छत्रपती शिवाजी महाराजांची अखेरची मोहीम

महाराजांनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत स्वराज्यासाठी कष्ट घेतले व एप्रिल १६८० मध्ये रायगडावर देह ठेवला. पण त्या आधी काही महिन्यांपूर्वी महाराजांनी शत्रूच्या मुलुखात स्वारी करून मोठी लूट स्वराज्यात आणली.

छत्रपती शिवाजी महाराजांची अखेरची मोहीम
छत्रपती शिवाजी महाराजांची अखेरची मोहीम

शिवाजी महाराजांचा आयुष्य हे नेहमीच धकाधकीचं होतं. अगदी जन्माच्या आधी-जिजाऊंच्या पोटी असल्यापासून  गनिमांना चकवा देत ते आयुष्यभर गनिमांना चोपत. महाराजांच्या याच कष्टामुळे स्वराज्य उभं राहीलं व पुढे त्याचं साम्राज्य झालं. महाराजांनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत स्वराज्यासाठी कष्ट घेतले व एप्रिल १६८० मध्ये रायगडावर देह ठेवला. पण त्या आधी काही महिन्यांपूर्वी महाराजांनी शत्रूच्या मुलुखात स्वारी करून मोठी लूट स्वराज्यात आणली.

ऑक्टोबर १६७८ मध्ये औरंगजेबाने दक्षिणेचा सुभेदार म्हणून शहाजादा मुअज्जमची नेमणूक केली व त्याचवेळी दिलेरखानाला विजापूर जिंकून घेण्याची आज्ञा केली. दिलेरखान विजापूरच्या दिशेने निघाला. यावेळी मराठे विजापूरकरांच्या मदतीला धावून गेले व मराठ्यांनी विजापूर वाचवले. पण विजापूरचा सेनापती सिद्दी मसूद हा चंचल वृत्तीचा होता. त्याने पुन्हा महाराजांच्या विरोधात दिलेरखानाशी मैत्रीची बोलणी सुरू केली. स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी मुघल व आदिलशाही सैन्य एक झाले. मुघलांनी स्वराज्यावर हल्ला केला व एप्रिल १६७९ रोजी स्वराज्यातील भूपाळगड जिंकून घेतला.

यानंतर दिलेरखान पुन्हा विजापूर घेण्याविषयी बोलू लागला. तेव्हा मसूद खानाने त्याच्याशी फारकत घेतली. दिलेरखानाने पैशाचा वापर करून अनेक आदिलशाही सरदार फोडले. त्यामुळे आदिलशाही खिळखिळी झाली. नाईलाजाने मसूद खानाने पुन्हा महाराजांना विजापूर वाचविण्याची विनंती केली. महाराजांनी आपले वकील बोलणीसाठी विजापूरला पाठवले व नंतर विजापूरच्या संरक्षणासाठी सैन्य व रसद पाठवली. तसेच गोवळकोंड्याच्या कुतुबशहाने देखील विजापूरला महाराजांमार्फत मदत पाठवली. आज जर आदिलशाही बुडाली तर उद्या मुघल अजून माजतील व संपूर्ण दक्षिण भारत जिंकून घेतील म्हणून मराठे, आदिलशाही आणि कुतुबशाही या दक्षिणेतल्या सत्ता मुघलांविरुद्ध सज्ज झाल्या आणि दिलेरखान देखील विजापूर जिंकायचंच या निर्धाराने विजापूरच्या दिशेने निघाला.

ऑक्टोबर १६७९च्या अखेरीस महाराज स्वतः मोरोपंत पेशव्यांसह विजापूरजवळ पोहोचले. महाराजांना आदिलशहाची भेट घेण्याची इच्छा होती. पण मसूद खानाचा भरवसा नसल्याने महाराजांनी त्यांची भेट घेऊ नये अशी विनंती मोरोपंतांनी केली. महाराजांना त्यांचे म्हणणे पटले व त्यांनी मसूद खानाला निरोप पाठवला,

"बादशहाला भेटायची इच्छा आहे. पण त्याआधी मुघलांशी लढाई उरकून येतो आणि दिलेरखानाला हुसकावून लावल्यावर भेटूच!"

दिलेरखान विजापूर घेण्याच्या मोहिमेत गुंतला होता. त्याचवेळी महाराजांनी आपल्या काही सैन्यासह मुघली मुलखात हल्ला करण्याचे ठरवले. दिलेरखानापासून तीन गाव अंतरावरून महाराज व मोरोपंत पेशवे जालनापूर म्हणजेच आजच्या जालना शहराच्या दिशेने निघाले. भीमा नदीपासून जालन्यापर्यंतचा मुघली मुलुख मराठ्यांनी लुटला. महाराज जालन्याला येऊन पोहोचले. जालन्यापासून थोड्याच अंतरावर असलेल्या औरंगाबाद येथे मोगली सुभेदार शहाजादा मुअज्जम तळ ठोकून होता. तरीही पर्वा न करता महाराज जालन्यात आले.

जालना ही बालाघाटातील व्यापाऱ्यांची प्रमुख बाजारपेठ होती. अनेक श्रीमंत व्यापारी तेथे राहत असत. मराठ्यांनी साधारण १५ नोव्हेंबरपासून मुघलांची जालना पेठ लुटायला सुरुवात केली व चार दिवस ते पेठ लुटत राहिले. या लुटीत त्यांना सोने, चांदी, हत्ती, घोडे तसेच इतर संपत्ती मोठ्या प्रमाणात मिळाली. लुट घेऊन महाराज सैन्यासह जालन्याहून पट्टा (विश्रामगड) गडाच्या दिशेने निघाले. तेव्हा वाटेतच रणमस्तखान, आसिफखान, जाबीतखान व आणखी पाच-सात उमराव व ८-१० हजार फौजांशी यांची गाठ पडली. यावेळी मोठी लढाई झाली. बहिर्जी नाईकांनी यातून महाराजांना सुखरूपपणे बाहेर काढले आणि शिवाजी महाराज, मोरोपंत पेशवे काही सैन्यासह पट्टा गडावर पोहोचले. ही लढाई पुढे दोन-तीन दिवस चालली व त्यात सिधोजी निंबाळकर यांना वीरमरण आले.

महाराज पट्टा गडावर मुक्कामास राहिले व तेथूनच त्यांनी मोरोपंतांना बागलाण मोहीमेवर पाठवले. काही काळ मुक्काम करून महाराज आधी पन्हाळा व डिसेंबर अखेरीस रायगडावर परतले. यानंतर पुढील ३ महिन्यांनी महाराजांचे रायगडावर निधन झाले.

- अमित म्हाडेश्वर