संगमेश्वरी बोली - कोकणचे भाषावैभव

रत्नागिरी जिल्ह्यात कुणबी (शेतकरी) वर्ग खूप मोठ्या संख्येने आहे. त्यांची बोली ती तिलोरी-कुणबी नावाने ओळखली जाते. ही बोली संगमेश्वर भागात मोठ्या प्रमाणावर बोली जात असल्यामुळे हिला संगमेश्वरी बोली असे संबोधले जाऊ लागले.

संगमेश्वरी बोली - कोकणचे भाषावैभव
संगमेश्वरी बोली - कोकणचे भाषावैभव

संवाद हा जरी विविध माध्यमातून होत असला तरीसुद्धा भाषेद्वारे होणारा संवाद हा सर्वोच्च समजला जातो. भाषा हे माणसांना एकमेकांशी जोडणारे, त्यांच्यात विचारांची आदानप्रदान सुलभ करणारे सर्वात मोठे माध्यम आहे. असे म्हणतात की भाषा ही प्रत्येक १२ कोसांवर बदलते. आणि ते खरेही आहे. भाषेची ढब, लय, त्यात वापरले जाणारे शब्द, त्यांचे उच्चार ह्यात होणारा बदल आपल्याला जाणवतो. मराठी ही आपली मातृभाषा असली तरीसुद्धा ती विविध प्रांती, विविध ढंगाने बोलली जाते तेव्हा तिला त्या त्या प्रदेशातील बोलीभाषा असे म्हणतात. आपली मराठी भाषा आपल्याला पुणेरी, मुंबईची, मराठवाड्यातली, विदर्भातली, कोकणातली, धुळ्याकडची अहिराणी ढंगातली अशा विविध बोलींमध्ये भेटत असते. लिखित स्वरूपातल्या भाषेपेक्षा बोलीभाषा अधिक मोकळी, भावना थेट व्यक्त करणारी आणि रांगडी आणि त्यामुळेच हृदयाला थेट भिडणारी असते. प्रत्येक भागातले सारे लोकव्यवहार तिथल्याच बोलीत होत असल्याने कला, संस्कृती, परंपरा, खाद्यसंस्कृती, उत्सव अशा विविध बाबींशी निगडित मोठा खजिनाच आपल्याला बोलीभाषेत बघायला मिळतो. कोकणातही मराठी बोलींचे ढंग काही और आहेत. त्यातलीच एक बहुरंगी बोली म्हणजे ‘संगमेश्वरी बोली’ होय. खरंतर ही बोली जवळपास संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात बोलली जाते. गेल्या काही वर्षात इंग्रजी भाषेच्या आकर्षणापायी आणि बोलीभाषेत बोलणे म्हणजे गावंढळ अशा चुकीच्या समजुतीपायी या बोलीभाषा लयाला जाऊ लागलेल्या आहेत. खरंतर एखाद्या भाषेची अस्सल गोडी ही आपल्याला बोलीभाषेतूनच जाणवते.

रत्नागिरी जिल्ह्यात कुणबी (शेतकरी) वर्ग खूप मोठ्या संख्येने आहे. त्यांची बोली ती तिलोरी-कुणबी नावाने ओळखली जाते. ही बोली संगमेश्वर भागात मोठ्या प्रमाणावर बोली जात असल्यामुळे हिला संगमेश्वरी बोली असे संबोधले जाऊ लागले. संगमेश्वरी ऐकताना या बोलीचा ठसका, तिचा गोडवा आणि एकप्रकारची मिश्कील झाक पदोपदी जाणवत असते. प्रश्न विचारल्यावर त्याचं उत्तर हे प्रश्न विचारूनच द्यायचं अशी ह्या बोलीची खासियत. या बोलीचा इतिहास शोधणं खरंतर मोठं अवघड काम.

संगमेश्वरी बोलीचे अभ्यासक आणि गेली ४० वर्षे ‘मी संगमेश्वरी बोलतो’ हा एकपात्री प्रयोग करणारे श्री आनंद बोंद्रे सांगतात की ह्या बोलीला पूर्वी सोमगेश्वरी बोली म्हटले जायचे. माखजन पट्ट्यात, खाडी पट्ट्यात व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणावर होता. त्यांची एक सांकेतिक भाषा होती, जी मर्यादित स्वरुपात बोलली जायची. संगमेश्वरी बोलीचा उगम इथे असल्याचं समजलं जातं. अर्थात याला काही ठाम पुरावा वगैरे काही नाही. मुळात या बोलीत साहित्याची देवाण घेवाण काहीच नाही. कुठली साहित्यिक रचना या भाषेत झाली नाही. नाटकातून ही बोलीभाषा दिसून येते. या बोलीवर आधारित पुढे नाटके रचली गेली. परंतु विपुल साहित्यसंपदा अशी काही या संगमेश्वरी बोलीत निर्माण झाली नाही.

