जेव्हा एकविरा देवीच्या मंदिराचे झाले किल्ल्यात रूपांतर

राज्याच्या रक्षणासाठी बांधले जातात ते दुर्ग मग यामध्ये डोंगरी दुर्ग, जलदुर्ग, वनदुर्ग तसेच भुईकोट इत्यादी अनेक प्रकारांचा समावेश होतो. मात्र प्रतिकूल परिस्थिती असताना जर यापैकी एकही प्रकारचा दुर्ग आपल्या ताब्यात नसेल तर जे ठिकाण आपल्याला तळ देण्यास योग्य वाटते त्याच ठिकाणाचा दुर्ग बनवणे योग्यच आहे. आंग्रे काळात चक्क एका मंदिराचा किल्ला म्हणून उपयोग झाला होता हे आपणास ठाऊक आहे का? होय ही घटना अगदी खरी आहे..

जेव्हा एकविरा देवीच्या मंदिराचे झाले किल्ल्यात रूपांतर
जेव्हा एकविरा देवीच्या मंदिराचे झाले किल्ल्यात रूपांतर

कान्होजी आंग्रे यांचे नातू व मानाजी आंग्रे यांचे पुत्र सरखेल रघुजी आंग्रे यांचे १७९६ मध्ये निधन झाले. रघुजी आंग्रे यांना मानाजी आणि कान्होजी असे दोन पुत्र होते तसेच जयसिंग नावाचा एक दुसऱ्या पत्नीपासून झालेला एक पुत्र होता. रघुजी आंग्रे यांचा औरस पुत्र या नात्याने पेशव्यांनी अल्पवयीन मानाजीस सरखेली दिली व वयाने ज्येष्ठ असल्याने जयसिंगाची कारभारी म्हणून नेमणूक केली मात्र मानाजी व कान्होजी यांच्या मातोश्री आनंदीबाई यांना जयसिंगास कारभारीपद मिळणे रुचले नाही म्हणून जयसिंगास कैद करण्याचा त्यांनी कट केला आणि या कटानुसार जयसिंगास अचानक कैद करुन कुलाबा किल्ल्यात ठेवले. याशिवाय जयसिंगाची बायको सकवारबाई हिलासुद्धा राहत्या घरी नजरकैदेत ठेवण्यात आले.

मात्र सकवारबाई ही अतिशय हुशार होती, तिने कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली आणि अलिबागहून नागोठणे बंदरास जाऊन नागोठणे गावाचा किल्ला ताब्यात घेतला आणि नागोठण्यातून बंडाचा झेंडा उभारून ती आंग्रेंच्या राज्यात धुमाकुळ घालू लागली. जयसिंगानेसुद्धा या अराजकाचा फायदा घेऊन कुलाबा किल्ल्यातून आपली सुटका करून घेतली आणि थेट पुण्यास पेशव्याकडे आश्रयास गेला. मात्र या गृहकलहामुळे राज्याच्या कारभारात गोंधळ निर्माण झाला आणि लष्कर व आरमारामधील सैन्यास पगार मिळणे दुरापास्त झाले. पगार नसल्याने सैनिक लूटमार करून आपली उपजिविका चालवू लागले. 

अशा प्रकारची नाराज बंडखोर सैनिकांची दंगल प्रथम श्रीबागमध्ये झाली पण आंग्र्यांच्या एकनिष्ठ सैनिकांनी बंडाळी मोडून काढली. यानंतर सकवारबाई आपल्या मुलासह नागोठण्याहून चौलला एकवीरा भगवती मंदिराच्या  पायथ्याशी आली व या मंदिराचे तिने एका भक्कम किल्ल्यात रूपांतर करून तेथून ती मानाजी आंग्रे यांच्या सत्तेवर प्रहार करू लागली. ४ सप्टेंबर १७९६ मध्ये जयसिंग आंग्रे आणि नागोजी आंग्रे यांनी २००० सैन्यासह अलिबागचा ताबा घेण्यासाठी जोरदार हल्ला केला मात्र भयंकर पावसामुळे सैन्य जास्त चाल करू शकले नाही. यामुळे जयसिंग यांनी सेनेचे तीन भाग केले आणि एक तुकडी आपल्या सोबत घेऊन अलिबाग काबीज केले. यानंतर जयसिंग यांनी हिराकोट ताब्यात घेतला. त्यानंतर सागरगड घेतला आणि एकविरा भगवती मंदिराच्या तळावरून सकवारबाई त्यास हिराकोट येथे येऊन मिळाली.

या घटनेचा समकालीन उल्लेख पुढीलप्रमाणे आहे.. 

