बुरुंबाडचा आमनायेश्वर

सर्वत्र गर्द झाडी...फक्त पक्षांचे आवाज....बाकी नीरव शांतात...एका बाजूने डोंगररांग...दुसरीकडे निवळशंख पाण्याचे तळे...तळ्याच्या काठावर उभे असलेले प्राचीन देखणे शिवालय... निसर्गाची उधळण असलेल्या कोकणात असे ठिकाण असल्यावर तिथून पाऊल हलत नाही.

बुरुंबाडचा आमनायेश्वर

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

मंदिर तरी किती सुंदर...त्याच्यावर असलेले मूर्तिकाम काहीसे निराळे आणि तितकेच सुबक. चिपळूणवरून संगमेश्वरला जाताना वाटेत लागते आरवली. तिथे आहेत गरम पाण्याचे कुंड आणि सूर्यमंदिर. तिथून अगदी जवळ असलेले बुरुंबाड आणि तिथला देव आमनायेश्वर. याची उत्पत्ती तरी किती छान. आम्नाय म्हणजे वेद. वेदांचा ईश्वर तो आमनायेश्वर. दुसरी उत्पत्ती तितकीच सुंदर. जास्त पटणारी. पूर्वी या भागात आमणीच्या झाडांचे वन होते. या आमणीच्या झाडांमध्ये वसलेला देव तो आमनायेश्वर. ही आमणीची पाने जेवण वाढून घ्यायला वापरतात. यात मिळणाऱ्या टॅनिनचा कातडे कमावून रंगवण्यासाठी उपयोग होतो. ‘ऱ्हस मेसुरेन्सिस’ हे याचे शास्त्रीय नाव... असो...तर अनेक शिवालयांशी निगडीत असलेली कथा इथेही सांगितली जाते.

शिवशर्मा नावाच्या ब्राह्मणाची गाय चरायला गेल्यावर एका ठिकाणी दुधाची धार सोडी. शिवशर्म्याने त्या दगडावर पहारीचा घाव घातला. एक कळपा उडाला तो गड नदीच्या कातळावर पडला आणि झाला कळपेश्वर. दुसरा पडला तो नदीच्या पलीकडे असलेल्या कळंबुशी गावात. तो झाला कळंबेश्वर. मधला भाग बुरुंबाडलाच राहिला, त्यातून रक्त वाहू लागले. शिवशर्म्याला आपली चूक कळून आली. त्याने शिवाची प्रार्थना केली आणि रक्त वाहणे बंद झाले..तोच हा आमनायेश्वर.

या मंदिराचा बराचसा भाग हा गोविंदपंत बुंदेले (खेर) यांनी बांधला. बुंदेले इथले जमीनदार होते. देवळाच्या बाजूलाच मोठा तलाव. कदाचित इथलाच दगड वापरून हे मंदिर बांधले असणार. या देवाने अनेकांना दृष्टांत दिल्याचे इथे सांगितले जाते. याच्या गाभाऱ्यात शिवपिंडीवर अभिषेक करताना सारंगीसारखा आवाज येतो. याला सिंहनाद म्हणतात. हा सिंहनाद ऐकायला दुसरे बाजीराव पेशवे इथे आले होते, पण त्यांना तो ऐकायला आला नाही. मंदिरावर पायात वाघ आणि तोंडात हत्ती धरलेला गंडभेरुंड पक्षी, पाच तोंडे आणि एकच धड असलेली गाय, माणसाचे तोंड, घोड्याचे शरीर आणि मोराचा पिसारा असलेला काल्पनिक प्राणी ही आणि अशी विविध सुंदर शिल्पे कोरलेली आहेत. मंदिराची दीपमाळ डौलदार असून त्याचे हात म्हणजे हत्तीची तोंडे आहेत. मंदिरातून बाहेर पडणारे अभिषेकजल वाहून जाण्यासाठी नुसते गोमुख नसून अखंड गायच कोरलेली आहे. भावे, साठे, मालशे, भागवत, खांडेकर, पटवर्धन, नामजोशी, खरे, सहस्रबुद्धे अशा अनेक चित्पावन मंडळींचा हा देव. आडरानात असला तरी आपले देखणेपण टिकवून असलेला हा आमनायेश्वर परिसर डोळ्यासमोरून हलत नाही.

- आशुतोष बापट