किल्ले सिंहगड उर्फ कोंढाणा

सिहंगड किल्ल्याचे मूळ नाव कोंढाणा. किल्ल्याचा सर्वात जुना उल्लेख १३५० साली लिहिल्या गेलेल्या शहनामा इ हिंद या काव्यात 'कुंधाना' असा येतो.

किल्ले सिंहगड उर्फ कोंढाणा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

पुणे जिल्ह्याच्या पश्चिम दिशेवरून सह्याद्री पर्वताची मुख्य रान दक्षिणोत्तर गेली आहे. सह्याद्रीच्या याच मुख्य धारेतून एक फाटा पुण्याच्या किंचित दक्षिण दिशेहून पूर्वेकडे सरकला आहे ज्यास भुलेश्वर रांग असे नाव आहे. याच भुलेश्वर डोंगररांगेत पुरंदर व सिंहगड हे दोन बेलाग दुर्ग पुणे परिसराचे पुरातन काळापासून संरक्षण करीत उभे आहेत. सिंहगड हा किल्ला पुण्याच्या नैऋत्य दिशेस अदमासे २३ किलोमीटर असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून १३१८ मीटर आहे.

शहाजी महाराजांच्या जहागिरीत इंदापूर, पुणे, सुपे व चाकण हे चार परगणे होते. हा मुलुख म्हणजे इंदापूर, भीमथडी, दौंड, पुरंदर व हवेली हे सध्याचे तालुके व भिमानदीच्या दक्षिणेकडील खेड तालुकायचा पूर्वभाग यामधील मुलुख. या जहागिरीचे मालक शहाजीराजे व त्यांचे येथील मुतालिक म्हणून दादोजी कोंडदेव हे काम पाहात. 

शिवाजी महाराज बंगळूरहून पुण्यास आले तेव्हा त्यांनी १२ मावळे काबीज कारण्याकडे आपले लक्ष्य केंद्रित केले. शिवाजी महाराजांनी बापूजी मुद्गल देशपांडे नऱ्हेकर यांच्यासोबत कोंढाण्यावर व पुरंदरावर कब्जा केला. आदिलशाही दरबारात शिवाजी महाराजांनी भुलेश्वर रांगेतील महत्वाचे दुर्ग ताब्यात घेतल्याचे समजताच अस्वस्थता माजली.

यानंतर आदिलशाही दरबाराकडून शिवाजी महाराजांचे पारिपत्य करण्यासाठी बाजी घोरपडे व खंडोजी घोरपडे याना धाडण्यात आले मात्र शिवाजी महाराजांनी त्यांना पिटाळून लावले. हे पाहून विजापूर दरबारने फलटणहून निंबाळकर यांना धाडले तेव्हा शिवाजी महाराजांनी थेट फलटण वर चाल केली. यानंतर शिवाजी महाराजांचा पराक्रम पाहून अनेक आदिलशाही किल्लेदारांनी फारसा विरोध न करता अनेक किल्ले शिवाजी महाराजांच्या स्वाधीन केले.

सिहंगड किल्ल्याचे मूळ नाव कोंढाणा. किल्ल्याचा सर्वात जुना उल्लेख १३५० साली लिहिल्या गेलेल्या शहनामा इ हिंद या काव्यात 'कुंधाना' असा येतो. गडावर प्राचीन काळापासून कौडिंण्य ऋषीचे देवालय आहे यावरूनच किल्ल्यास कोंढाणा असे नाव मिळाले असे म्हटले जाते. 

किल्ल्यावरील कौडिंण्य ऋषीचे देवालय, पुरातन गुफा व शैलगृहे पाहून किल्ला अतिशय प्राचीन असल्याची कल्पना येते. सुरुवातीस मुहम्मद तुघलक याने नागनायक या कोळी सरदाराच्या ताब्यातून सिंहगड ताब्यात घेतला. त्यानंतर ३०० वर्षांनी शहाजी महाराज या प्रांताचे शासक झाले. शिवाजी महाराजांनी मावळ प्रांतात हालचाली सुरु केल्याने त्यांना शहाजी महाराजांचा छुपा पाठिंबा असावा या संशयाने आदिलशहाने त्यांना कैदेत ठेवले व त्यानंतर झालेल्या तहात शिवाजी महाराजांना सिंहगड आदिलशाहास द्यावा लागला मात्र शहाजी महाराजांची सुटका झाल्यावर त्यांनी तो पुन्हा एकदा जिंकला व त्याचे नाव सिंहगड ठेवले.

