कऱ्हाड - एक प्राचीन धार्मिक आदीक्षेत्र
प्राचीन काळी कऱ्हाड येथे सातवाहन, भोज, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार आदी सत्ता नांदल्या.
महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड हे एक ऐतिहासिक महत्व असलेले ठिकाण. कऱ्हाड हे प्राचीन काळी करहाटक या नावाने प्रख्यात होते. जुने शिलालेख व ताम्रपट यांमध्ये कऱ्हाडचा उल्लेख करहाट, करहाड आणि करहड असाही आढळतो.
करहाटक या शब्दाची उत्पत्ती करहा या नदीशी जोडली जाते. सातारा जिल्ह्यातील केरा नामक नदी जिस पूर्वी करहा या नावाने ओळखत त्या नदीवरून या शहरास कऱ्हाड असे नाव मिळाले असावे.
कऱ्हाड या स्थानाचे अध्यात्मिक महत्व म्हणजे या ठिकाणी कृष्णा व कोयना या दोन नद्यांचा संगम होतो. या संगमास प्रीती संगम या नावाने ओळखले जाते.
सहसा एका नदीस दुसरी नदी संगमाच्या ठिकाणी आडवी येऊन मिळते मात्र कऱ्हाड येथील संगमात कृष्णा आणि कोयना या दोन नद्या समोर समोर एकमेकांना येऊन मिळतात त्यामुळे या संगमास प्रीती संगम असे सार्थ नाव मिळाले आहे.
कृष्णा व कोयना या दोन महानद्यांचा अनोखा संगम यास्थळी झाल्याने कृष्णमहात्म्य आदी धार्मिक ग्रंथांमध्ये या क्षेत्राचे विशेष महत्व प्रतिपादित केले गेले आहे.
महाभारत काळात सहदेव ज्यावेळी दक्षिण दिग्विजयास आला त्यावेळी त्याने जिंकलेल्या क्षेत्रांमध्ये कऱ्हाडचा सुद्धा समावेश होता असा उल्लेख महाभारताच्या सभापर्वात आला आहे. महाभारताच्या सभापर्वात कऱ्हाडचा करहाटक असा उल्लेख असून त्यास पाषंड असे विशेषण दिले आहे.
कऱ्हाडच्या आसमंतात प्राचीन बौद्ध लेणी असून या परिसरात अनेक बौद्ध संस्कृतीचे अवशेष सुद्धा आढळले आहेत.
प्राचीन काळी कऱ्हाड येथे सातवाहन, भोज, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार आदी सत्ता नांदल्या. कोल्हापूरच्या शिलाहारांची दुसरी राजधानी कऱ्हाड होती त्यामुळे कोल्हापूर येथे ज्याप्रमाणे महालक्ष्मीचे मंदिर आहे त्याचप्रमाणे कऱ्हाड येथेही महालक्ष्मी मंदिर आहे.
महालक्ष्मी ही शिलाहारांची कुलदेवता असल्याने त्यांनी कोल्हापूरप्रमाणे आपल्या कुलदेवतेची आराधना करण्यासाठी कऱ्हाड मध्ये सुद्धा देवीच्या मंदिराची स्थापना केली असावी.
कऱ्हाड हे कऱ्हाडे ब्राह्मणांचे मूलस्थान मानले जाते. पुराणकाळात कऱ्हाडला आदीक्षेत्र म्हणून मान्यता होती.
धार्मिक यात्रेसाठी प्रख्यात अशा स्थळांमध्ये कऱ्हाडचा समावेश होत असे. काशीप्रमाणे कऱ्हाड येथे सुद्धा यात्रेकरूंना पंचक्रोशी करावी लागत असे.
कऱ्हाड येथे मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक व धार्मिक स्थळे आहेत यापैकी संत सखुबाई मंदिर, महालक्ष्मी मंदिर, संगमेश्वर महादेव मंदिर आणि कऱ्हाडचा भुईकोट प्रमुख आहेत.
आदिलशाही काळात इब्राहीमखानाने बांधलेली एक मशीद कऱ्हाड येथे असून तिला १०६ फूट उंचीचे दोन मनोरे आहेत व या मशिदीत नऊ शिलालेख आहेत.
आजही कऱ्हाड येथे भेट दिल्यावर या क्षेत्राचे धार्मिक व ऐतिहासिक महत्व पटते त्यामुळे महाराष्ट्राच्या धार्मिक व ऐतिहासिक वैभवाचे दर्शन घ्यायचे असल्यास कऱ्हाडला एकदा तरी भेट द्यायलाच हवी.