नागोठणे गावाचे ग्रामदैवत श्री जोगेश्वरी व श्री भैरवनाथ
नागोठणे हे रायगड जिल्ह्यातील एक मध्यवर्ती व ऐतिहासिक ठिकाण. मुंबईपासून १०० किलोमीटर व पुण्यापासून १२० किलोमीटर अंतर असलेल्या या गावाचे ग्रामदैवत श्री जोगेश्वरी व श्री भैरवनाथ यांचे मंदिर शहराच्या मध्यभागी असून तीन तलावांनी वेढलेले आहे.
भारतखंडात प्रत्येक घराण्याचे जसे एक कुलदैवत असते तसेच प्रत्येक गावाचे एक ग्रामदैवत असते व असेच एक प्रसिद्ध ग्रामदैवत म्हणजे रायगड जिल्ह्यातील नागोठणे गावचे श्री जोगेश्वरी व श्री भैरवनाथ.
नागोठणे हे रायगड जिल्ह्यातील एक मध्यवर्ती व ऐतिहासिक ठिकाण. मुंबईपासून १०० किलोमीटर व पुण्यापासून १२० किलोमीटर अंतर असलेल्या या गावाचे ग्रामदैवत श्री जोगेश्वरी व श्री भैरवनाथ यांचे मंदिर शहराच्या मध्यभागी असून तीन तलावांनी वेढलेले आहे. यातील पहिले तळे मोटेचे अथवा मोट्याचे तळे या नावाने ओळखले जाते. हे तळे पूर्वीपासून नागोठण्याचे प्रमुख बांधीव तळे होते व यातून पाणी बाहेर काढण्यासाठी मोटांचा वापर केला जात असे म्हणून तलावास मोटेचे तळे असे सार्थ नाव प्राप्त झाले. मोटेच्या तलावाची बांधणी शिवकालीन असून याच्या चारही बाजुंनी भिंती व आतील बाजूने दगडांची चिरेबंदी करून या तलावाचे पाणी सुरक्षित करण्यात आले होते मात्र कालांतराने गावात नळ आले आणि मोटेच्या तळ्याचे महत्व कमी झाले.
मोटेच्या तलावा व्यतिरिक्त आणखी दोन तलाव मंदिराच्या बाजूला आहेत ज्यांना नासके तलाव असे म्हणतात. खरं तर हे दोन तलाव खोदीव तलाव असून परिसरातील मंदिरे व खुद्द मोटेचा तलाव बांधण्यासाठी या दोन तलावांतील दगड व मातीचा वापर करण्यात आला होता. मात्र खोदकाम झाल्यावर या ठिकाणी निर्माण झालेल्या खड्ड्यांचा वापरही पाणी साठवण्यासाठी करता येईल असा विचार करून त्यांना तलावाचे रूप देण्यात आले. कालांतराने दोन्ही तलावांमध्ये पाणी आले मात्र ते पिण्यायोग्य नसल्याने या तळ्यांना नासके तलाव म्हणून ओळखले जाऊ लागले.
जुन्या साधनांनुसार जोगेश्वरी व भैरवनाथ मंदिराची स्थापना ही सतराव्या शतकातील म्हणजेच शिवकालीन आहे. यामागे सुद्धा एक प्रसिद्ध कथा आहे. नागोठणे पंचक्रोशीत एक गाव आहे मुरावाडी. या गावात ताडकर या आडनावाचे एक गृहस्थ होते व ते पेशाने देवीचे भोपी होते. त्यांच्या स्वप्नात एकदा देवीने दर्शन दिले व म्हणाली की मी नागोठण्याच्या पूर्वेकडील सागवानी डोंगरात आहे तेथून मला डोक्यावर घेऊन खाली ये व ज्या ठिकाणी मी तुला जड होईन त्याच ठिकाणी माझी स्थापना कर. या दृष्टांतानुसार ताडकर नागोठणे गावाच्या पूर्वेकडील सागवानी डोगंरावर गेले व त्यांना देवीच्या मूर्तीचे दर्शन झाले. देवीस सोबत घेऊन ते नागोठण्यात आले असता बरोबर या तीन तळ्यांच्या मध्ये त्यांच्या डोक्यावरील मूर्ती जड झाली व त्या ठिकाणी त्यांनी मूर्तीची स्थापना केली.
