डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भारतीय घटनेचे शिल्पकार

भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र कायमच प्रेरणादायी आहे. त्या काळातील अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून समाजासमोर व देशासमोर एक आदर्श निर्माण करणारे बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक द्रष्टे नेतृत्व.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भारतीय घटनेचे शिल्पकार

Marathi Buzz Shop

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

Marathi Buzz Shop

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

बाबासाहेबांचे मूळ गाव पूर्वीच्या महाड प्रांतातले व सध्याच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे हे छोटेसे गावं. बाबासाहेबांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आजोबांचे नाव मालोजी होते. बाबासाहेब यांचे वडील रामजी हे लष्करात सुभेदार या पदावर होते. बाबासाहेब यांचे मूळ नाव भीमराव असे होते. रामजी यांचे चौदावे अपत्य म्हणजे बाबासाहेब हे असल्याने बाबासाहेब स्वतःचा उल्लेख विनोदाने चौदावे रत्न असा करीत.

शिक्षणासाठी त्यांनी मुंबईच्या एल्फिस्टन हायस्कुलमध्ये प्रवेश घेतला. सुरुवातीस बाबासाहेबांना संस्कृत भाषा शिकण्याची ओढ होती व यासाठी त्यांनी शालेय अभ्यासक्रमात संस्कृत निवडण्याचे ठरविले मात्र त्या वेळच्या सरकारी असलेल्या एल्फिस्टन हायस्कुल मधील संस्कृत भाषेच्या शिक्षकाने त्यांना संस्कृत भाषा शिकवण्यास नकार दिला यामुळे नाईलाजास्तव बाबासाहेबांना फारशी भाषा निवडणे भाग पडले. 

संस्कृत भाषा शिकवण्यास शिक्षकांनी नकार देऊनही बाबासाहेबांनी स्वप्रयत्नांवर संस्कृत भाषेवरही प्रभुत्व मिळवले. मुंबईत त्यांनी कला या विषयाची पदवी मिळवली. अतिशय हुशार असल्याने त्यांना बडोदा येथील सयाजीराव गायकवाड यांच्या तर्फे सुरु करण्यात आलेली शिष्यवृत्ती प्राप्त झाली. या शिष्यवृत्तीमुळे त्यांना पुढील शिक्षणासाठी अमेरिकेस जाण्याची संधी प्राप्त झाली.

अमेरिकेत बाबासाहेबांनी कोलंबिया या प्रसिद्ध विद्यापीठात प्रवेश घेतला व तेथे मानसशास्त्र व अर्थशात्राचा अभ्यास करून दोनही विषयांत एम.ए. व पी.एच.डी. मिळवली. अमेरिकेतून शिक्षण घेऊन परत भारतात आल्यावर त्यांनी गायकवाड संस्थानाच्या सिव्हिल सर्विस मध्ये प्रवेश घेतला कारण शिष्यवृत्तीचा तसा करार होता. 

मात्र नोकरी करत असताना अनिष्ट अशा जातिभेदाचा अनुभव आंबेडकरांना येऊ लागला. आंबेडकर हे शिक्षणाने व हुद्द्याने देखील सरस असून त्यांच्या हाताखालील कर्मचारी त्यांच्यासोबत जातीभेद करू लागले.

बडोद्यात असे वाईट अनुभव आल्यावर आंबेडकरांनी तेथील नोकरी सोडली व ते मुंबईस आले. मुंबईत त्यांनी सिडनहॅम कॉलेज मध्ये प्राध्यापक म्हणून काम केले आणि कालांतराने वकिलीची पदवी घेण्यासाठी ते इंग्लंडला रवाना झाले. या कामी त्यांना कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांकडून खुप सहकार्य व प्रोत्साहन मिळाले. 

इंग्लंडमध्ये बाबासाहेबांनी इंडिया ऑफिसच्या वाचनालयात अँथ्रोपॉलॉजी व अर्थशास्त्र या विषयाचे वाचन करून संशोधन केले आणि सोबत वकिलीचा अभ्यासही सुरु ठेवला होता. मधील काही दिवस ते जर्मनीच्या बॉन विद्यापीठातही अभ्यासासाठी राहिले होते. प्रचंड अभ्यास व व्यासंग करून बाबासाहेबांनी लंडन युनिव्हर्सिटीची डी.एस.सी. ही पदवी प्राप्त केली. ही पदवी इतकी महत्वाची आहे की खूपच कमी लोक या पदवीचे मानकरी ठरले आहेत.

