महावीर जयंती - तीर्थांकरांचा जन्मसोहळा

वर्धमान महावीरांचा जन्म इसवी सन पूर्व ५९९ मध्ये चैत्र शुद्ध १३ या दिवशी झाला. महावीरांच्या वडिलांचे नाव सिद्धार्थ तर आईचे नाव त्रिशाला असे होते.

महावीर जयंती - तीर्थांकरांचा जन्मसोहळा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आपल्या भारतात प्राचीन काळापासून अनेक थोर माणसे होऊन गेली. त्यांनी जनतेस अध्यात्मिक ज्ञान, समता, बंधुभाव व सौजन्याचा उपदेश दिला. वर्धमान महावीर हे अशाच विभूतींपैकी एक. महावीर हे जैन धर्माच्या २४ तीर्थांकरापैकी एक. जैनधर्मातील पहिले तीर्थांकर वृषभ नाथ तर चोविसावे तीर्थांकर महावीर. मुळात जैनधर्माचे नाव हे जिनधर्म असे आहे. आपल्या इंद्रियांना जिंकणारा तो जीन आणि महावीराना जीन असे म्हटले जाई. जैनधर्मीयांच्या मते जिनधर्म हा सनातन धर्म आहे. 

वर्धमान महावीरांचा जन्म इसवी सन पूर्व ५९९ मध्ये चैत्र शुद्ध १३ या दिवशी झाला. महावीरांच्या वडिलांचे नाव सिद्धार्थ तर आईचे नाव त्रिशाला असे होते. सध्याच्या बिहार राज्यात वैशाली नावाचे एक राज्य होते. महावीर यांचे वडील या वैशाली राज्यातील एक मोठे सरदार होते याशिवाय राजाच्या कुटुंबाशी महावीरांच्या कुटुंबाचे नातेसुद्धा होते.

अशा रीतीने क्षत्रिय घराण्यात जन्म घेतलेल्या महावीरांचे लग्न यशोदा यांच्यासोबत झाला. यशोदापासून त्यांना प्रियदर्शना नावाची मुलगी सुद्धा झाली. मात्र समाजातील विषमता त्यांना पाहवत नव्हती. बाहेर सुरु असलेल्या वाईट गोष्टींमुळे महावीरांचे मन संसारात रमेनासे झाले. वयाच्या ३० व्या वर्षी त्यांनी संसार त्याग करून अरण्यवास पत्करला व तिथे तपश्चर्या करून धर्माचे ज्ञान करून घेतले. त्याचा प्रसार त्यांनी अनेक ठिकाणी जाऊन केला. 

महावीर हे स्वतः राजकुलातील असल्याने महावीरांनी प्रसार केलेल्या धर्मास राजाश्रय सुद्धा मिळाला व अनेक जण त्यांचे अनुयायी झाले. आपल्या वयाच्या ७२ व्या वर्षापर्यंत वर्धमान महावीरांनी जैन धर्मप्रसाराचे कार्य केले व अश्विन वद्य अमावास्येच्या दिवशी पावापुरच्या उद्यानात त्यांनी महानिर्वाण केले. 

जैन धर्माची पाच प्रमुख तत्वे आहेत त्यापैकी अहिंसेचे व्रत मोठे आहे. जैन धर्मात श्वेतांबर व दिगंबर अशे दोन प्रमुख पंथ आहेत जे महावीरांच्या निर्वाणानंतर निर्माण झाले. दिगंबरपंथीय साधू हे दिगंबरावस्थेत राहतात तर श्वेतांबर पंथीय साधू श्वेत वस्त्र परिधान करतात. जैन धर्म म्हटला की साधारणपणे आपल्यास उत्तर भारतातील राज्ये आठवतात मात्र महाराष्ट्रातही मराठी जैन धर्मीय शेकडो वर्षे आहेत.

जैनधर्मात पर्युषणाचे व्रत खूप महत्वाचे असते. भाद्रपद शुद्ध ५ ला पर्युषणाची सुरुवात होऊन  भाद्रपद शुद्ध १४ पर्यंत पर्युषण काळ असतो. या काळात जैन लोक दशगुणांचे चिंतन करतात. अक्षयतृतीयेस जैन लोक एकत्र येऊन मंदिरांत उसाचा रस प्राशन करतात कारण याच दिवशी ऋषभनाथांना उसाचा रस दिल्याचे म्हटले जाते.

श्रुतिपंचमीस जैन लोक शास्त्र पूजा करतात. महावीरांच्या निर्वाणाच्या दिवशी जैन धर्मीय दीपोत्सव साजरा करतात. महावीर जयंती निमित्ताने आपण महावीरांनी दिलेल्या शांतीच्या व समतेच्या संदेशाचे स्मरण करून ही धरा बंधुभाव व प्रेमभावाने परिपूर्ण होवो अशी प्रार्थना करू या.