दुर्गराज राजगड

महाराष्ट्र भूमीच्या सौंदर्यस्थळांमधे सर्वोच्च स्थानी सह्याद्रीच्या गिरिशिखरांवर असलेले ' दुर्ग ' आहेत याबाबत दुमत असण्याचे कारण नाही.

दुर्गराज राजगड

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

दुर्गमता ह्या नैसर्गिक वैशिष्ट्यामुळे दुर्ग हे नाव मिळाले असावे. याच दुर्ग, किल्ले, गडकोटांनी अनेक राजसत्तेंचा उदय, विकास आणि लय पाहिला आहे, अनुभवला आहे. कधी अत्याचार, कधी अन्याय तर कधी आनंद सोहळा आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिला आहे. स्वतःच्या निर्मिती कालखंडात आपल्या उदरातील कठिण पाषाणापासून वास्तूचा सुंदर चिरा, तटबंदी, मूर्ती, शिल्प घडविणा-या युगशिल्पी व स्थपत्तींना पाहिले आहेत. अनेक पिढ्यांचे वारसदार असलेले सह्याद्रीतील किल्ले हे शिवभक्तांची श्रद्धास्थान व प्रेरणास्थाने आहेत.

अशापैकीच एक शिर्षस्थानी असलेल्या व सर्व प्रकारच्या दुर्गालंकाराने सजलेला ' राजगड ' या किल्ल्यांवरील श्री.राहुल नलावडे यांनी लिहलेला ' दुर्गराज राजगड' हा संदर्भग्रंथ माझ्या हाती आला.

श्री. राहुल नलावडे (रायबा) हे गडकोट भ्रमंती करणाऱ्या जवळपास प्रत्येकांच्या ओळखीचे आहेत. त्यांचा जन्मच मुळी राजगडच्या लगत असलेल्या वाजेघर येथील. बालपणी पहिल्यांदा घराच्या बाहेर पडल्यावर पहिले दर्शन झाले ते शिवप्रभूंच्या ' राजगड 'चे. औषधनिर्माण शास्त्रातील पदवी घेऊन पुण्यनगरीत व्यवसाय करीत असताना देखील आपले सह्याद्रीप्रेम दुर्गभ्रमंतीतून जोपासले आहे. मातृभूमी मावळभूमी असल्यामुळे राजगड नेहमीच प्रेरणा व शक्ती देत आला आहे अशी ठाम धारणा रायबा यांची आहे.

महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनात राजगड किल्ल्याबाबत विशेष निष्ठा,आदर व उत्सुकता असते, तर जगभरात असलेल्या किल्ल्यात राजगडची विशेष ओळख आहे. जिजाऊसाहेब यांच्या संस्काराचा, शंभू राजांच्या बालपणाचा, राजाराम महाराजांच्या जन्माचा साक्षीदार असलेल्या राजगडने अनेक सुखदुःखाच्या घटना पाहिल्या आहेत. स्वराज्याचा सुवर्णकाळ आपल्या हृदयकुपीत सांभाळून ठेवलेला हा गिरिदुर्ग आज मात्र काहीसा उपेक्षित राहिला आहे.

राजगडचा विश्वसनीय इतिहास व भूगोल ग.ह.खरे, गो.नि.दांडेकर, प्र.के.घाणेकर, ब.मो.पुरंदरे, आनंद पाळंदे, प्र.न.देशपांडे इत्यादी मान्यवर प्रभुतींनी मांडला आहे. याच परंपरेचा वारसा रायबा यांनी पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचे या संदर्भग्रंथातून प्रकर्षाने जाणवते. सुरवातीलाच राजगडचे आत्मकथन असणाऱ्या प्रकरणाने झाली असून एकूण २९ प्रकरणे आहेत. किल्ल्यावरील पशु,पक्षी, वनसंपदा, इमारती, दरवाजे, तलाव, मंदिरे, विविध शिल्प, तटबंदी इत्यादींची रंगीत प्रकाशचित्रे आपल्या समोर देखणा राजगड उभा करतात. यात किल्ल्याच्या विविध भागांचे नकाशे, परिसर नकाशा वाचकांना मोलाची माहिती देतात. किल्ला कसा पहावा, संवर्धन कसे व्हावे यासाठी स्वतंत्र प्रकरणे समाविष्ट केली आहेत. काही लोक किल्ल्यावरील वास्तू अवशेषांवर स्वतःच्या नावाची किंवा संस्थेच्या नावाची प्रसिद्धी करणाऱ्या प्रयत्नात हमखास दिसून येतात हे या संदर्भग्रंथाचे सुक्ष्मपणे अवलोकन केल्यास दिसून येते. नम्रपणे विनंती आहे की, किल्ल्यावर नावे लिहणे, कचरा करणे यासारख्या कृपया गोष्टी टाळाव्यात.

आकर्षक मुखपृष्ठ, रंगीत प्रकाशचित्रे, उत्कृष्ट नकाशा व माहितीचा खजिना असलेल्या नावीन्य प्रकाशनचा श्री.राहुल नलावडे यांच्या लेखनीतील ' दुर्गराज राजगड' वाचकांच्या पसंतीस नक्कीच येईल. प्रा.प्र.के.घाणेकर सरांची प्रस्तावना, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, श्री.पांडुरंग बलकवडे यासारख्या दिग्गज व्यक्तीमत्वांच्या शुभेच्छा ह्या दुर्गराज राजगडला लाभल्या ही या संदर्भग्रंथाची व लेखकाची बलस्थाने म्हटल्यास वावगे नसावे.

- सुरेश नारायण शिंदे, भोर