महाराजांनी किल्ल्याचे नाव सिंहगड ठेवण्यामागे हा किल्ला दुरून पाहिल्यास आपल्या सावजावर नजर ठेवून शांत बसलेल्या सिंहासारखा दिसतो हे सुद्धा असू शकेल. पुरंदरच्या तहात पुन्हा एकदा हा किल्ला शिवाजी महाराजांना मुघलांना द्यावा लागला यानंतर थेट १६७० साली नरवीर तानाजी मालुसरे यांनी जीवाची आहुती देऊन हा किल्ला पुन्हा एकदा स्वराज्यात आणला. 

सिंहगडावर जाण्यासाठी दोन प्रमुख मार्ग आहे एक डोणजे या गावावरून व दुसरा दक्षिणेकडील कल्याण या गावातून. डोणजापासून किल्ला ७०० मीटर उंच आहे तर कल्याणहून ४०० मात्र अनेक जण डोणजे पासून किल्ला सर करणे पसंद करतात याशिवाय पायथ्यापासून एक पक्की सडक थेट वरपर्यंत जात असल्याने हा किल्ला अधिकच सोपा होऊन गेला आहे. 

डोणजे गावातून माथ्यावर आल्यास प्रथम दिसतो खांदकडा..या खांदकड्याच्या पुढे पुणे दरवाजा लागतो. पुणे दरवाज्यातून आत गेल्यास डाव्या बाजूस पाण्याची टाकी दिसून येतात ज्यांना घोड्यांच्या पागा असे नाव आहे. यानंतर गणेश टाके, रत्नशाळा, हनुमान मंदिर अशी ठिकाणे पाहता येतात. उजव्या बाजूस नजर टाकल्यास दारुखान्याचे कोठार इमारत दिसून येते जी सुस्थितीत आहे.

पश्चिम दिशेहून पुढे चालत गेल्यास गडाचा बालेकिल्ला लागतो ज्यावर कौंडिण्येश्वर मंदिर, तानाजी मालुसरे यांची छत्री, अमृतेश्वर मंदिर, देव टाके पाहता येते. डाव्या बाजूस कल्याण दरवाजा दिसून येतो. पश्चिम दिशेकडून तटबंदी पकडून आपण उजव्या बाजूस प्रवास सुरु केला की डोणागिरीच्या कडा दिसून येतो (हाच कडा चढून तानाजी मालुसरे व मावळे गडावर आले होते)

तेथून पुन्हा एकदा उत्तर दिशा पकडली की शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराजांची समाधी दिसून येते. या मंदिरात पूर्वी दोन शिवलिंगे व राजाराम महाराजांच्या पादुका होत्या मात्र आता त्या तिथे आहेत का याची कल्पना येत नाही.

सिंहगडास वनविभागाने उपवनाचा दर्जा दिल्याने व पक्क्या सडकेचा मार्ग निर्माण झाल्याने अनेक पर्यटक किल्ला पाहण्यास येत असतात. पुण्यातील आरोग्य प्रेमी तर दर शनिवार रविवार पायथ्यापासून माथ्यावर चढून पुन्हा खाली येणे असा व्यायाम नियमित करतात. गडावर तूर्तास रात्री राहण्यास बंदी असली तरी दिवसभरात अनेक उपाहारगृहे येथे सुरु असतात. येथील पिठलं भाकरी, दही आणि ताक यांची चव अगदी अप्रतिम. 

सिंहगड हा खरं तर अतिशय बेलाग दुर्ग मात्र हल्ली थेट माथ्यापर्यंत जाण्याची सोय झाल्याने नव्या पिढीस याची दुर्गमता कदाचित लक्षात येणार नाही. एकेकाळी दाट जंगलात डरकाळ्या फोडणारा वनराज आता पाळीव सिंह झाल्यासारखा वाटतो मात्र गडावर काही काळ थांबून इतिहासात डोकावून पहिले असता सिंहगडाची महती खऱ्या अर्थाने पटते व आपले माथे आपोआप या गडाच्या पवित्र अशा मातीवर टेकले जाते.