उध्दर रामेश्वर - येथे झाले होते रावण व जटायूचे युद्ध

लक्ष्मणा...सीते...' तो आर्त स्वर ए॓कून सीता भयभीत झाली. रामाला काहीतरी अपघात झाला असला पाहिजे, या कल्पनेने घाबरलेल्या सीतेने लक्ष्मणाला रामाच्या मदतीला जाण्याचा आग्रह चालविला.

उध्दर रामेश्वर - येथे झाले होते रावण व जटायूचे युद्ध

अनेकवार सांगूनही लक्ष्मण रामाकडे जाण्यास तयार होईना, उलट राम अजिंक्य आहे असे सांगून लक्ष्मण सीतेची समजूत काढू लागला. अखेर डोळ्यातील पाणी पुसून तो नाईलाजाने रामाकडे निघून गेला, आणि थोडयाच वेळात संन्यासाच्या वेशात रावण तेथे आला. सीतेच्या लावंण्याने मोहित झालेल्या रावणाने आपले खरे स्वरुप दाखवून तिला आपल्याबरोबर चलण्यास सांगितले, सीता बधत नाही हे पाहून रावणाने तिला जबरदस्तीने उचलून रथात ठेवले आणि तो आकाशमार्गे निघाला. सीता रामाचा धावा करु लागली. जटायूने सीतेचा आवाज ए॓कला. तिच्या रक्षणासाठी तो रावणावर धावून गेला. तेथे रावणाची आणि जटायूची चांगलीच झटापट झाली. जटायूने रावणाचा रथ मोडला, घोडे ठार केले तर रावणाने जटायूचे दोन पंख कापून जटायूला निरस्त्राण केले आणि सीतेसह तो आकाशात उडाला.

संस्कृत वाल्मिकी रामायणातील ही कथा बर्‍याच जणांना माहीत आहे. ही कथा येथे नमूद करण्याचे कारण म्हणजे रावणाने जटायूला ठार करुन ज्या डोंगरावरुन सीतेसह उड्डाण केले त्या उध्दर रामेश्वर डोंगरावर मी अलिकडेच जावून आलो. आजही दंड्कारण्याची आठवण करुन देणारा हा परिसर असून येथे रावण-जटायू युध्दाच्या काही खुणा अजूनही अस्तित्वात आहेत. रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील पालीपासून चौदा कि.मी. व नागोठण्यापासून वाकण-पाली मार्गे १९ कि.मी. अंतरावर हे रामेश्वर हे देवस्थान आहे.

आदमासे सहाशे फूट उंच असलेल्या या टेकडीवर ३०० वर्षापूर्वीचे किंवा त्याहून अधिक वर्षापूर्वीचे जागृत देवस्थान श्रीरामेश्वर मंदिर आहे. येथे दोन कुंड आहेत, पुढे सीतेचा राम शोध घेत असताना जखमी अवस्थेत जटायू राम... राम... करीत शेवटच्या घटका मोजत असल्याचे रामाला याच ठिकाणी दिसला. त्याने रावण कुठच्या दिशेने सीतेला घेऊन गेला आहे हे रामाला सांगितले आणि प्राण सोडला... पुढे रामाने याच ठिकाणी जटायूचे उत्तरकार्य (उध्दर) केले म्हणून त्यावरुन गावाला उध्दर हे नाव पडले व मंदिरास उध्दर रामेश्वर हे नाव पडले अशी एक दंतकथा आहे.

उध्दर हे गाव या मंदिरापासून फक्त दोन कि.मी अंतरावर डोंगराच्या पायथ्याशी आहे तेथेही एक कुंड आहे. या रामेश्वर मंदिरासाठी उध्दर गाव व डोंगर इनाम आहे. येथे असलेल्या श्रीरामेश्वर अष्टकोनी देवळासमोर सभामंडप ९.१४४ मी. उंचीची एक दीपमाळा आहे. देवळाच्या भिंतीवर वेगेवेगळ्या देवीच्या मूर्ती कोरल्या आहेत. प्रवेशदारासमोर एक नंदी आहे. आत गाभार्‍यात एक नंदी आहे. तो एकाच वेळी उचलला तर मनातील इच्छा पूर्ण होतात असे ए॓कायला मिळाले. मंदिर पूर्व-पश्चिमाभिमुख असून मंदिराच्या उजव्या बाजूस काळभैरवाचे ठिकाण आहे. विषारी सर्प चावलेल्यांना या ठिकाणी आणल्यावर त्यांचे विष उतरते. या ठिकाणी विषबाधा झालेल्या अनेकजणांना आणले जाते व सापाचे विष उतरविले जाते व असे बरेच लोक ठिकठिकाणाहून येत असतात. श्री रामेश्वर मंदिरात जाण्यापूर्वी श्री भवानी मातेचे मंदिर लागते. तेही देवस्थान जागृत आहे. आम्ही गेलो त्या दिवशी देवीला मानपान देण्याचा कार्यक्रम येथे होता.