बाबासाहेबांच्या पदवी ग्रहण समारंभात त्यांचे शिक्षक प्राध्यापक कॅनन यांनी त्यांच्याबद्दल पुढील उद्गार काढले.

'या माझ्या स्वतंत्र बुद्धीच्या व विशेष तर्कशक्ती असलेल्या शिष्यापासून मलाही काही शिकता येण्यासारखे आहे'

लंडन मध्ये पदवी मिळवल्यावर बाबासाहेब पुन्हा एकदा मुंबईस आले. ज्या ठिकाणी त्यांनी प्राध्यापकांचे काम केले त्याठिकाणी मुख्याध्यापकाचे पद मिळावे अशी त्यांची इच्छा होती व तेवढे त्यांचे कर्तृत्वही होते मात्र ती संधी त्यांना प्राप्त झाली नाही यानंतर त्यांनी वकिलीची प्रॅक्टिस सुरु करण्याचे ठरवले. यावेळी वकिलीच्या सनदेसाठी पाचशे रुपये लागणार होते. बाबासाहेबांचे चाहते असलेले दादा केळुस्कर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पैसे जमा केले व बाबासाहेबांनी सनद प्राप्त केली.

प्राचीन भारतात अस्पृश्यता ही प्रथा प्रचलित नव्हती मात्र मधल्या काळात धर्मशास्त्रात झालेल्या घुसखोरीमुळे जातीयवाद व अस्पृश्यता अशा अनिष्ट प्रथा बळावल्या होत्या. कर्मानुसार वर्ण बाजूला राहून जातीनुसार वर्ण पाळणे नित्याचे झाले. या शृखंलेतून बाहेर पडणे त्याकाळी अतिशय कठीण बाब होती व याचा वाईट परिणाम संपूर्ण समाजाला भोगायला लागत होता.

बाबासाहेब हे स्वतः उच्च विद्याविभूषित होते मात्र त्यांनाही या प्रथेचा वाईट अनुभव येऊ लागला यासाठी त्यांनी प्रथम धर्मसुधारणेचा कार्यक्रम हाती घेतला. अस्पृश्याना आपले मूलभूत अधिकार मिळावेत यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न सुरु केले. सर्वात महत्वाचा प्रश्न पाण्याचा होता. महाड येथील चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्याना वापरता येत नव्हते. पाणी हा मानवाचा मूलभूत हक्क आहे तो मिळावा यासाठी त्यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह उभारला. 

यानंतर अस्पृश्याना मंदिर प्रवेश हा खूप मोठा व चांगला कार्यक्रम त्यांनी हाती घेतला. यामध्ये नाशिकच्या काळाराम मंदिरात सर्वांनाच दर्शन घेता यावे हाच सद्हेतू होता.  मात्र अनेकांना ते मानवेंना . हा काळ म्हणजे एक क्रांतिकारी चळवळीचा काळ होता. बाबासाहेबानी अस्पृश्यांच्या हक्कांसाठी अनेक सत्याग्रह या काळात उभारले. 

हाच प्रश्न जागतिक स्तरावर मांडण्यासाठी त्यांनी पहिल्या व दुसऱ्या राउंड टेबल परिषदेस सरकारनियुक्त प्रतिनिधी म्हणून हजर राहिले. दुसऱ्या परिषदेस महात्मा गांधी हे हिंदुराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून हजर होते यावेळी दोघांमध्ये काही तात्विक मतभेदही झाले. यामुळे अस्पृश्यांचा प्रश्न जगासमोर नेऊन आंबेडकरांनी या प्रश्नास खऱ्या अर्थी वाचा फोडली.

भारतामध्ये अस्पृश्यांची लोकसंख्या विपुल असूनही त्यांना राजकीय व सामाजिक बाबतीत योग्य वागणूक मिळत नाही ही खंत आंबेडकरांना होती यासाठी त्यांनी धर्मसुधारणेवर प्रचंड जोर सुरुवातीस दिला मात्र राउंड परिषदेतील अनुभवानंतर धर्मांतर हा एकच पर्याय शिल्ल्क उरला आहे अशी त्यांची भावना झाली. 

