वीर बाजीप्रभू देशपांडे

आषाढ महिन्यात पन्हाळगडावर मुसळधार पाऊस सुरु होता आणि गडावर शिवरायांसोबत ६००० सैन्य होते यामध्ये एक वीर होते जे पुढे खूप मोठी कामगिरी बजावणार होते व ते वीर म्हणजे मावळचे पिढीजात देशकुलकर्णी बाजीप्रभू देशपांडे.

वीर बाजीप्रभू देशपांडे

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

अफजलखान वधामुळे विजापूरच्या आदिलशाही साम्राज्यास खूप मोठा हादरा बसला इतका की संपूर्ण विजापूर शहरात गोंधळ व रडारड सुरु झाली. अली आदिलशाहने नौबती बंद केल्या. पराभूत होऊन अफझलखानचा मुलगा फाझलखान, मुसेखान, अंकूशखान इत्यादी सरदार विजापुरात जाऊन पोहोचले. या अनपेक्षित पराभवाने सर्वांनाच एवढा धक्का बसला होता की पुढे काय हेच कुणासही समजत नव्हते.

अफझलखान वधामुळे हादरलेल्या विजापूरच्या आदिलशाही दरबाराला धक्क्यातून सावरण्याची संधी मिळण्यापूर्वीची शिवाजी महाराजांनी स्वराज्य विस्ताराची घोडदौड सुरु केली. अफझलखानाचा मुलगा फाझलखान व त्याच्यासोबत पराभूत होऊन विजापुरास परतलेले मुसेखान व अंकूशखान इत्यादी सरदार विजापूरच्या अली आदिलशहाची भेट घेऊन दोनच दिवस लोटले आणि विजापूर दरबाराला बातमी मिळाली की शिवाजी महाराज आपले सैन्य घेऊन कोल्हापूरच्या दिशेने निघाले आहेत. कोल्हापूरच्या दिशेने जाताना त्यांनी वाई, कराड, सुपे, तांबे, पाली, नेर्ले, कामेरी, विसापूर, सावे, उरण, कोळे हा संपूर्ण मुलुख जिंकून घेतला. अफझलखानाच्या वधानंतर फक्त १३ दिवसांत शिवरायांनी इतका मोठा मुलुख स्वराज्यात आणून २६ नोव्हेंबर १६५९ मध्ये ते थेट कोल्हापूर प्रांतात शिरले.

कोल्हापूर जिंकल्यानंतर तेथून अवघ्या पाच कोस अंतरावर असलेल्या पन्हाळगड या मजबूत आदिलशाही ठाण्यावर शिवाजी महाराजांनी लक्ष केंद्रित केले व पन्हाळ्यास वेढा घातला. पन्हाळ्यावर यावेळी आदिलशाही सरदार आपल्या शिबंदीसह होता. शिवाजी महाराजांचा पन्हाळ्यास वेढा पडला आहे हे कळून त्याची भीतीने गाळण उडाली मात्र आदिलशाही सैन्याने किल्ल्यावरून मराठ्यांवर तोफांचा मारा सुरु केला. मारा चुकवीत चुकवीत मराठे किल्ल्याच्या तटात आले व तोफा बंद पाडून आदिलशाही सैन्यावर तुटून पडले. गडाचा मुख्य दरवाजा उघडला गेल्यावर सर्व मराठे किल्ल्यात घुसले आणि विजापुरी सैन्याचा पाठलाग सुरु केला त्यामुळे विजापूरचे सैन्य हत्यारे टाकून शिवरायांना शरण आले. अशा रीतीने पन्हाळ्यावर स्वराज्याचा भगवा फडकला व २८ नोव्हेंबर १६५९ साली स्वतः शिवाजी महाराज पन्हाळ्यावर येऊन दाखल झाले.