तरीही संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात म्हणजे अगदी खेड तालुक्यापासून ते पार दक्षिणेला राजापूरपर्यत खेडेगावातून ही बोली बोलली जाते. या पट्ट्यातली चाकरमानी मंडळी मुंबईला कामानिमित्त गेली आणि तिथे त्यातल्या बऱ्याच जणांना घरगडी किंवा हॉटेलात भांडी धुवायची कामे मिळाली. ह्या मंडळींची बोली भाषा म्हणून तिला ‘बाल्यांची भाषा’ अशी ओळख मिळाली. हे बाल्ये लोक करमणुकीसाठी इथल्या प्रदेशातील जाखडी नृत्य करायचे. त्यातून येणारी गाणी, कवने यातून ही बोली मुंबईत ऐकू येऊ लागली. श्री बोंद्रे सांगतात त्यानुसार जवळजवळ ४०० वर्षापासून ही बोलीभाषा संगमेश्वर प्रांतात बोलली जात असणार. या बोलीतील फटके, कवनं, ओव्या यांची प्राचीनता खूप मोठी आहे.

आंतरराष्ट्रीय भाषातज्ञ श्री. गणेश देवी यांनी भारतीय भाषांचे सर्वेक्षण केलेले आहे. त्यात मराठी भाषेचा विशेष खंड आहे. त्यात ते संगमेश्वरी बोलीचा उल्लेख करतात. परंतु स्थानिक भाषा बोलणे हे गावंढळपणाचे लक्षण समजले गेल्याने ही भाषा आज देवरुख सारख्या शहरी भागात ऐकायला मिळत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. सन १९०३ साली ग्रियर्सन यांनी भाषिक सर्व्हे केला त्यात तिलोरी कुणबी म्हणजेच संगमेश्वरी बोली बोलणाऱ्यांची संख्या १३ लाख इतकी होती. आणि जेव्हा असाच सर्व्हे सन १९६१ साली केला गेला तेव्हा एक धक्कादायक वास्तव समोर आले ते म्हणजे या वर्षी ही बोली बोलणाऱ्यांची भाषा फक्त ३ इतकी शिल्लक राहिली होती. इतका मोठा ऱ्हास या बोलीभाषेचा झालेला आहे.

परंतु आजही संगमेश्वर परिसरातील खेडोपाड्यात ही गोड बोली ऐकायला मिळते. श्री. आनंद बोंद्रे यांच्या कार्यक्रमापासून प्रेरणा घेऊन विविध कार्यक्रम या भाषेत सादर केले जाऊ लागले. अनेक नाटके खास करून संगमेश्वरी बोलीत सादर होतात. या पार्श्वभूमीवर, एखादी बोलीभाषा जपण्यासाठी, तिचं संवर्धन करण्यासाठी काही उपक्रम आणि ते ही पुढील पिढीकडून राबविले जातात, तेव्हा ते नक्कीच खूप मोठं पाऊल असतं. कोकणचा साज आणि संगमेश्वरी बाज हे लोकनाट्य हा असाच एक कौतुकास्पद उपक्रम. नावातल्या उल्लेखाप्रमाणेच संगमेश्वरी बोलीतला हा नाट्यप्रयोग अत्यंत लोकप्रिय ठरला असून, गेल्या काही वर्षांत या नाटकाचे अनेक प्रयोग झाले आहेत. प्रसिद्ध अभिनेता वैभव मांगले याच संगमेश्वरी बोलीत विविध प्रयोग सादर करतात.

स्वामी विवेकानंदांच्या शिष्या भगिनी निवेदिता यांनी बोलीभाषांबद्दल अगदी योग्यच म्हटले आहे. त्या म्हणतात की प्रत्येक बोलीत साहित्य निर्माण झाले तरच त्या बोलीभाषेचा विकास होईल. सुस्पष्ट, गोड आणि खास कोकणी लकब असलेल्या संगमेश्वरी बोलीत विपुल साहित्य निर्माण होऊन या परिसरातल्या ज्याच्या त्याच्या तोंडी ही बोली पुन्हा एकदा ऐकू येईल अशी प्रार्थना करूया !

(सफर संगमेश्वर देवरुख परिसराची या पुस्तकातून)

- आशुतोष बापट