श्री क्षेत्र यवतेश्वर देवस्थान - सातारा जिल्हा

यवतेश्वर देवस्थान हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थानांपैकी एक असून एका निसर्गरम्य अशा ठिकाणी असल्याने येथील वातावरण शांत व प्रसन्न असते.

श्री क्षेत्र यवतेश्वर देवस्थान - सातारा जिल्हा
श्री क्षेत्र यवतेश्वर देवस्थान - सातारा जिल्हा

सातारा शहराच्या पश्चिमेस असलेले श्री यवतेश्वर व श्री काळभैरव हे समस्त भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

यवतेश्वर देवस्थानातील मुख्य मंदिर असलेले यवतेश्वर महादेव मंदिर यादवकालीन असून मंदिराच्या नंदी मंडपात एक नव्हे तर दोन नंदी दिसून येतात.

नंदीमंडप ओलांडून आत प्रवेश केल्यावर मंदिराचे सभागृह दिसून येते व सभागृहाच्या पुढे मंदिराचे गर्भगृह असून गर्भगृहात श्री यवतेश्वराचे स्वयंभू शिवलिंग दिसून येते.

यवतेश्वर शिवलिंग आकाराने भव्य असून गर्भगृहाच्या अंतर्भागाचे नूतनीकरण केलेले दिसून येते. मंदिराचे स्थापत्य पाहून हे मंदिर यादवकालीन असल्याची साक्ष पटते.

मूळ मंदिराशेजारी श्री रामेश्वर शिवमंदिर असून या मंदिरातील शिवलिंग सुद्धा अतिशय भव्य असे आहे. या मंदिरात गणेश आदी देवतांच्या मूर्ती दिसून येतात.

मंदिराबाहेर अजून काही कोरीव मूर्ती आणि एक वीरगळ दिसून येते.

मंदिराच्या आवारात मूळपुरुष बाबाजी यांचे मंदिर आहे. बाबाजी हे मंदिराचे मूळ गुरव पुजारी होते असे येथील फलकावरून समजते.

मंदिराच्या तटबंदीबाहेर एक तळे असून त्यास देवतळे या नावाने ओळखले जाते. हा तलाव चौरसाकृती असून बांधीव आहे व खाली उतरण्यासाठी पायऱ्यांची निर्मिती केली गेली आहे. तलावाच्या भिंतींमध्ये काही कोनाडे सुद्धा बांधलेले आढळून येतात. तलावाच्या एका कोपऱ्यात पाण्याचा नैसर्गिक स्रोत दिसून येतो. देवतळे हे चिरेबंदी व अतिशय भव्य आहे.

मंदिराचे निर्माल्य तीर्थ अनोखे असून जमिनीखाली खोदकाम करून तेथून निर्माल्य मार्ग निर्माण करण्यात आला आहे.

यवतेश्वर येथील श्री काळभैरवनाथ हे मंदिर सुद्धा एक जागृत व प्रसिद्ध देवस्थान आहे.  या मंदिराचा निर्मितीकाळ सुद्धा यादवकालीन असून मंदिराच्या अंतर्भागात नूतनीकरण करण्यात आले आहे.

मंदिराच्या गर्भगृहात काळभैरवाची अतिशय रेखीव व भव्य मूर्ती स्थानापन्न आहे. मंदिराच्या उंबरठ्यात भक्तांनी देवाला अर्पण केलेली नाणी दिसून येतात.

यवतेश्वर देवस्थान हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थानांपैकी एक असून एका निसर्गरम्य अशा ठिकाणी असल्याने येथील वातावरण शांत व प्रसन्न असते तेव्हा महाराष्ट्राच्या धार्मिक वैभवात भर घालणारे यवतेश्वर देवस्थान एकदातरी पाहायलाच हवे.