अफझलखानाचा मुलगा फाझलखान हा आपल्या पित्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आतुर होता त्यामुळे तो व रणदुल्लाखान याचा पुत्र रुस्तमीजमान एकत्र येऊन अली आदिलशहाकडे गेले व आम्हास शिवाजीराजांवर रवाना करा अशी विनंती केली. यानंतर अली आदिलशहाने दोघा सरदारांसोबत दहा हजारांची फौज, हत्ती, तोफा, उंट इत्यादी सरंजाम आणि मलिक इतबार, सादातखान, फत्तेखान, बाजी घोरपडे, सर्जेराव घाटगे इत्यादी सरदार दिले. मात्र या सैन्याचाही शिवाजी महाराज यांनी स्वतः व नेताजी पालकर यांनी धुव्वा उडवला व सर्व विजापुरी सैन्यास मागे पिटाळून लावले.

आदिलशहास एकामागून एक होत असलेले हे पराभव शल्यासारखे टोचू लागले मात्र आपल्या एकाहून एका बलवान सरदारास शिवाजी राजांनी धूळ चारली त्यामुळे आता असा कुठला बलाढ्य सरदार आहे जो शिवाजी राजांना पन्हाळ्यावरुन काढून लावेल असा विचार अली आदिलशाह करू लागला यावेळी त्याच्या डोळ्यासमोर एक नाव आले, ते म्हणजे सिद्दी जोहर. त्यावेळी सिद्दी जोहर हा कर्नुल प्रांताचा कारभारी होता मात्र तो पूर्वी कर्नुल प्रांताचा मूळ सरदार मलिक रयमान याचा नोकर असून सरदाराचा मृत्यू झाल्यावर त्याने त्याच्या मुलास बाजूला सारून कर्नुल प्रांताचा कारभार हाती घेतला होता त्यामुळे आदिलशाही दरबाराची त्यावरील मर्जी कमी झाली होती. मात्र शिवाजी राजांवर चालून जाऊन जर तुम्ही त्यांचा पराभव करू शकलात तर तुम्हांवरील आमची इतराजी संपेल अशी ग्वाही आदिलशाहने सिद्दी जोहर ला दिली.

सिद्दी जोहर हा मूळचा हबशी असल्याने त्याने सोबत आपली हबशी फौज घेतली व विजापूरास गेला. बादशाहने त्यास सलाबतखान असा किताब दिला व काशी तिमाजीस दिनायत राव असा किताब दिला याशिवाय रुस्तुमीजमान, सादतखान, सिद्दी मसूद, बाजी घोरपडे, भाई खान, पिटनाईक, बडेखान आणि फाझलखान या सरदारांना सिद्दी जोहर सोबत धाडले. 

सिद्दी जोहर पन्हाळ्याच्या दिशेने निघाला तेव्हा शिवाजी महाराजांनी मिरज किल्ल्यास वेढा घातला होता मात्र सिद्दी जोहर बलाढ्य सैन्यासहित आपल्यावर चालून येत आहे हे समजल्यावर त्यांनी पन्हाळ्यावर जाऊन लढा देण्याचा निर्णय घेतला. महाराज हे पन्हाळ्यास गेल्याचे सिद्दी जोहर यास समजताच त्याने फौजेस पन्हाळगडास वेढा घालण्याचा हुकूम दिला. यानुसार सिद्दी जोहरच्या फौजेने पन्हाळ्याच्या पायथ्याशी येऊन तंबू, रहाट्या टाकून चौफेर मोर्चे लावले. सादतखान, सिद्दीमसूद, बाजी घोरपडे आणि भाई खान यांनी पश्चिमेकडून तर दक्षिण बाजूकडून सिद्दी जोहरने मजबूत वेढा दिला त्यामुळे शिवाजी महाराज पन्हाळा किल्ल्यात तब्बल साडे चार महिने अडकून पडले.