"शके १७१७ राक्षस नाम संवत्सरे माहे चैत्र वैद्य १२ प्रातःकाळी श्रीमंत मानाजी आंग्रे यांही जैशींग आंग्रे यांस अटक केले ते श्रावण वाद्य चतुर्दशीचे रात्री तोफेस दोर लावून निघाले ते किल्ले हिरेयांत (हिराकोट) गेले. नंतर अधिक भाद्रपद शुद्ध दशमीस किलेयातुन निघून दोनशे माणसांसह वर्तमान रेवदांडीयास दोहो तीही घटका रात्रीस आले ते काही दिवस रेवदांडीयास होते. येथे साहित्य सरमजाम करून पुण्यास गेले व तेतेही साहित्य करून खाली आले ते नागोठण्यास काही दिवस होते ते शके १७१८ श्रावण शुद्ध नवमी भृगुवारी रात्रीस श्री एकविरा देवालयी आले ते भाद्रपद शुद्ध ३ अलिबागेस जाऊन मुक्काम केला."

जयसिंग यांनी चौलजवळ परत एकदा मानाजींच्या सैन्याचा पराभव केल्याने मानाजी यांनी आपल्या साथीदारांसह महाड गाठले व पेशव्यांची मदत मागितली. मानाजी यांनी पेशव्यांकडून मदत मागितली हे जयसिंगास कळल्यावर त्याने ग्वाल्हेरला रहात असलेले शिंदे घराण्याचे सेनापती आणि आंग्रे घराण्याच्या शाखेचे बाबुराव यांच्याकडे मदत मागितली, बाबुराव या कार्यास त्वरित तयार झाले मात्र ही मदत करताना त्यांच्याही मनात वेगळाच बेत शिजत होता. अलिबागला रवाना होण्यापूर्वी त्यांनी पुणे दरबाराची संमती घेतली आणि ७०० सैनिक घेऊन रेवदंड्यास मुक्काम टाकला. १३ फेब्रुवारी १७९७ मध्ये बाबुराव आणि जयसिंग यांची लढाई समुद्र किनाऱ्यावरील साखर आणि अक्षी या दोन गावांमध्ये होऊन याला लढाईत बाबुरावांचा पराभव झाला.

यानंतर तहाची बोलणी करण्यासाठी मानाजी व जयसिंग यांची भेट  ६ मार्च १७९७ रोजी कुलाबा येथे झाल्या पण त्यांच्यात समेट होऊ शकला नाही. इथे नागोजी आंग्रे मानाजीस फितुर झाल्याचे कळल्यावर क्रोधाने जयसिंगाने नागोजीस जिवे मारले. ४ महिन्यानंतर ग्वाल्हेरच्या दौलतराव शिंदे यांनी आपले सरदार भावे यांस बंदुका आणि चारशे घोडेस्वार देऊन बाबुरावांच्या मदतीने कुलाबा सर करण्यास पाठवले. हे सैन्य प्रथम पुण्याहून निघून खंडाळ्यास थांबले. अलिबागला आल्यावर या सैन्याने हिराकोटला वेढा दिला मात्र जयसिंग या किल्ल्यातून गुप्तपणे निसटून रात्री नदी पोहत कुलाबा किल्ल्यावर आला. बाबुरावाने हिराकोट ताब्यात घेऊन मानाजी, कान्होजी आणि जयसिंग या तिघांनाही पकडले. 

मात्र जयसिंगाची शूर पत्नी सकवारबाईने जयसिंगाच्या मदतीस जाऊन खांदेरी किल्ला काबीज केला. इ. स. १७९९ मध्ये मानाजी आणि कान्होजी हे पुण्यास पळून गेले आणि काही पुण्याहून काही सैन्य मदतीस घेऊन परत आले. यावेळी बाबुरावाने खांदेरीस वेढा दिला पण यात त्याची बरीच माणसे मारली गेली. यानंतर परत एकदा बाबुरावांच्या सैन्याची आणि मानाजी व कान्होजींच्या सैन्याची गाठ चौल व नागोठणे येथे पडून तुंबळ युद्ध झाले आणि यात मानाजी आणि कान्होजी या दोन्ही भावांचा पराभव होऊन दोघांनाही कैदी बनवण्यात आले. 

या घटनेनंतर दुसरा बाजीराव याने बाबुराव यांना सरखेलपद दिले मात्र सरखेल पद मिळूनही बाबुरावांना खांदेरी किल्ला जिंकून घेणे अवघड होते कारण तो अद्याप जयसिंगाची पत्नी सकवारबाईकडे होता मात्र जमेची बाजू ही होती की जयसिंग हा बाबुरावाच्या ताब्यात होता. बाबुरावाने सकवारबाईला आमिष दाखवले की, जर खांदेरी आम्हाला द्याल तर मी जयसिंगास सोडेन. तेव्हा सकवारबाईने आपल्या पतीच्या सुटकेसाठी खांदेरी किल्ला बाबुरावांच्या ताब्यात दिला मात्र बाबुरावांनी जयसिंगास सोडून न देता ठार मारले आणि सकवारबाई व मुलांना  तुरुंगात टाकले मात्र या गडबडीत जयसिंगाचा मोठा मुलगा मुंबईस पळून गेला तो कायमचाच.