कात्रजचा घाट दाखवणे - शिवरायांच्या अपूर्व पराक्रमाने सुरू झालेली म्हण

शाईस्तेखानाच्या सैन्यास जेर केल्यावर आता थेट शाईस्तेखानाचाच समाचार घेण्याचा विचार करून १६६३ साली महाराजांनी लाल महालावर छापा टाकला आणि शाहिस्तेखानाच्या छावणीवर हल्ला केला व या हल्ल्यात शाहिस्तेखानाची बोटे तुटली व त्याची अनेक माणसे मारली गेली.

कात्रजचा घाट दाखवणे - शिवरायांच्या अपूर्व पराक्रमाने सुरू झालेली म्हण
लाल महालावर छापा

आपल्या मराठीत अनेक म्हणी आहेत व त्यांचा वापर एखाद्या घटनेची तुलना थोडक्यात करायची असल्यास आजही करण्यात येतो मात्र या म्हणींचा कुठेनाकुठे एक उगम असतो व पिढ्यानपिढ्या या म्हणी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचत असतात. काही म्हणी तर शेकडो वर्षे जुन्या असून त्यांना ऐतिहासिक महत्वही आहे.

साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील एका प्रसिद्ध प्रसंगावरून निर्माण झालेली एक म्हण तर आजही आपल्याकडे प्रसिद्ध आहे व ती म्हण म्हणजे 'कात्रजचा घाट दाखवणे'. कात्रज हे ठिकाण सध्या पुणे महानगरचा एक भाग असून पुण्याच्या दक्षिण दिशेस आहे व कात्रज पुण्याहून सातारा, कोल्हापूरच्या दिशेने जावयाचे असल्यास कात्रज पार करूनच जावे लागते. पुण्याहून कात्रज पार केले की लगेच एक घाट लागतो ज्यास कात्रजचा घाट म्हणून ओळखले जाते.

पूर्वी पुणे व कात्रज ही वेगवेगळी गावे होती आणि हा परिसर निबिड अरण्याने युक्त होता. शिवकाळात तर पुणे परिसर अत्यंत दुर्गम मानला जात असे व या पुणे परिसरातच शिवाजी महाराजांचे बालपण व्यतीत झाले. 

१६६० साली स्वराज्यावर शाहिस्तेखानाच्या रूपात मोगली संकट कोसळले. शाईस्तेखान हा मोगल बादशाह औरंगजेबाचा मामा. त्यावेळी नर्मदा नदीच्या पलीकडील मोगल सत्ता असलेला परिसर हा मोगलांचा दक्षिण सुभा म्हणून ओळखला जात असे. या दक्षिण प्रांतातील इतर राज्ये नष्ट करून ती मोगल राज्यास जोडण्याचा विचार करून औरंगजेबाने शाईस्तेखानास दक्षिणेचा सुभेदार म्हणून नेमून येथे पाठवले आणि स्वराज्यसहित इतर राज्ये जिंकून ती मोगल साम्राज्यात घेण्याचा हुकूम केला.

त्यानुसार शाइस्तेखान दक्षिणेत दाखल झाला आणि त्याने पुण्यातील लाल महालात तळ दिला जे ठिकाण पूर्वी महाराजांच्या निवासाचे स्थान होते. या काळात शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले असल्याने शाईस्तेखानास स्वराज्यात प्रचंड सैन्यासह येण्याची आयती संधी मिळाली त्यामुळे तब्बल तीन वर्षे शाईस्तेखान या परिसरात डेरा टाकून बसला होता. 

शिवाजी महाराजांनी विजापूरकरांचा समाचार घेतल्यावर त्यांनी शाईस्तेखानास धडा शिकवण्याचा निश्चय केला आणि पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुखरूप बाहेर आल्यावर त्यांनी सिंहगडावरून मोगलांच्या सेनेचा समाचार घेण्याची सुरुवात केली व यावेळी त्यांनी गनिमीकावा या तंत्राचा प्रभावी वापर केला.

शाईस्तेखानाच्या सैन्यास जेर केल्यावर आता थेट शाईस्तेखानाचाच समाचार घेण्याचा विचार करून १६६३ साली महाराजांनी लाल महालावर छापा टाकला आणि शाहिस्तेखानाच्या छावणीवर हल्ला केला व या हल्ल्यात शाहिस्तेखानाची बोटे तुटली व त्याची अनेक माणसे मारली गेली.