रामेश्वर मंदिराच्या उत्तरेकडील बाजूवर पुढीलप्रमाणे शिलालेख आहे.

श्री सोमेश्वर चरणी तत्पर शिवरामभक्त चित्राव पुणेकर, बांधीले मनोहर रामेश्वर देवाचे

म्हणजे या पुरातन असलेल्या मंदिराचा जीर्णोध्दार फार पूर्वी म्हणजे शके १६६५ मध्ये झाल्याचे या शिलालेखावरुन जाणवते. मंदिराच्या दक्षिण बाजूस एका कोनाडयात अस्तिक ॠषींच्या पादुका आहेत. त्यासमोर एक शिळा आहे, महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. खाली उध्दरला नदिच्या काठी रामेश्वराचे देऊळ आहे, त्यास खालचा रामेश्वर असे म्हणतात. रामेश्वर येथील कुंडात दशक्रिया विधी आणि अस्थी विसर्जन केले जाते. यांत्रिक युगात माणसाची धावपळ वाढल्याने एवढया उंच ठिकाणी येण्यापेक्षा शारीरिक त्रास व वेळ वाचवण्यासाठी अनेक लोक खाली उध्दर येथेच अस्थींचे विसर्जन करतात. अर्थात ज्यांची श्रध्दा आहे असे लोक वेळ व दिवस घालवून डोंगर चढून येथे मोठया प्रयासाने येऊन श्रध्दापूर्वक विधी करतात.

चोरगे नावाचे रामेश्वर येथील नागरिक येथे भेटले. ते म्हणाले, गेल्या तीन वर्षात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पर्यटनासाठी काही स्थळे पर्यटन स्थळे म्हणून घोषित केली परंतु उध्दर रामेश्वरकडे शासनाने जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे. या मंदिराकडे येणार्‍या रस्त्यांचा पत्ता नाही. गवतातून, शेतातून आणि बैलगाडी मार्गातून या मंदिर ठिकाणाचा शोध घ्यावा लागतो. महागावापासून मंदिरापर्यंत असलेल्या आठ किलोमीटरच्या अंतरावर वस्ती नाही त्यामुळे नवखा बिचकून जातो. ता मार्गावर दिशादर्शक फलक लावले तर येणारे लोक गोंधळून जाणार नाहीत. अनेकवेळा देऊळ येथे आहे... देऊळ जवळ आलं... देऊळ परत लांब गेलं... देऊळ तिकडे आहे... असे होऊन गोंधळल्यासारखे होते. काहीजण देऊळ मार्ग शोधण्यासाठी रोजगारावर एखादा आदिवासी बांधव सोबत घेऊन त्याच्याकडून या मार्गाचा शोध घेतात्.पण हा बांधव मिळाला नाही तर परत पंचाईत. मार्गावर अनेक ठिकाणी जाळ्या, काटे, दगड, झुडुप यांना सामोरे जाऊन मंदिराकडे जावे लागते.

हे मंदिर रस्त्यापासून थोडे खोलगट भागाकडे असल्याने मंदिराकडे जाताना बराच उतार व येताना चढ लागतो व त्यामु़ळे वृध्द माणसाला देखील मंदिराकडे जाताना व येताना ढेपाळत, ठेचाळत यावे-जावे लागते, त्यासाठी शासनाने पायवाटेपासून मंदिराकडे छोटया छोटया पायर्‍या बांधल्या तर हा मार्ग खर्‍या अर्थाने सुखकारक होईल. तेथील पाणी नैसर्गिक असल्याने या पाण्याला एक विशिष्ट गोडवा आहे. मंदिराकडे जाताना लागणारे कुंड मुसळधार पावसामुळे व दरडी कोसळल्यामुळे नादुरुस्त झाले आहेत. त्याकडे दुर्लक्ष आहे. यातील दुसर्‍या कुंडात जटायूचा पंजा व रामाच्या बाणाची खूण आजही अस्तित्वात आहेत पुरातत्व खात्याने या पौराणिक वास्तूची जपणूक केली पाहिजे, परंतु हे होत नाही. दुसर्‍या कुंडातून खाली उध्दरला नैसर्गिकरित्या पाईपलाईनव्दारे पाणीपुरवठा केला आहे. परंतु त्यासाठी कुंडाशेजारी बांधलेली पाणी साठवण टाकी गाळाने पूर्णपणे भरुन गेल्याचे दिसते. उध्दरला भविष्यात पाण्याद्वारे रोगराईचा पुरवठा झाला तर या टाकीमुळेच होईल याची जाणीव सुधागड येथील आरोग्य खात्याला नाही. एरवी ट्रकच्या ट्रक जंगल तोडुन नेणार्‍यांकडे दुर्लक्ष करणारे वनखाते हल्ली फॉरेस्ट डिपार्टमेंट या नावाखाली विकास कामांना पायबंद घालीत आहेत. त्यामुळे अगोदर आळशी असलेले हे प्रशासन डिपार्टमेंटकडे बोट दाखवून आपआपल्या विकासाच्या जबाबदार्‍या झटकत आहेत, हे या दौर्‍यात पाहावयास मिळाले.

