अंजीर - गुणधर्म व फायदे

उंबराच्या फळासारखेच दिसणारे एक औषधी व चविष्ट फळ म्हणजे अंजीर. अंजिराचे झाड बहुतांशी उष्ण प्रदेशात उगवते. उष्ण प्रदेश म्हणजे इराण, टर्की, अरबस्थान आणि आफ्रिका. भारतातही अंजिराचे झाड मुबलक प्रमाणात सापडते. अंजिराच्या झाडास फुल येत नाही.

अंजीर - गुणधर्म व फायदे
अंजीर

उंबराच्या फळासारखेच दिसणारे एक औषधी व चविष्ट फळ म्हणजे अंजीर. अंजिराचे झाड बहुतांशी उष्ण प्रदेशात उगवते. उष्ण प्रदेश म्हणजे इराण, टर्की, अरबस्थान आणि आफ्रिका. भारतातही अंजिराचे झाड मुबलक प्रमाणात सापडते. अंजिराच्या झाडास फुल येत नाही. 

अंजिरास संस्कृत भाषेत रामोदुंबरिकाफल, हिंदीमध्ये अंजीर, इंग्लिश मध्ये फीग ट्री तर लॅटिन भाषेत फायकस केरिका असेही म्हणतात.

झाडाची उंची दहा फुटापेक्षा कमी असते व पाने मोठी असतात. अंजिराच्या कच्च्या फळांची भाजी पूर्वी केली जात असे. अंजिराचे फळ पिकले की त्याचा मुरंबा तयार केला जातो.

अंजीर या फळाची ख्याती त्याच्या पित्तशामक व रक्तवृद्धक गुणांमुळे आहे. ज्यांना रक्तक्षय आहे त्यांनी अंजिराचे फळ सकाळी खाल्यास रक्तवाढीसाठी खूप फायदा होतो. थंडीच्या दिवसांत अनेकदा तोंड किंवा जीभ फुटण्याचे प्रमाण वाढते तेव्हा अंजिराच्या पानाची राख घासल्यास त्वरित आराम मिळतो.

आपल्याकडे सुके अंजीर पूर्वी अरब देशांतून यायचे. अंजीर हे फळ रक्तदोष, दाह, पित्त व वायू यांचा नायनाट करते. 

पिकलेला अंजीर सोलून रात्री खडीसाखरेच्या भुकटी मध्ये ठेवला आणि सकाळी खाल्ला आणि असे जास्तीत जास्त १५ दिवस केले तर शरीरातील उष्णता बाहेर पडून रक्तवाढ होते. 

सुक्या अंजिराचे तुकडे आणि बदामाचे गर गरम पाण्यात भिजवून खडीसाखरेची पूड, वेलची दाणे पूड, केशर, चारोळी, पिस्ते, बेदाणा एकत्र करून गायीच्या तुपात ८ दिवस ठेवावी आणि रोज सकाळी दोन चमचे घ्यावे ज्याने शरीर बळ वाढते. अंजीरातून गोरख चिंचेचे दळ रोज सकाळी सेवन केल्यास दम्यावरही आराम पडतो असे म्हटले जाते. गळ्यात टॉन्सिल्सने सूज आल्यास सुक्या अंजीराचा काढा करावा आणि त्याच्या गुळण्या केल्यास आराम मिळतो.

अंजीर या फळाचे असे नानाविध गुणधर्म व उपाय आहेत. आपल्या आयुर्वेद शास्त्रात अनेक उपाय आहेत जे दैनंदिन जीवनात खूप उपयोगाचे आहेत.