निजामपूर - एक ऐतिहासिक गावं

निजामपूर शहराची मूळ वस्ती तळेआळी परिसरात झाली असावी कारण याच परिसरात मराठेशाहीतला तलाव, गणपती मंदिर, एक प्राचीन भग्न मंदिर आणि मराठा वीराची समाधीशिळा पाहायला मिळते. श्री.रामजी कदम

निजामपूर - एक ऐतिहासिक गावं
निजामपूर

राजधानी रायगडपासून मुंबई, चौल, जंजिरा, देवघाटमार्गे पुण्याकडे जाताना छत्रपती शिवरायांच्या काळात महत्वाचं लष्करी ठाणं म्हणजेच आत्ताचं निजामपूर.

या शहरवजा गावाचा उल्लेख  जाॅन फ्रायर नावाचा इंग्रज प्रवासी निशामपोर असा करतो. जानेवारी १६८४ मध्ये निजामपूर लष्करी तळावर हल्ला करून मोगली सरदार शहाबुद्दीन खानाने या गावाचं नामांतर केलं असल्याची शक्यता वाटते. निजाम उल मुल्क या त्याच्या बापाच्या पदवीदर्शक नावावरून निजामपूर हे नाव पडलं असं काहींचं मत आहे.

निजाम म्हणजे त्या परिसराचा व्यवस्थापक. त्या परिसराचा (महालाचा) व्यवस्थापक जिथं राहतो त्या गावाला निजामपूर असं नाव दिल्याचं जास्त संयुक्तिक वाटतं. निजाम हा कुणी व्यक्ती नसून महालाचा कारभारी उर्दू शब्दांत उल्लेख केला जातो.

निजामपूर शहराची मूळ वस्ती तळेआळी परिसरात झाली असावी कारण याच परिसरात मराठेशाहीतला तलाव, गणपती मंदिर, एक प्राचीन भग्न मंदिर आणि मराठा वीराची समाधीशिळा पाहायला मिळते. अगदी कालपरवापर्यत ब्रिटिशकालीन घरेसुध्दा इथं पाहायला मिळत असत.

शहरात तळे आळी, नवेनगर, ब्राह्मण आळी, गुरव आळी, शिर्के आळी, सोनार आळी, समर्थनगर, सरेकर आळी, खारकांडी मोहल्ला, वरचा मोहल्ला, रोहिदास नगर, मातंगवाडा , बौध्दवाडा असे प्रामुख्याने विभाग पडतात. अठरापगड जाती धर्माचे बहुजन समाज बांधव इथं राहत असून धार्मिक जातीय सलोखा टिकवून आहेत.

निजामपूर गावचं ग्रामदैवत श्रीसोमजाई देवी मंदिर आवारात गेल्यानंतर तिथल्या प्राचीनत्वाची जाणीव होते. मंदिराच्या पूर्वेला असलेली पाण्याची पुष्करणी म्हणजे बारवकलेचा उत्तम नमुना पाहायला मिळतो. नंदा बारव प्रकारातल्या ह्या पुष्करणीतलं पाणी देवीच्या नित्यपूजेसाठी वापरलं जात असे. सरेकर आळीतलं श्री ज्ञानेश्वर मंदिर, मुख्य बाजारपेठेतलं हनुमान मंदिर, सोनार आळीतलं लक्ष्मीनारायण मंदिर, गुरव आळीतलं श्रीविष्णू मंदिर, तळ्याकाठावरील गणपती मंदिर, मातंगवाड्यातलं मरीआई मंदिर, मुस्लीम मोहल्ल्यातील मशीद, संत रोहिदास नगरमधलं गणपती मंदिर, बौध्दवाड्यातील बुध्द विहार इतकी धार्मिक स्थळं म्हणजे निजामपूर शहराचं ऐतिहासिक महत्व अधोरेखित करतात.

मराठा कालखंडात बांधलेल्या याच तलावाच्या परिसरात १६७५ मध्ये रघुनाथपंत, अण्णाजी दत्तो यांची इंग्रज वकील सॅम्युअल ऑस्टीनशी भेट झाल्याचा संदर्भ सापडतो. तर फेब्रुवारी १६६१ मध्ये उंबरखिंडीच्या अभूतपूर्व पराक्रमानंतर दस्तुरखुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी निजामपूरवर हल्ला करून जिंकल्याचा उल्लेख बखरीमध्ये सापडतो.

अगदी मागील काही वर्षांपूर्वी इथल्या नागरिकांना याच तलावाजवळ शिवराई नाणी सापडली होती. हेन्री ऑक्झेंडन हा इंग्रज वकील राज्याभिषेक सोहळ्याला चौल-अष्टमी-निजामपूर-हरवंडी-घरोशीवाडी मार्गे पाचाडला गेल्याचे रोजनिशीमध्ये लिहून ठेवतो.

