलेल्या धरणामुळे जो जलफुगवटा तयार होतो त्यात इथले जुने शिवमंदिर बुडून जाते. उन्हाळ्यात पाणी कमी झाल्यामुळे इथपर्यंत जाता येते. ऊन चांगलेच होते तरीही त्याची तलखी जाणवत नव्हती. जवळच असलेले पाणी आणि त्यावरून येणारे वारे, त्यामुळे हवा खूपच सुखद होती.

इथून आजूबाजूचा परिसर मोठा रमणीय दिसतो. एका बाजूला तिकोना किल्ला तर दुसऱ्या बाजूला आकाशावेरी गेलेला तुंग किल्ल्याचा माथा. याच्या बरोबर मधोमध आहे हे प्राचीन ‘वाघेश्वर शिवमंदिर’. सतत पाण्यात असल्यामुळे मंदिराचे खांब आणि भिंती काहीशा खराब झालेल्या. परंतु मंदिराची डागडुजी केलेली दिसते. मंदिरावर शिल्पकला काही नाही, मात्र सभामंडपाचे खांब यादवकाळाची आठवण करून देतात. सभामंडपाच्या ललाटबिंबावर लक्ष्मीचे शिल्प आहे. तर गाभाऱ्याच्या ललाटावर गणपती. गाभारा काहीसा खोलगट आणि आत शिवपिंड. पिंडीवर वरच्या शिखराच्या दगडातून सुंदर प्रकाशझोत येतो. मंदिराच्या आजूबाजूला काही स्मृतीशिळा विखुरलेल्या आहेत. अधूनमधून गावकऱ्यांचा मंदिरात वावर असतो.

१९७२ साली पवना धरण झाल्यावर हे मंदिर पाण्यात गेले. त्यामुळे गावात एक नवीन मंदिर बांधले गेले. त्या मंदिरात एक सुंदर असे शिल्पनवल आहे. शेषशायी विष्णूची सुंदर मूर्ती नवीन मंदिराच्या एका भिंतीत बसवली आहे. मूळची मूर्ती खूप देखणी असणार. मात्र वर्षानुवर्षे ऊन-वारा-पाऊस आणि दुर्लक्ष यामुळे मूर्तीची काही प्रमाणात झीज झालीये. तरीही मूर्तीचे सौंदर्य काही लपत नाही. शेषाच्या वेटोळ्यावर आडवे पहुडलेले भगवान विष्णू. त्यांच्या पायाशी देवी लक्ष्मी. त्यांच्या नाभीतून कमळ वर आलेले आणि त्यात असलेले ब्रह्मदेव, डोक्याशी काही देवता असा सर्व थाट असलेली सुंदर मूर्ती इथे आहे. गेल्या रविवारी स्थानक अशी सुंदर विष्णूमूर्ती बघितली. आज तितकीच देखणी शयन विष्णूमूर्ती बघायचा योग आला. पुण्यापासून फक्त ५० कि.मी. अंतरावर असलेले हे वाघेश्वर मंदिर आणि तिथली ही देखणी मूर्ती. अर्ध्या दिवसात अगदी सहज बघता येते. आजूबाजूचा रम्य परिसर आणि तुंग-तिकोना सारख्या किल्ल्यांचा सहवास उन्हातली भटकंती सुसह्य करतो. सलग दोन रविवारी अनगड जागी विष्णूचे दर्शन.....देवाक काळजी दुसरं काय ... !!!

- आशुतोष बापट