श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज

दत्तभक्तीमध्ये लीन झालेले टेंबे स्वामी हे विविध दत्तक्षेत्रांना सुद्धा भेटी देत व यामध्ये नरसोबाची वाडी या स्थानी त्यांचे वारंवार जाणे होत असे व एके दिवशी नरसोबाच्या वाडीस त्यांना श्री दत्तगुरूंचे दर्शन झाले.

श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

भारताच्या अध्यात्मिक परंपरेत सन्यास व ज्ञानाचा अद्भुत असा संगम प्रस्थापित करणाऱ्या महात्म्यांमध्ये वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबे स्वामी यांचे नाव आदराने घेतले जाते.

वासुदेवानंद सरस्वती यांची अध्यात्मिक साधना, विद्वत्ता आणि आचार निष्ठतेमुळे त्यांना भारतीय संस्कृतीच्या अध्यात्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात एक महान विद्वान, गुरू, ग्रंथकार आणि संन्यासी म्हणून ओळख मिळाली आहे.

टेंबे स्वामी यांचा जन्म १८५४ साली कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव या निर्मला नदीच्या किनारी वसलेल्या टुमदार अशा गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गणेशपंत तर आईचे नाव रमाबाई असे होते. वासुदेवानंद यांचे आजोबा हरिपंत हे दत्त उपासक असून दत्तभक्तीचा वारसा हरिपंत यांच्याकडून गणेशपंतांकडे आणि गणेशपंतांकडून वासुदेवानंद यांच्याकडे आला. 

बालपणापासूनच दत्तभक्ती मनात रुजल्याने वासुदेवानंद हे दत्तभक्तीत लिन होऊ लागले व सोबत त्यांनी वेदांचा अभ्यासही सुरु केला. माणगाव येथून बाजूला असलेल्या सिद्धपर्वतावरील एक गुहा हे वासुदेवानंद यांच्या साधनेचे व तपश्चर्येचे स्थान बनले.

दत्तभक्तीमध्ये लीन झालेले टेंबे स्वामी हे विविध दत्तक्षेत्रांना सुद्धा भेटी देत व यामध्ये नरसोबाची वाडी या स्थानी त्यांचे वारंवार जाणे होत असे व एके दिवशी नरसोबाच्या वाडीस त्यांना श्री दत्तगुरूंचे दर्शन झाले.

श्री दत्तगुरूंची सेवा आपल्या गावी सुद्धा करता यावी यासाठी त्यांनी माणगाव येथे एक सुंदर दत्तमंदिर बांधले. मंदिराची निर्मिती करण्यापूर्वी त्यांनी चांद्रायण हे व्रत केले होते. हे व्रत १८८८ या वर्षातील अश्विनमासात संपन्न झाले होते.

टेंबे स्वामी यांनी नरसोबाची वाडी, नरसी, बढवाई, गरुडेश्वर आदी पवित्र स्थळी चातुर्मासाचे व्रत केले होते. आपल्या आचारनिष्ठ अशा वर्तनाने टेंबे स्वामी हे अनेकांचे श्रद्धास्थान झाले होते. 

दत्तभक्तीचा प्रसार करताना टेंबे स्वामी यांनी अनेक ग्रंथांचे सुद्धा लिखाण केले होते. टेंबे स्वामी यांनी लिहिलेल्या ग्रंथांमध्ये श्री गुरुचरित्र, श्री दत्तलीलामृताब्धीस्तार, सप्तशती गुरुचरित्र, माघमाहात्म्य, नर्मदास्तोत्र, वेदवाद स्तुती, कुमार शिक्षा, पद समूह, स्त्रीशिक्षा, समश्लोकी श्री गुरुचरित्र, श्री गुरु संहितास चूर्णिक, श्री दत्तमाहात्म्य, श्री दत्तपुराण, दत्तचंपू सटीक, श्री कृष्णलहरी, षट पंचाशिका, एक्कावन्न श्लोकी गुरुचरित्र, करुणा त्रिपदी-पंचपदी, नर्मदा लहरी, दत्तात्रेय आख्यान बोध, श्री दत्त भाव सुधारस, आत्मानात्मविचार, प्राकृत मनन सार, श्री गुरुस्तुती आदी विपुल ग्रंथांचा समावेश होता.

१९१४ साली टेंबे स्वामी यांनी गरुडेश्वर येथे समाधी घेतली व हा दिवस आषाढ शुद्ध प्रतिपदेचा होता. वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबे स्वामी यांच्या समाधीस शंभरहून अधिक वर्षे लोटली तरी त्यांच्या जगाच्या विविध भागात पसरलेल्या भक्तगणांकडून त्यांच्या विचारांचा व आदर्शांचा प्रचार व प्रसार आजही केला जातो व हीच टेंबे स्वामी यांना त्यांच्या भक्तांकडून दिली जाणारी खरी गुरुदक्षिणा आहे.