शिवाजी महाराज फार कमी लोकांसह असंख्य सैनिकांनी युक्त अशा मोगलांच्या सुभेदाराच्या छावणीवर हल्ला करून त्याचा समाचार घेतला असला तरी या छावणीतून सुखरूप बाहेर पडणे तेवढेच कठीण हे महाराजांना ठाऊक होते त्यामुळे त्यांनी पूर्वीच सर्व योजना तयार करून ठेवली होती.

शाहिस्तेखानावर विजेच्या वेगात हल्ला करून महाराज आपल्या सहकाऱ्यांसह छावणीतून बाहेर पडले व लवकरात लवकर त्यांचे सिंहगडावर पोहोचणे गरजेचे होते मात्र ही बातमी खानाच्या सैन्यास मिळताक्षणी ते आपला पाठलाग करतील हे महाराजांना माहित होते त्यामुळे या सैन्यास गोंधळात टाकणे गरजेचे होते यानुसार महाराजांनी जी अप्रतिम योजना बनवली होती ती ऐकून महाराजांच्या तेजस्वीपणाची कल्पना येईल.

शाहिस्तेखानावर हल्ला झाल्याची बातमी रात्री ज्यावेळी सर्व मोगल सैन्यास समजली त्यावेळी छावणीत खूप मोठा गोंधळ माजला. रात्रीच्या अंधारात महाराज व त्यांची माणसे कशी ओळखावीत याचा अंदाजही मोगलांना येत नव्हता तरी सुद्धा महाराजांचा निवास सिंहगडावर आहे हे मोगलांस माहित असल्याने त्यांना या रस्त्यावर पाठलाग करण्यापासून रोखायचे महाराजांनी ठरवले आणि त्यांनी कात्रजच्या घाटात आपली काही माणसे आणि अनेक बैल तयार ठेवले होते आणि या बैलांच्या शिंगाना आणि झाडांना पोत गुंडाळून ठेवण्यात आले होते.

महाराज छावणीतून बाहेर पडल्यावर कर्णे वाजवून कात्रजच्या घाटातील सैनिकांना इशारा देण्यात आला आणि त्यांनी ते पोत पेटवले आणि पुण्यातून दूरवर हे पेटलेले पोत मशालींसारखे दिसू लागले. घाटातील बैल घाटाच्या वर धावू लागल्याने लांबून मोगलांना असे वाटले की जणू महाराज आपल्या सैन्यासह मशाली घेऊन कात्रजचा घाट पार करून जात आहेत त्यामुळे मोगलांनी त्वरित त्या दिशेने धाव घेतली पण घाटात पोहोचल्यावर त्यांना खरी बातमी समजली आणि तो पर्यंत महाराज आपल्या सहकाऱ्यांसह सुखरूप सिंहगडावर पोहोचले होते.

हताश मोगल सैनिक पुन्हा एकदा पुण्यातील छावणीत परत आले आणि दिवस उजाडायची वाट पाहू लागले. दुसऱ्या दिवशी स्वतः शाइस्तेखान आपले सैन्य घेऊन सिंहगडाच्या पायथ्याशी आला. खान सिंहगडाकडे येणार हे महाराजांना माहित असल्याने त्यांनी गडावर पूर्ण बंदोबस्त केला होता आणि मोगल टप्प्यात आल्यावर सिंहगडावरून तोफांचा मारा मोगलांवर होऊ लागला व त्यामुळे मोगलांना आगेकूच करणे कठीण होऊन बसले.

एक क्षण तर असा आला की एक तोफगोळा थेट शाहिस्तेखानाच्या हत्तीवर आदळला आणि हत्ती ठार झाला त्यावेळी खानाचा धीर खचला आणि तो आपल्या सैन्यासह माघारी वळला. ही गोष्ट जेव्हा औरंगजेबास समजली त्यावेळी तो अत्यंत संतप्त झाला आणि त्याने खानास पुन्हा दिल्लीस बोलावून घेतले. 

अशाप्रकारे शिवाजी महाराजांनी मोगलांना कात्रजचा घाट दाखवून त्यांची फजिती केली आणि शाहिस्तेखानाची व त्याला दक्षिणेत पाठवणाऱ्या औरंगजेबाची नाचक्की झाली त्यामुळे संतप्त होऊन औरंगजेब म्हणाला होता की 'शिवाजी तो बडा सैतान निकला' . कात्रजच्या घाटातील या प्रसंगावरूनच 'कात्रजचा घाट दाखवणे' म्हण प्रसिद्ध झाली व आजही या म्हणीचा वापर केला जात असला तरी जाणते राजे शिवाजी महाराजांच्या काळात झालेल्या या प्रसंगाची सर इतर कुठल्याच प्रसंगास येऊ शकत नाही हे सुद्धा तेवढेच खरे.