श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान कणेरी मठ कोल्हापूर

कोल्हापूरपासून अदमासे १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या कणेरी मठ येथील श्री काडसिद्धेश्वर हे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान कणेरी मठ कोल्हापूर
श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान कणेरी मठ कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यातील अगणित अशा प्रसिद्ध स्थळांपैकी एक स्थळ म्हणजे श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान अर्थात कणेरी मठ.

कोल्हापूरपासून अदमासे १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या कणेरी मठ येथील श्री काडसिद्धेश्वर हे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

या मंदिराची निर्मिती चौदाव्या शतकात झाली. अदमासे पाचशे वर्षांपूर्वी श्री काडसिद्धेश्वर महाराज यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला व तेव्हापासून हे मंदिर श्री काडसिद्धेश्वर या नावाने ओळखले जाते.

मंदिराची वास्तुशैली अप्रतिम असून सभागृहाच्या मध्यभागी चार खांब असून त्यामध्ये भव्य असा नंदी पाहावयास मिळतो. गर्भगृहात श्री काडसिद्धेश्वराचे जागृत शिवलिंग स्थानापन्न आहे.

काडसिद्धेश्वर हे मंदिर श्री सिद्धगिरी मठाच्या मध्यभागी असून मंदिराचे प्रांगण भव्य आहे.

मुख्य मंदिराच्या शेजारीच आणखी एक शिवमंदिर आहे. या मंदिराचा निर्मिती काळ काडसिद्धेश्वर मंदिराच्या निर्मिती काळाएवढाच असावा असे मंदिराच्या वास्तुशैलीवरून जाणवते.

मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंग दिसून येते. मंदिराचा बाह्यभाग हेमाडपंथी वास्तुशैलीचे अप्रतिम उदाहरण आहे.

श्री सिद्धगिरी मठाच्या आसमंतातील श्री गुरुदेव ध्यानमंदिर सुद्धा एक अनोखा अनुभव देते. ध्यान मंदिरात आपल्याला गुरुदेवांची ध्यानस्थ मूर्ती पाहावयास मिळते. 

गुरुदेव ध्यानमंदिराची वास्तू ही अतिशय भव्य व सुरेख असून येथील वातावरण आपल्याला निरव शांततेची अनुभूती देते.

श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान अर्थात कणेरी मठ हे खऱ्या अर्थी एक प्राचीन स्थान असून भारतीय संस्कृतीची शिकवण देणारे एक तीर्थक्षेत्र आहे.

भारतीय संस्कृतीची ओळख करून घ्यावयाची असल्यास कणेरी मठास एकदातरी भेट द्यायलाच हवी.