हा वेढा दिवसेंदिवस कठीण होत चालला होता कारण आदिलशहाने आपले सर्व मुख्य सरदार या वेढ्यावर धाडले होते. शृंगारपूरचे सूर्यराव सुर्वे व पालवणी चे जसवंतराव दळवी हे सुद्धा नंतर सिद्दी जोहर यास सामील झाले. इंग्रजांचे सैन्य सुद्धा राजापूरच्या वखारीहून सिद्दी जोहरच्या मदतीस येऊन पोहोचले.

एका बाजूस शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकून पडल्याने शत्रूंनी स्वराज्याच्या मुलुखात आक्रमण सुरु करून स्वराज्याचा प्रदेश बळकावण्याचे उद्योग सुरु केले त्यामुळे शिवाजी महाराजांची चिंता वाढू लागली याशिवाय मुघल सेनापती शाईस्तेखानानेही पुण्यावर स्वारी करून बराचसा मुलुख बळकावल्याने हा वेढा असाच वाढत राहिला तर स्वराज्याची अपरिमित हानी होईल हा विचार करून शिवाजी महाराजांनी सिद्दी सोबत सलोख्याचे बोलणे लावले मात्र सिद्दी या सलोख्यास दाद लागू देईना. 

आषाढ महिन्यात गडावर मुसळधार पाऊस सुरु होता आणि गडावर शिवरायांसोबत ६००० सैन्य होते यामध्ये एक वीर होता जो पुढे खूप मोठी कामगिरी बजावणार होता व तो वीर म्हणजे मावळचे पिढीजात देशकुलकर्णी बाजीप्रभू देशपांडे.

शिवाजी महाराजांनी आपल्या गंगाधरपंत या वकिलामार्फत सिद्दी जोहरला असा संदेश धाडला की तुम्ही आमच्यासाठी अली आदिलशाह सोबत बोलणी करावी, मी आपला सर्व मुलुख आदिलशाह यास देऊन टाकतो. हे पात्र वाचून सिद्दी जोहर ला आनंदाचा झटका आला आणि त्याने त्वरित शिवाजी महाराजांची भेट घेण्याची तारीख ठरवली. 

या ठिकाणी शिवाजी महाराजांनी गडाखाली हेर पाठवून किल्ल्यावरून निसटण्याचा मार्गही निश्चित केला आणि पौर्णिमेच्या रात्री सहाशे हत्यारबंद मावळ्यांसोबत पन्हाळा उतरून विशाळगडाकडे कूच करायचा बेत सुद्धा ठरवला गेला. आणि १२ जुलै १६६० रोजी पौर्णिमेच्या रात्री जेव्हा सिद्दी जोहर व समस्त आदिलशाही सैन्य शिवाजी महाराजांनी शरणागती पत्करली या स्वप्नात गुंग होते तेव्हा शिवाजी महाराज २ पालख्या, थोडा खजिना, ६०० पायदळ आणि १५ उमदे घोडे घेऊन अंधारातून शत्रूचे पहारे चुकवून किल्ल्याच्या बाहेर पडले व विशाळगडाच्या मार्गावर लागले.

पन्हाळा ते विशाळगड हे अंतर तब्बल ४० मैलांचे असून हा काळ भर पावसाचा असल्याने निबिड डोंगराळ अरण्यातील रस्ता हा पावसामुळे निर्माण झालेल्या ओढ्यामुळे व प्रवाहांमुळे खराब झालेला होता या स्थितीत महाराजांना पन्हाळा ते विशाळगड हे अंतर लवकरात लवकर पार करावयाचे होते. 

काही काळानंतर सिद्दी जोहरला महाराज निसटून गेल्याची बातमी कळली मात्र खबर पक्की आहे असे समजल्यावर त्याने सिद्दी मसूद व फाजलखान यांना सैन्य सोबत घेऊन महाराजांच्या मागावर पाठवले. शिवाजी महाराज पालखीत होते व मावळे आणि सोबत बाजीप्रभू देशपांडे हे प्रचंड जंगलातून विशाळगडाकडे कूच करत होते.

