नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे रहस्य

समस्त भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे कोडे ७५ वर्षे झाली तरीही सुटलेले नाही. त्यांच्या मृत्यूच्या अनेक थेअर्‍या मांडल्या गेल्या व मांडल्या जात आहेत. यापैकी सर्वाधिक प्रचलीत थेअरी म्हणजे त्यांच्या विमान अपघातात झालेला मृत्यू.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे रहस्य
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे रहस्य

याशिवाय नेताजी १९४५ नंतरही जिवंत असून त्यांनी पुढील काळ अज्ञातवासात काढला अशीही बाष्कळ कथा पसरवली गेली व या कथेचा मी निषेध करेन कारण नेताजी कुणी सामान्य आसामी नव्हते. ब्रिटीशांचे शासन भारतासहित इतर अनेक राष्ट्रांवर असताना त्यांनी त्यांच्याविरोधात बंड पुकारून दुसर्‍या महायुद्धात उडी घेतली व जर्मनी व जापान सारख्या राष्ट्रांच्या सहाय्याने भारतभुमीस स्वतंत्र करण्यासाठी आझाद हिंद सेनेसारखी प्रबळ सेना उभारली ते नेताजी ब्रिटीश भारतातून गेल्यावरही अज्ञातवासात राहतील ही कल्पनाही मनास न पटणारी किंबहूना त्यांच्या प्रतिमेचा अपमान करणारी आहे. या व्यतिरिक्त त्यांना रशियामध्ये पकडण्यात येऊन मृत्यूदंड दिला गेला असे दावेही काही अभ्यासकांकडून करण्यात आले. मात्र या लेखात मी जे मांडणार आहे ते थोडे वेगळे आणि धक्कादायक आहे.

नेताजींच्या मृत्यूसंदर्भातील अनेक कागदपत्रे आजतागायत लपवण्यात आली. तत्कालीन सरकारच्या काळात ती जाहिर केली गेली नाही यामागे काय कारणे असावीत माहित नाही मात्र सध्याही पुर्णतः ही कागपत्रे उजेडात आणण्यात का येत नाही हा प्रश्नच आहे? नेताजींच्या कुटूंबियांनी अनेकदा ही मागणी केली की स्वतः पंतप्रधानांनी नेताजींच्या मृत्यूचे खरे कारण टाकून या वादावर पडदा टाकवा मात्र त्यांची ही विनंती ही अमान्य करण्यात आली. नेताजींचे वंशज चंद्रा बोस २०१९ साली याबाबत म्हणाले होते की

"I am confident that Prime Minister Narendra Modi is committed to unravelling the Netaji disappearance mystery. But I am not sure whether the entire government is interested in doing that. We (Netaji's family) demand that the prime minister should immediately form a SIT to unravel the mystery,"

स्वातंत्र्यापासून आजतागायत नेताजींच्या मृत्यूचे गुढ लपवण्यामागे त्यांच्या मृत्यूचा अमेरिकेसोबत असलेला संबंध हे तर कारण नव्हे? या वाक्यावर अनेकांच्या भुवया उंचावतील हे मला माहित आहे कारण अनेक खोटे दावे पसरवून हा दावा लोकांच्या नजरेआड करण्याची गोबेल्सनिती वापरण्यात काही माणसे यशस्वी झाली आहेत. अमेरिकेवर अनेक वर्षांपासून असलेले आपले अवलंबित्व हे यामागचे मुख्य कारण असावे. आता हा दावा मी कुठल्या जोरावर करतोय असा प्रश्न अनेकांना पडेल तर त्याचा उलगडाही करतो..

अमेरिकेतले लुईस लॉचनेर हे एक प्रख्यात नाव. १९०७ सालापासून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. अमेरिकेचा हा पत्रकार अनेक नाझी नेत्यांच्या संपर्कात असून हिटलरने अमेरिकेशी युद्ध जाहीर करेपर्यंत नाझी जर्मनीमध्येच होता. हिटलरचा उजवा हात गोबेल्स हा सुद्धा त्याला ओळखत असे. पुढे हिटलरचा पराभव होऊन त्याने आत्महत्या केल्यावर गोबेल्स नेही आत्महत्या केली मात्र त्याने लिहीलेली एक डायरी लॉचनेरच्या हाती लागली. पुढे त्याने ती डायरी स्वतः संपादन करुन प्रकाशित केली व त्या डायरीमध्ये काही टिपा दिल्या. या डायरीची पहिली आवृत्ती सन १९४८ साली प्रकाशित झाली व या डायरी मध्ये सुभाषचंद्र बोस यांचा ८ वेळा उल्लेख केला गेला आहे मात्र या डायरीतल्याच एका टिपणीत तो म्हणतो की,

"काही दिवसांनतर बोस जपानला गेले व तेथील अवहालानुसार अमेरिकन सरकारने त्यांना पकडले, त्यांची चौकशी केली व त्यांना शत्रूचे हस्तक म्हणून फाशी दिले"

हाच तो पुरावा जो पुलित्झर प्राईज विजेत्या अमेरिकेच्या लाडका पत्रकार लॉचनेर आपल्या डायरीमध्ये लिहीतो व हे वाक्य पहिल्या आवृत्तीनंतर आलेल्या सर्व आवृत्तींतून अचानक गायब होऊन त्याजागी नेताजींचा विमान अपघातात मृत्यू झाला या वाक्याने बदलले जाते हा प्रकार समजण्यापलिकडे आहे. लॉचनेरवर नक्की कोणाचा दबाव होता जो या पहिल्या आवृत्तीमध्ये लिहीलेल्या वाक्याच्या जागी भलतेच वाक्य नंतर घालतो? लॉचनर हा साधासुधा पत्रकार नव्हता दुसर्‍या महायुद्धात अमेरिकेसाठी त्याने जिव धोक्यात घालून शत्रुराष्ट्राकडील बातम्या अमेरिकेस दिल्या व अनेक वर्षे तुरुंगवासही भोगला.

अ‍ॅक्सीस पॉवर्सची संपुर्ण माहिती असलेल्या या पत्रकाराने नेताजींच्या मृत्यूशी स्वतःच्या प्रिय अशा देशाचाच संबंध लावलाय ही बाब खोटी नक्कीच नाही. लॉचनर च्या गोबेल्स डायरीची पहिली आवृत्ती दुर्मिळ जरी असली तरी नष्ट नक्कीच झालेली नाही त्यामुळे नेताजींच्या मृत्यूची तथाकथीत कारणे देणार्‍या तज्ञांना या बाबीकडे लक्ष देणे कसे शक्य झाले नाही हे कळत नाही..

भारत अमेरिका संबंध पुर्वी व सध्या कसेही असले तरी जी गोष्ट इतिहासात झाली आहे ती कुठलाही विधीनिषेध न बाळगता लोकांसमोर यायलाच हवी हा नियम आहे त्यानुसार आतातरी सरकारने अमेरिकेशी संपर्क करुन नेताजींसंबंधी जी काही कागदपत्रे आहेत ती उजेडात आणून नेताजींच्या मृत्यूमागील गुढ संपवावे ही अपेक्षा माझ्यासारख्या तमाम नेताजींवर प्रेम करणार्‍या भारतीयांची आहे.