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे मुंबई प्रांतिक बहिष्कृत परिषदेत मे १९२४ मध्ये ‘अस्पृश्यतेवर उपाय- देशांतर, नामांतर की धर्मातर’ या विषयावर विवेचन करताना आंबेडकर म्हणाले की, "कोणत्याही धर्माकडे आपण तात्त्विक तसेच व्यावहारिकदृष्ट्याही पाहिले पाहिजे. तात्त्विकदृष्ट्या हिंदुधर्म कोणत्याही धर्मास हार जाणार नाही असे माझे मत आहे. नव्हे कोणत्याही धर्माहून तो श्रेष्ठच गणला जाईल. ‘सर्वाभूती एक आत्मा’ या मूलतत्त्वाप्रमाणे समाज घटना न झाल्याने हिंदू समाजाचे व्यावहारिक स्वरूप किळसवाणे झाले आहे. ज्या धर्मात माणसाला माणुसकी नाही तो धर्म काय कामाचा? आपण धर्मत्याग केला तर जे हिंदू लोक आपला तिरस्कार करतात तेच आपल्याला मान देतील. आपण आज आहोत तसे बहिष्कृत असण्याऐवजी एका मोठ्या समाजाचे अंग होऊन काळ न लागता आपली आपण उन्नती करून घेऊ." आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिक जवळील येवला येथे धर्मांतराची घोषणा केली.

आंबेडकरांवर मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून भारतीय संविधानाच्या निर्मितीची जबाबदारी सोपवली गेली. याशिवाय संविधान सभेच्या मूलभूत अधिकार समिती, अल्पसंख्यांक उपसमिती, सल्लागार समिती, ध्वज समिती, संघराज्य अधिकार समिती, संघराज्य घटना समिती व प्रांतिक घटना समिती या समित्यांचे सदस्य म्हणूनही आंबेडकरांनी काम केले. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत मोठा सहभाग असल्यामुळे आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार किंवा भारतीय संविधानाचे निर्माते म्हटले जाते.

नागपूर व चंद्रपूर येथील येथून आंबेडकर दिल्लीला परतले. त्यानंतर काही आठवड्यात २० नोव्हेंबर १९५६ मध्ये ते नेपाळमधील काठमांडूला वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट च्या चौथ्या परिषदेस हजर राहिले. तेथे त्यांनी बुद्ध की कार्ल मार्क्स या विषयावर भाषण केले. त्यात त्यांनी भगवान बुद्धाचा मार्ग मार्क्स पेक्षा श्रेष्ठ आहे, ज्यात प्रेम, न्याय, बंधुत्व, विज्ञानवाद असून तो शोषण समाप्त करू शकतो असे सांगितले. आपल्या परतीच्या प्रवासात त्यांनी बनारसमध्ये दोन भाषणे दिली. दिल्लीमध्येही त्यांनी विविध बौद्ध समारंभांत भाग घेतला. त्यानंतर त्यानी राज्यसभेच्या अधिवेशनात भाग घेतला आणि आपल्या भगवान बुद्ध आणि कार्ल मार्क्स या पुस्तकाचे शेवटचे प्रकरण लिहून पूर्ण केले. ५ डिसेंबरच्या सायंकाळी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या प्रास्ताविक आणि परिचय या दोन प्रकरणांच्या प्रती आणून त्यांनी रात्री त्यांची तपासणी केली. दुसऱ्या दिवशी पहाटे १२.१५ वाजता ६ डिसेंबर इ.स. १९५६ रोजी दिल्लीला निवासस्थानी त्यांचे निधन (महापरिनिर्वाण) झाले. त्यावेळी त्यांचे वय ६४ वर्ष आणि ७ महिन्याचे होते. दिल्लीहून विशेष विमानाने त्यांचे पार्थिव मुंबईला आणण्यात आले. दादर येथील चैत्यभूमीत एकूण १५ लाखाहून अधिक शोकमग्न अनुयायांच्या उपस्थितीत बाबासाहेबांवर अंत्यविधी करण्यात आले. 

बाबासाहेबांना वाचनाची प्रचंड आवड होती. मुंबईत दादर येथे असलेली राजगृह ही इमारत बाबासाहेबांनी केवळ वाचनाच्या आवडीमुळे बांधली व तेथे भव्य वाचनालय निर्माण केले. बाबासाहेबांचे चरित्र एका लेखात नक्कीच सामावण्यासारखे नाही मात्र बाबासाहेबांच्या चरित्रातील एक अंश देखील आपण आपल्या आयुष्यात प्रत्यक्षात आणला तर एक मानव म्हणून आपला आदर्श कसा स्थापित करावा याचे ज्ञान नक्कीच होईल.