या दौर्‍यात जी.ए. नावाचे संतवृत्तीचे बाहेरशिव येथील गृहस्थ भेटले, त्यागी वृत्तीने संसाराचा त्याग करुन त्यांनी या देवळात व मंदिराजवळ रामेश्वर गावात वास्तव्य केले आहे. देवळात बसून देवाच्या चार ओळी वाचणे यात मला मानसिक समाधान मिळते असे त्यांनी सांगितले. नागोठण्याच्या अनेक जुन्या माणसांच्या आठवणी त्यांनी या भेटीत सांगितल्या. ज्या मित्राच्या विधीसाठी येथे गेलो होतो त्या शरद महिमकरांच्या डोळ्यात पाणी आणणारी आदरतिथ्याची घटनाही त्यांनी सांगितली. आणि तो गेल्याचं कळताच त्यांनाही गहिवरुन आले. पाऊस, वारा, थंडी, उन्हाळा याची पर्वा न करता जगणार्‍या या गृहस्थांच्या संन्यासी वृत्तीचे आश्चर्य वाटले. सोबत असलेले भाई टके, वसंत तेरडे, मामा शहासने, राजेश पोवळे, भाई ठोंबरे व महिमकर बंधूंनाही या त्यागी वृत्तीचे कौतुक वाटले. त्यांनी या ठिकाणी येणारे अनेक मार्ग सांगितले. नागोठण्याहून वासगाव मार्गे, घोडगाव मार्गे, भरणी मार्गे, कार्ली मार्गे, उध्दर मार्गे या ठिकाणी येण्यास पायी रस्ते आहेत. त्यासाठी वेळ किती लागतो याचीही माहिती त्यांनी दिली. नागोठणे गावाच्या मागच्या बाजूला जो डोंगर दिसतो त्याच्या पलिकडे सरळ रेषेत उध्दर रामेश्वर हे देवस्थान आहे. सध्या मोटारीने पाली येथे जाऊन महागाव मार्गे या ठिकाणी जाता येते, परंतु या मार्गात महागावपासून अडचणी नसल्या तरी दिशादर्शक फलक या ठिकाणी लावले तर खर्‍या अर्थानं हा निसर्गाचे सान्निध्य देणारा प्रवास सुखकारक होईल, हे या प्रवासात जाणवले. बर्‍याच लोकांना इच्छा असूनही येथे मार्ग माहीत नसल्याने जाता येत नाही. शासनकर्त्यांनी या स्थळास पर्यटन स्थळाचा दर्जा देऊन हे स्थळ जनतेसमोर आणावे. तसे झाले तर खर्‍या अर्थाने सुधागड तालुक्याला पर्यायाने रायगड जिल्ह्याला न्याय मिळेल हा विश्वास वाटतो. परंतु शासनाच्या गेल्या तीन वर्षातील घोषणा पाहिल्या की, शासन या स्थळाला न्याय देईल हा विश्वास वाटत नाही. राम सीतेचा शोध घेत आहे आणि सध्याच्या युगात जटायूची भूमिका माझ्यासारख्या पत्रकाराला घ्यावी लागत आहे, परंतु शासनाच्या हृदयात राम असेल तर हे पर्यटन स्थळ होणे शक्य आहे. तोपर्यंत उध्दर रामेश्वर हे स्थळ पर्यटन स्थळ होण्यासाठी राम... राम... म्हणूया ...uddhar rameshwar

- नवीन सोष्टे (लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)