हे मंदिर पूर्वी कौलारू होते मात्र अदमासे २५ वर्षांपूर्वी मंदिराचा व परिसराचा जीर्णोद्धार करण्यात आला व देवतांच्या मूळ मूर्ती जीर्ण झाल्याने त्यांच्या जागी नव्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. जुन्या मूर्तींचे विसर्जन करण्याची प्रथा असल्याने ज्यावेळी त्या मूर्ती हरिहरेश्वर येथील समुद्रात विसर्जित करण्यात आल्या त्यावेळी त्या समुद्रातून परत किनाऱ्यावर आल्या त्यामुळे आजही या मूळ मूर्ती मंदिराबाहेरील छोट्या मंदिरात स्थापित केलेल्या दिसून येतात. जोगेश्वरी देवीचे मुळस्थान असलेल्या पूर्व नागोठणे डोंगररांगेतील एका कपारीत सुद्धा देवीचे एक मंदिर आहे व येथे सुद्धा नवरात्रीत मोठा उत्सव असतो.
या मंदिरात जोगेश्वरी, भैरवनाथ व नागेश्वर अशी तीन दैवते स्थानापन्न आहेत. मंदिराच्या बाजूस असलेल्या छोट्या देवळांत गणपती व मरीमाई माता स्थानापन्न आहेत. याशिवाय जुना रामेश्वर हे अतिशय पुरातन शिवमंदिर, हनुमान मंदिर, गणेश मंदिर, दत्त मंदिर, नवा रामेश्वर, ज्ञानेश्वर मंदिर अशी अनेक मंदिरे आसमंतात आहेत.
नागोठण्याचे हे दैवत अतिशय जागृत असून १९४४ साली ज्यावेळी नागोठण्यास प्लेगची साथ आली होती त्यावेळी साथीपासून वाचण्यासाठी सर्व नागोठणेकर आपली घरेदारे सोडून जंगलात स्थलांतरित झाली होती व गावात चिटपाखरूही नव्हते त्यामुळे चोरांचे फावले होते मात्र या चोरांना त्यावेळी पांढऱ्या घोड्यावरून गावाचे रक्षण करणारी जोगेश्वरी माता दिसली व चोरांनी गावातून काढता पाय घेतला. आजही कधीकधी मध्यरात्रीनंतर गावात घुंगरांचा व घोड्याच्या टापांचा आवाज ऐकू येतो असा अनेकांचा अनुभव आहे. चैत्र महिन्याच्या पौर्णिमेनंतर हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी देवीची पालखी असते. यावेळी देवी संपूर्ण गावातून फिरून भक्तांना दर्शन देते. पूर्वी रात्री बारा वाजता देवीची बळ निघत असे व यामध्ये गावातील लोक उत्साहाने सहभागी होत.
नवरात्रात जोगेश्वरी देवीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. नऊ दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी व कीर्तनांनी मंदिराचा आसमंत भारावलेला असतो. तर असे हे श्री जोगेश्वरी देवीचे माहात्म्य. जोगेश्वरी माता हे मुळात भवानी मातेचेच एक रूप मात्र मंदिरात महादेवाचा अवतार श्री भैरवनाथ असल्याने जोगेश्वरी देवीस भैरी भवानी या नावानेही ओळखले जाते आणि संबध कोकणपट्टीत भैरी भवानीची मंदिरे विपुल प्रमाणात आहेत व अनेक कुटुंबांची ती कुलदेवता सुद्धा आहे.