भालगुडीचा नारायण
भालगुडी गाव ऐन मावळात वसलेले आहे. पुणे-पौड-कोळवण-भालगुडी हे अंतर जेमतेम ४२ कि.मी. इतके भरते. गाव अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहे. तीनही बाजूंनी डोंगराच्या रांगांनी वेढलेला आहे.
चराती चरतो भगः म्हणजे जो चालतो त्याचं नशीबसुद्धा चालतं असं आपल्याकडे ‘ऐतरेय ब्राह्मण’ ग्रंथात म्हटलेले आहे. त्याचा प्रत्यय वेळोवेळी येत असतो. सतत चालत राहिल्याने, डोळस भटकंती करत राहिल्याने अनेक आश्चर्यकारक गोष्टी बघायला मिळतात, त्यांचे सौंदर्य न्याहाळता येते.
१ मे म्हणजे महाराष्ट्र दिनी असाच एक सुवर्णयोग जुळून आला. पुण्याच्या अगदी जवळ असून अजिबात माहिती नसलेले एक ठिकाण आणि इथली सुंदर विष्णूमूर्ती अकस्मात बघायला मिळाली. खरंतर कोकणात शिलाहारकालीन विष्णूमूर्ती मोठ्या प्रमाणावर आढळतात. पण पुणे जिल्ह्यात मात्र अशी विष्णुमूर्ती कुठे दिसून आली नाही. आणि इतकं फिरणं झालं पण कुठे असल्याची माहितीसुद्धा नव्हती.
गेल्या महिन्यात मित्र Sagar Nene यांनी एका विष्णूमूर्तीचा फोटो दाखवला आणि ही पुण्याच्या जवळच आहे असे सांगितल्यावर आश्चर्याचा धक्काच बसला. पुण्याजवळ असलेल्या भालगुडी या गावी ही आहे असे समजले. लवकरच तिथे जायला हवे हे डोक्यात होतेच. तेवढ्यात शनिवारी भटके मित्र संजय आणि सुषमा कट्टी यांचा फोन आला, की रविवारी अर्ध्या दिवसात कुठे जाऊ येता येईल का. एकदम डोक्यात भालगुडी गावच आले. सहज म्हणून देगलूरकर सर आणि घाणेकर सरांना विचारले. आणि अहो भाग्यम...दोघेही चला जाऊया म्हणाले.
भालगुडी गाव ऐन मावळात वसलेले आहे. पुणे-पौड-कोळवण-भालगुडी हे अंतर जेमतेम ४२ कि.मी. इतके भरते. गाव अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहे. तीनही बाजूंनी डोंगराच्या रांगांनी वेढलेला आहे. गाव काहीसा उंचावर आहे. गावाच्या जवळ आल्यावर तिकोना किल्ला एकदम समोर येतो. सगळाच परीसर अतिशय सुंदर आहे. गावात उंचावर देऊळ आहे नारायणाचे. चांगले मोठे देऊळ. देवळात शंकराच्या देवळात असतो तसा गाभारा थोडासा सखलात आहे. ५ पायऱ्या उतरून जावे लागते. आणि समोर उभी आहे सुंदर डौलदार अशी विष्णुमूर्ती. करंड मुकुट धारण केलेली ही मूर्ती अलंकारयुक्त आहे. पद्म-शंख-चक्र-गदा अशी आयुधरचना असल्यामुळे ही केशवाची मूर्ती होते. मूर्तीच्या परीकरात दशावतार आहेत मात्र ते खूपच झिजलेले आहेत. त्यात मूर्तीला वज्रलेप केल्यामुळे ते दशावतार अगदीच अस्पष्ट दिसतात. देवाच्या पायाशी उजवीकडे अंजलीमुद्रेतला गरुड तर डावीकडे श्रीदेवीची मूर्ती कोरलेली आहे. आम्ही सगळेच देवासमोर मांडी घालून बसलो आणि देगलूरकर सर मूर्तीचे वर्णन करत होते. त्यातले बारकावे सांगत होते. काळ निश्चितीसाठी काय काय बघायला हवे, कशाकशाचा विचार करायला हवा हे समजावून देत होते.
तासभर मूर्तीचे अवलोकन केल्यावर ही मूर्ती अंदाजे इ.स. च्या १५ व्या शतकाच्या उत्तरार्धातली असावी असे वाटते. काही वेळानंतर गावातले श्री देविदास साठे सपत्नीक देवळात आले. त्यांनी गावाची आणि मंदिराची बरीच माहिती सांगितली. हे मंदिर जमिनीत गाडले गेले होते. एक ससा एका बिळात गेला, तेव्हा त्याला काढायला ते बीळ खोदत गेल्यावर मूर्तीचे दर्शन झाले. मग सगळा भाग साफ केल्यावर मूर्ती बाहेर आली. तेव्हापासून गावात कधीही सशाची शिकार करत नाहीत. मूर्तीच्या शेजारी एका सशाची दगडी प्रतिमा करून ठेवलेली आहे. या देवाला गावात ‘नारायण’ म्हणून ओळखतात आणि गावकऱ्यांची या देवावर अपार श्रद्धा आहे. कुठ्लेळी खरे-खोटे सिद्ध करायचे असेल तर ते या देवासमोर येऊन करतात. इथे एखादे मोठे मंदिर अस्तित्वात होते. त्याचे अवशेष आजही या मंदिराच्या बाजूला एके ठिकाणी मांडून ठेवलेले दिसतात. त्यात मोठा आमलक, शिखराचा काही भाग, तसेच मंदिराचे शिल्पजडित खांबही दिसून येतात. त्यातल्या एका खांबावर ‘मार्कंडेयानुग्रह’ मूर्ती कोरलेली आहे. इतिहास काळात हे एखादे महत्त्वाचे ठिकाण असणार हे नक्की. भालगुडी गावात सगळी साठे मंडळींचीच घरे आहेत. निर्मल ग्राम असा दर्जा गावाला मिळालेला आहे. ऐन पावसाळ्यात गावाच्या बाजूच्या डोंगरांवरून असंख्य धबधबे दिसतात.
सर्वांगसुंदर विष्णूमूर्ती आणि ती सुद्धा पुण्याच्या इतक्या जवळ असेल असे वाटले नव्हते. अकस्मात योग आला आणि या विषयातल्या तज्ञांसमवेत मूर्तीचे दर्शन घेण्याची संधी मिळाली ही सगळी त्या नारायणाची कृपा. परत येताना तिकोना किल्ला आणि वाटेत मुळा नदीचे सुंदर दर्शन झाले. अखंड देशाटन आणि पंडित मैत्रीमुळे अशी संधी मिळाली हेच खरे. देवाक काळजी...दुसरं काय !!!!
- आशुतोष बापट