मात्र विशाळगडाकडे जाण्याचा मार्गही सोपा नव्हता कारण किल्ल्याच्या पायथ्याशी सुद्धा सिद्दी जोहरने वेढा लावला होता आणि महाराजांच्या मागून सिद्दी जोहरचे सैन्य होते. 

एका क्षणी शत्रूची झडप मावळ्यांवर पडली आणि एक पालखी व काही सैन्य आदिलशाही सैन्याच्या हाती लागले आणि त्यांनी मोठ्या आनंदाने ती पालखी सिद्दी जोहरच्या समोर आणली मात्र ती पालखी उघडताच सिद्दी जोहरला धक्का बसला कारण पालखीत शिवाजी महाराज नव्हते तर शिवा काशीद हे शूर मावळे आपल्या प्राणांची बाजी लावून बसले होते, शिवाजी महाराज वेगाने विशाळगडाकडे कूच करीत होते.

१३ जुलै १६६० ला सकाळी शिवाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे व मावळ्यांसह विशाळगडापासून ६ मैल अंतरावरील गजापूरच्या खिंडीत येऊन पोहोचले होते. गजापूरची खिंड ही अतिशय दुर्गम खिंड. दोन बाजुंना डोंगर आणि मधून अगदी अरुंद वाट जर या ठिकाणी शत्रू फौजेसह समोर आला तर परिस्थिती कठीण होईल हे बाजीप्रभूंना जाणवले आणि त्यांनी शिवाजी महाराजांना अशी विनंती केली की तुम्ही ३०० सैन्य घेऊन खिंड पार करा व मी उर्वरित ३०० सैन्यासह खिंडीची वाट तुम्ही विशाळगडावर सुखरूप पोहोचेपर्यंत अडवून ठेवेन.

शिवाजी महाराजांनी विशाळगडाकडे ३०० मावळ्यांसहित प्रयाण केले आणि काही वेळातच सिद्दी जोहरचे सैन्य घोडखिंडीत येऊन ठेपले. समोर बाजीप्रभू मावळ्यांसहित आपला रस्ता अडवून बसले आहेत व शिवाजी महाराज हे पुढे निघून गेले आहेत हे समजताच शत्रू सैन्याने बाजीप्रभू व मावळ्यांवर जोरदार हल्ला चढवला मात्र बाजीप्रभूंनी ठिकठिकाणी मोर्चेबंदी केल्याने व स्वतः ५० मावळ्यांसहित खिंडीच्या रस्त्यात उभे राहिल्याने त्यांनी शत्रूच्या हल्ल्यास निकराने प्रतिकार केला. सोबत मूठभर मावळे असूनही बाजीप्रभूंनी आपल्या पराक्रमाने शत्रूला बराच काळ झुंजवत ठेवले कारण आपले धनी काही करून विशाळगडावर सुखरूप पोहोचणे हाच त्यांच्या जीवनाचा एकमेव उद्देश होता.

शत्रूंचे आघात मावळ्यांवर होऊ लागले स्वतः बाजीप्रभूंच्या देहावर सुद्धा अनेक जखमा झाल्या मात्र तरीही त्यांचे कान विशाळगडावरील इशारतीच्या तोफांकडे होते. काही वेळानेच इशारतीच्या तोफांचा आवाज कडाडला व शिवाजी महाराज सुखरूप विशाळगडावर पोहोचल्याचे बाजीप्रभूंना लक्षात आले व त्यांनी सुखाने डोळे मिटले. बाजीप्रभूंची फक्त ३०० मावळ्यांसह आपल्या धन्याच्या व स्वराज्याच्या रक्षणासाठी केलेली झुंज सत्कारणी लागली.

बाजीप्रभूंसोबत असलेल्या अनेक मावळ्यांनीसुद्धा स्वराज्य रक्षणाकरिता घोडखिंडीत आपले प्राण दिले व घोडखिंडीस पावन केले.