गोरक्षनाथ अर्थात गोरखनाथ - नाथपंथातील एक महायोगी

गोरक्षनाथांचे वैशिट्य हे की ते साक्षात योगी असून कडक वैरागी होते. गोरक्षनाथ यांना अनेक योगसिद्धी प्राप्त होत्या कारण त्यांनी आपल्या वैराग्याने व तपोबलाने स्वतःस सक्षम बनवले होते.

गोरक्षनाथ अर्थात गोरखनाथ - नाथपंथातील एक महायोगी

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

भारतातील प्रमुख पंथांपैकी एक मानला जाणारा पंथ म्हणजे नाथपंथ. नाथपंथात नवनाथांना प्रमुख स्थान असून नवनाथांपैकी एक असलेले गोरखनाथ अर्थात गोरक्षनाथ यांची उपासना करणारा एक मोठा संप्रदाय नाथपंथामध्ये आहे.

गोरक्षनाथ यांचा जन्मकाळ अज्ञात असला तरी त्यांचा जन्म अयोध्येजवळील जयश्री नामक नगरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सद्बोध आणि आईचे नाव सद्वृत्ती असे होते.

एके दिवशी सद्बोध व सद्वृत्ती यांचे घरी मत्स्येंद्रनाथ यांचे आगमन झाले. साक्षात मत्स्येंद्रनाथ आपल्या घरी आलेले पाहून दोघांच्या आनंदास पारावर उरला नाही. यावेळी सद्बोध आणि सद्वृत्ती या दोघांनी मत्स्येंद्रनाथ यांना आपल्या आशीर्वादाने आमच्या घरी संतान व्हावे अशी इच्छा बोलून दाखवली.

यानंतर मत्स्येंद्रनाथ यांनी दोघांना विभूती दिली व या विभूतीच्या कृपेने तुम्हाला पुत्ररत्नाचा लाभ होईल असे सांगितले.

मात्र अनावधानाने ही विभूती दोघांकडून हरवली आणि घरासमोरील मोकळ्या जागेत पडली. या गोष्टीचे अतोनात दुःख दोघांना झाले व आपल्या नशिबी संतानयोग नसावा अशी भावना दोघांची झाली.

अदमासे बारा वर्षांनी मत्स्येंद्रनाथ यांचे सद्बोध व सद्वृत्ती या दोघांच्या घरी पुनरागमन झाले आणि त्यांनी दोघांना विचारले की मुलगा कुठे आहे?

यावेळी दोघांनी झालेली गोष्ट सांगितली व मत्स्येंद्रनाथ यांची माफी मागितली.

यानंतर मत्स्येंद्रनाथ त्या मोकळ्या जागेपाशी गेले आणि तेथे जाऊन त्यांनी अलक्ष्य (अलख) अशी हाक मारली आणि त्या जागेतून आदेश असे उत्तर आले आणि पाहता पाहता एक दिव्य बालक तेथून बाहेर आले व हे बालक म्हणजे गोरक्षनाथ अर्थात गोरखनाथ होय.

गोरक्षनाथ यांचा जन्म मातेच्या गर्भातून झाला नसल्याने त्यांना अयोनिसंभव म्हटले जाते. गोरक्षनाथांनी मत्स्येंद्रनाथ यांना आपले गुरु मानले व त्यांच्यापाशी राहून सर्व विद्या प्राप्त केल्या.

गोरक्षनाथांचे वैशिट्य हे की ते साक्षात योगी असून कडक वैरागी होते. गोरक्षनाथ यांना अनेक योगसिद्धी प्राप्त होत्या कारण त्यांनी आपल्या वैराग्याने व तपोबलाने स्वतःस सक्षम बनवले होते.

गोरक्षनाथ हे शिवोपासक, अद्वैतमती आणि अनेक सिद्धींनी युक्त असे होते. आपल्या काळात त्यांनी भारत, नेपाळ आणि श्रीलंका आदी देशांमध्ये नाथपंथाचा प्रचार केला आणि त्यांच्या शिष्यगणांमध्ये वेगाने वाढ झाली.

नेपाळ देशातील गोरखा लोकांना गोरखा ही ओळख गोरखनाथ यांच्यापासून मिळाली. गोरखा लोक हे गोरखनाथ आणि मत्स्येंद्रनाथ यांचे निस्सीम भक्त आहेत.

नवनाथ संप्रदायातील एक महायोगी असलेले गोरखनाथ हे खऱ्या अर्थी नाथपंथीय लोकांस देवस्थानी आहेत.