विड्याच्या पानाची माहिती व फायदे
विड्याचे अथवा पानाचे एकूण दोन मुख्य प्रकार आहेत ज्यांना साधारण पण आणि विशेष पान म्हणून ओळखले जाते व त्यानुसार आतील सामग्री वेगवेगळी वापरली जाते.
भारतीय संस्कृतीमध्ये जी पारंपरिक खाद्ये प्रसिद्ध आहेत त्यामधील एक म्हणजे विडा अथवा पान. विड्याचे अथवा पानाचे महत्व एवढे की यावर आपल्या देशात अनेक म्हणी आणि गाणी सुद्धा प्रचलित आहेत. विडा हा प्राचीन काळापासून प्रसिद्ध असून त्यास तांबूल या नावाने ओळखले जाई आणि विडा खाण्यास त्यावेळी तांबूल भक्षण असे म्हटले जाई.
विडा हा पदार्थ असा आहे की तो भारतातल्या सर्वच वर्गातील लोकांमध्ये प्रसिद्ध आहे आणि काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत विड्याचे सेवन करण्यात येते. विड्याचे आणखी एक वैशिट्य म्हणजे त्याचा समावेश वाईट व्यसनांमध्ये होत नाही आणि विडा खाण्याचे फायदे जुन्या धार्मिक साधनांत सुद्धा प्रतिपादित करण्यात आले आहेत.
लहानांपासून वृद्धांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे विडे उपलब्ध असतात व त्यामध्ये आवडीनुसार व वयानुसार खाद्य सामग्रीचा वापर केला जात असला तरी मुख्य गोष्ट म्हणजे विड्याचे पान हे सर्व विड्यांमध्ये एकच असते कारण त्याशिवाय विडा तयार होणेच अशक्य.
विड्याचे अथवा पानाचे एकूण दोन मुख्य प्रकार आहेत ज्यांना साधारण पान आणि विशेष पान म्हणून ओळखले जाते व त्यानुसार आतील सामग्री वेगवेगळी वापरली जाते मात्र पारंपरिक विड्यामध्ये विड्याचे पान, चुना, सुपारी आणि कात हे पदार्थ प्रामुख्याने वापरले जातात.
साधारण विडा हा प्रामुख्याने विड्याचे पान, सुपारी, चुना आणि कात यापासून तयार होत असला तरी विशेष प्रकारच्या विड्यात केशर, बदाम, लवंग, जायपत्री, कस्तुरी, वेलदोडे आदी पदार्थ घातले जातात व गेल्या काही वर्षांत तर मनुष्याने विड्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रयोग करून त्याचे अनेक प्रकार तयार केले आहेत.
विड्याच्या पानाचे महत्व वैद्यकशास्त्रातही दिले असून विड्याचे पान हे सुगंधी, उत्तेजक, स्तंभक आणि वायू हारक आहे. वीड्याने तोंडाची दुर्गंधी दूर होते, आवाज सुधारतो आणि श्वास उच्छ्वास चांगला होतो. विड्याचे मूळ पान पौष्टिक गुणधर्म असणारे आहे, चुन्याचे कमी प्रमाणात सेवन केल्यास पाणथरी, अग्निमांद्य आदी विकार बरे होतात आणि चुन्यासोबत कात असल्यास त्याने तोंडाचा रंग लाल होतो.
विड्यातील सुपारीमुळे आरोग्यासाठी महत्वाची अशी लाळ अधिक उत्पन्न होते. दाताच्या हिरड्या मजबूत होतात आणि उत्साह येतो. सुपारी चुन्यासोबत वापरल्याने आमांश विकार दूर होतो आणि कात सुद्धा आमांश अथवा अतिसारावर गुणकारक ठरते.
कात हा पदार्थ पाचक व शीतल आहे व त्यामुळे खोकला दूर होतो आणि आणि घसा बसला असेल तर तो मोकळा होता आणि कंठ सुधारतो. कातीमुळे तोंडातील फोड सुद्धा बरे होतात.
जुन्या वैद्यकशास्त्रात विड्याचे सेवन हे दुपारचे व रात्रीचे जेवण झाल्यावर करावे असे सांगण्यात आले आहेत आणि जर दिवसातून दोन पेक्षा अधिक काळ विड्याचे सेवन केले तर मग त्याचे रूपांतर दुर्व्यसनात होते म्हणून कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईट हे समजूनच कमी प्रमाणात त्याचे सेवन करावे.