छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ - वढू बुद्रुक

छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य समाधीस्थळ हे तटबंदी युक्त असून समस्त मराठी व हिंदू जनांचे श्रद्धास्थान आहे. 

छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ - वढू बुद्रुक

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

पुणे जिल्ह्यातील वढू व तुळापूर ही दोन गावे महाराष्ट्राची धारातीर्थे आहेत कारण तुळापूर येथे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांनी अखेरचा श्वास घेतला आणि वढू या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची क्रूरपणे हत्या करवल्यानंतर त्यांच्या देहाचे तुकडे केले होते मात्र वढू गावातील शूर ग्रामस्थांनी मोठ्या धाडसाने महाराजांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले त्या शूर शिवले आणि देशमुख घराण्यातील वीर पुरुषांचे स्मारक आपल्याला येथे पहावयास मिळते. 

छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य समाधीस्थळ हे तटबंदी युक्त असून समस्त मराठी व हिंदू जनांचे श्रद्धास्थान आहे. 

महाराजांच्या समाधी परिसरात प्रवेश केल्यावर आपल्याला प्रथम दिसते ती स्वामीनिष्ठ कवी कलश यांची समाधी.

कवी कलश यांनी छत्रपती संभाजी महाराजांसोबत मृत्यूला निर्भयपणे कवटाळले होते.

समाधी स्थळाच्या मध्यभागी शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ आहे. 

अंगावर रोमांच आणणाऱ्या या स्थानाचे दर्शन घेण्यासाठी दूरदूरहून शिवभक्त येथे येत असतात व आपल्या लाडक्या छत्रपतींना श्रद्धांजली अर्पित करीत असतात. 

छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ या समाधीचे निर्माण केले आणि नैवेद्य, तूप आदींसाठी आणि अन्नछत्रासाठी इनाम जमीन देऊन या स्थळाची चोख व्यवस्था ठेवली होती.  

समाधीच्या समोर छत्रपती संभाजीमहाराजांचे भव्य स्मारक व पुतळा आहे. 

समाधी परिसरात एक मोठे सभागृह असून यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्राचा वेध घेणाऱ्या चित्रांचे दालन आहे याशिवाय या सभागृहात शिवशंभु कालीन शस्त्रांचे संग्रहालय सुद्धा आहे. 

१९९३ साली स्थापन झालेली धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समिती महाराजांच्या समाधी स्थळाच्या विकासासाठी कार्यरत आहे.  

१६८० ते १६८९ या काळात सातत्याने मोगल, सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज आदी स्वराज्याच्या शत्रूंशी सातत्याने लढा देऊन स्वराज्याचे रक्षण करणाऱ्या आणि धर्मासाठी व स्वराज्यासाठी प्राणाचे त्याग करणाऱ्या छत्रपती संभाजीमहाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेणे हे प्रत्येक हिंदूंचे कर्तव्यच आहे.