काळकाई माता देवस्थान - कोंडेथर
कोंडेथर गावाचे श्रद्धास्थान म्हणजे काळकाई देवीचे मंदिर. ताम्हिणी घाटात ज्या ठिकाणी रायगड जिल्हा व पुणे जिल्ह्याची सीमा एक होते त्याच ठिकाणी हे मंदिर आहे.
दक्षिण रायगडास पुणे जिल्ह्याशी जोडणारा एक राजमार्ग म्हणजे ताम्हिणी घाटमार्ग. ताम्हिणी घाट हा महाड मार्गे भोर तालुक्यास जाणाऱ्या वरंधा घटास एक पर्याय म्हणून निर्माण झाला होता. हल्ली दक्षिण रायगड व उत्तर रत्नागिरी मधील काही गावे याच मार्गाने पुणे जिल्ह्यासोबत जोडली गेली आहेत.
ताम्हिणी घाटमार्गात पायथ्याचे गाव म्हणजे रायगड जिल्ह्यातील विळे आणि माथ्यावरील शेवटचे गाव म्हणजे मुळशी तालुक्यातील ताम्हिणी. रायगड जिल्ह्याची पूर्व सीमा ही सह्याद्रीच्या कड्यावरून गेली आहे त्यामुळे अनेक गावे ही ऐन घाट माथ्यावरही पाहावयास मिळतात.
ताम्हिणी घाटात रायगड जिल्ह्याच्या हद्दीतील शेवटचे गाव म्हणजे कोंडेथर. कोंडेथर गाव हे समुद्रसपाटीपासून अदमासे ५२४ मीटर उंचावर आहे. पूर्वी हे गाव राबते होते मात्र आता गावातील अनेक मंडळी शहरांकडे स्थलांतरित झाली आहेत.
कोंडेथर गावाचे श्रद्धास्थान म्हणजे काळकाई देवीचे मंदिर. ताम्हिणी घाटात ज्या ठिकाणी रायगड जिल्हा व पुणे जिल्ह्याची सीमा एक होते त्याच ठिकाणी हे मंदिर आहे. रस्त्यावरून दिसणारा फलक पाहून मंदिरास भेट देण्याची उत्सुकता ताणली जाते. या ठिकाणी दाट जंगल असल्याने बाहेरून मंदिराचे दर्शन होत नाही मात्र फलकाच्या मागे जाणारा मार्ग धरला की दोन मिनिटात आपण मंदिर परिसरात दाखल होतो. मंदिराचा आता ग्रामस्थांच्या सहभागातून जीर्णोद्धार झाला असला तरी हे मंदिर अतिशय पूर्वीपासून असावे हे आजूबाजूस असलेल्या अवशेषांवरून समजून येते.
मंदिराच्या डाव्या बाजूस सह्याद्रीचा कडा असून चोहो बाजूस दाट रान आहे. असे म्हणतात की सध्याच्या ताम्हिणी घाटाची निर्मिती होण्यापूर्वी सह्याद्रीच्या माथ्यावरील कोंडेथर, आदरवाडी, डोंगरवाडी इत्यादी गावांचा मुख्य बाजार हा कोकणातील विळे या गावात भरायचा त्यामुळे या गावांतून विळे गावास जाणारी एक वाट ही या मंदिराच्या बाजूने जात असे. मंदिरातील देवीचे दर्शन घेऊन प्रवास सुरु करायचा आणि आपल्या इच्छित स्थळी पोहोचायचे असा अलिखित नियमच होता.
हल्ली ताम्हिणी घाट रस्त्यावर वर्दळ वाढली असली तरीही काळकाई मंदिर परिसर हा आजही तितकाच शांत व गूढ आहे. येथे आल्यावर मानवी अस्तित्वाची जाणीव करून देणारे आवाज एकदम गुप्त होतात व निसर्गाच्या सानिध्यातील एक वेगळीच धार्मिक अनुभूती अनुभवायला मिळते. ताम्हिणी घाट हे एक पावसाळी पर्यटनस्थळ म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करीत आहे. पावसाळी पर्यटनासाठी ताम्हिणी घाटास भेट विचार असेल तर याच घाटाच्या कुशीत लपलेले हे श्रद्धास्थान पाहावयास विसरू नका.