महाराष्ट्रातले पहिले बिनविरोध आमदार होण्याचा बहुमान मिळालेले आमदार रामभाऊ महाळुंगे यांच्या वास्तव्याने निजामपूर शहराचा दर्जा एकेकाळी खूप वरचा होता. १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात भूमिगत होऊन ब्रिटिशांच्या हाती न लागलेले स्वातंत्र्यसैनिक धनजी भिकू मोदी याच गावचे सुपुत्र. साने गुरुजी यांच्यासारख्या थोर व्यक्तिमत्वापासून बॅरिस्टर ए.आर. अंतुलेंसारख्यांचा सहवास लाभलेल्या धनजीभाईंनी निजामपूर शहरातच नव्हे तर आसपासच्या खेडेगावांसाठी अमूल्य योगदान दिले. बिरोदा या पाणीसाठ्याच्या ठिकाणापासून संपूर्ण गावात पाणीयोजना आणणं, बोरवाडी आणि विळे येथील शैक्षणिक संस्थाना भरीव देणग्या देणं हे केलंच परंतु ब्रिटिश सरकारच्या विरोधात माणगाव तहसीलदार कार्यालयावर त्याकाळी काढलेल्या भव्य निषेध मोर्चाचं नेतृत्व सुध्दा धनजीभाईंनी केलं होतं.

निजामपूर शहराने हिमालयाएवढी माणसं पाहिली आहेत.  ग.रा.मेथा विद्यालयाचे मुख्याध्यापक यशवंत मराठे सर, आफ्रिकेला राहूनही गावच्या विकासासाठी भरीव योगदान देणारे हाजी ताहीर उस्मान जालगावकर,  सरेकर आळीमध्ये राहून संपूर्ण विभागामध्ये वारकरी सांप्रदायाची धुरा सांभाळणारे ह.भ.प.ल.स.बढे महाराज अशी कितीतरी नावे घेता येतील.

आजमितीस विविध राजकीय पक्षांच्या माध्यमातून ग्रामसचिवालय , बसथांबा , अंतर्गत सिमेंट रस्ते , पाणीपुरवठा योजना , प्राथमिक  आरोग्य केंद्राजवळच्या इमारती सुशोभिकरण आणि मूलभूत सुविधा म्हणून नव्याने सार्वजनिक शौचालयाचं बांधकाम ग्रामपंचायत कार्यालयाच्या कंपाऊंडबाहेर करण्यात आलंय.

सन १८६७ पर्यत निजामपूर हे माणगाव उपविभागाचं मुख्यालय होतं. तर्फ निजामपूर असं संबोधलं जात असे. याचाच अर्थ निजामपूर शहराच्या अखत्यारीत त्याकाळी किमान ६० ते ७० गावांचा समावेश होता म्हणून आजही कोशिंबळे तर्फ निजामपूर, मुठवली तर्फ निजामपूर, वाकी तर्फ निजामपूर असं वाचायला मिळतं.

निजामपूरपासून हाकेच्या अंतरावर  असलेल्या मांडवकरवाडीच्या अलीकडे भातशेतीला लागूनच अकराव्या शतकातील गणपती मंदिर आवर्जून पाहण्यासारखं आहे. हेमाडपंथी शैलीतलं बांधकाम परंतु आतील गणपतीबाप्पाची मूर्ती मात्र सतराव्या शतकातली असावी. खरं म्हणजे निजामपूर  गावची ओळख किंवा वैशिष्ट्य दाखवायचं असेल तर हे जागृत मंदिर बघायलाच पाहिजे.

विकासाच्या वाटेवर असलेल्या निजामपूरमध्ये जवाहर नवोदय विद्यालय ही एक उत्तम शैक्षणिक संधी उपलब्ध झाली आहे. पूर्वीची जुनी बाजारपेठ आत्ता दिघी पुणे रस्त्यालगत सरकली आहे. डाॅ.प्रकाश पाटसकरांसारखे अनुभवी डाॅक्टर चार दशकं वैद्यकीय सेवा देत आहेत. 

पूर्वेला दूरवर दिसणारा किल्ले मानगड, पश्चिमेला पाणस्पे या जुन्या शिवकालीन गावचा परिसर, दक्षिण दिशेला गवळी समाजाची वस्ती असलेल्या तीन वाड्या आणि उत्तरेला कुंभार्तेपर्यतचा परिसर अशा या काॅस्मोपाॅलिटन शहरामधून बाहेर पडण्याअगोदर मोनीच्या हाॅटेलातली चहा आणि एसटी कॅन्टीनमधल्या नाडकरांच्या हाॅटेलच्या  पॅटीसची चव जिभेवर रेंगाळत असतानाच निजामपूरचा निरोप घेत असतात.

- श्री.रामजी कदम (बोरवाडी माणगाव रायगड)