कुतुबमिनार - एक मध्ययुगीन स्थापत्य

असे म्हणतात की पूर्वी कुतुबमिनार हा एकूण सात मजली होता व त्याची उंची ३०० फूट होती मात्र तूर्तास आपल्याला फक्त पाच मजलेच पाहावयास मिळतात.

कुतुबमिनार - एक मध्ययुगीन स्थापत्य
कुतुबमिनार

भारताची राजधानी नवी दिल्लीच्या आसमंतातील एक प्रेक्षणीय स्थळ म्हणजे कुतुबमिनार. कुतुबमिनार राजधानी नवी दिल्लीपासून अदमासे ३१ किलोमीटर अंतरावर असून  कुतुबमिनारच्या जवळच जुने दिल्ली शहर आहे.

कुतुबमिनारची निर्मिती तेराव्या शतकाच्या सुरुवातीस कुतुबुद्दीन ऐबक याने केली म्हणून यास कुतुबमिनार हे नाव मिळाले. या मनोऱ्याचे काम शमसुद्दीन अलतमश याच्या कारकिर्दीत पूर्ण झाले.

सध्याचा कुतुबमिनार हा २३८ फूट उंच असून त्यास एकूण पाच मजले आहेत. खालील तीन मजले लाल पाषाणातील असून त्यांवर सुंदर नक्षीकाम करण्यात आले आहे व कुराणातील आयते त्यावर कोरण्यात आली आहेत.

कुतुबमिनारचे वरील दोन मजले संगमरवरी पाषाण आणि लाल पाषाण यांचा वापर करून निर्मिण्यात आले आहेत.

असे म्हणतात की पूर्वी कुतुबमिनार हा एकूण सात मजली होता व त्याची उंची ३०० फूट होती मात्र तूर्तास आपल्याला फक्त पाच मजलेच पाहावयास मिळतात.

काहींच्या मते या मनोऱ्याची निर्मिती दिल्लीचा राजा पृथ्वीराज चौहान याने केली होती व त्यामुळे यास पृथ्वी लाट असेही नाव आहे.

कुतुबमिनारचा पहिला दरवाजा उत्तराभिमुख असून मनोऱ्याखाली चबुतरा नाही. पहिल्या कगोऱ्यावर जे नक्षीकाम आहे त्यामध्ये घंटा आणि इतर कलाकृती कोरल्या गेल्या आहेत.

कुतुबमिनारचा पहिला मजला लाल पाषाणाचा असून त्यास बारा कोन आहेत. भिंती स्तंभांकीत असून एक स्तंभ वृत्तचित्तीच्या आकाराचा तर दुसरा कोनाच्या आकाराचा आहे.

दुसरा मजला गोलाकार स्तंभाचा आणि तिसरा मजला कोनांकित स्तंभाचा आहे.

चौथा व पाचवा मजला मात्र खालील तीन मजल्यांहून वेगळ्या पद्धतीचे असून संगमरवरी पाषाणात बांधण्यात आले आहेत. यावरून खालील तीन मजले आणि वरील दोन मजले यांच्या बांधकामाच्या काळात फरक असावा असे जाणवते.

कुत्ब हा शब्द अरबी असून त्याचा अर्थ आरी अथवा आस असा होतो आणि मिनार म्हणजे स्तंभ. सदर मनोऱ्याचे मूळ नाव हे कुत्ब मनार असे असून त्याचा अर्थ मध्यवर्ती स्तंभ असा होतो.

कुतुबमिनार ज्या भागात स्थित आहे त्या भागास मेहरौली या नावाने ओळखले जाते व हा शब्द मिहिरावली या शब्दाचा अप्रभ्रंश आहे. 

भारताच्या मध्ययुगीन स्थापत्यशैलीचा मोलाची भर घालणारा कुतुबमिनार एकदातरी पाहायलाच हवा.