चंद्र - पृथ्वीचा उपग्रह

खगोलीय पिंडांची निर्मिती आणि उत्क्रांती या गोष्टींबद्दल चंद्राच्या अभ्यासाने मौल्यवान माहिती मिळाली आहे.

चंद्र - पृथ्वीचा उपग्रह

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

सूर्यमालेतील काही ग्रहांना स्वतःचे असे काही उपग्रह आहेत त्याचप्रमाणे आपल्या पृथ्वीस सुद्धा एक उपग्रह आहे व तो म्हणजे चंद्र. चंद्र हा पृथ्वीचा एकमेव उपग्रह असून त्याचे अस्तित्व हे शतकानुशतके मानवास प्रभावित करत आले आहे व या चंद्राचा अभ्यास करण्यासाठी आधुनिक युगात विविध देशांकडून मोहिमा आखण्यात आल्या.

चंद्राचे खगोलीय शरीर जरी पृथ्वीसारखे सजीव नसले तरी चंद्राच्या अस्तित्वास वैज्ञानिक आणि सांस्कृतिक महत्व आहे. वर सांगितल्याप्रमाणे चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह असून तो पृथ्वीपासून अदमासे ३८४४०० किलोमीटर अंतरावर फिरत असतो. चंद्राचा पृष्ठभाग हा खड्डे, पर्वत आणि उजाड अशा मैदानांनी व्यापला आहे. पृथ्वीवर जसे वातावरण आहे तसे चंद्रावर नाही अर्थात चंद्रावर हवा किंवा हवामान नाही त्यामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर सकाळी प्रचंड उष्णता तर रात्री गोठवणारी थंडी असते.

जगाच्या इतिहासात चंद्राने मानवी धर्म, संस्कृती आणि पौराणिक कथांमध्ये महत्वाची भूमिका निभावली असून त्याच्या सौम्य अशा तेजाने अनेक कवी, कलाकार, लेखक यांच्यावर चंद्राचा मोठा प्रभाव आहे व तो अनेक कथा व कवितांमधून व्यक्त झाला आहे. चंद्र हा ग्रह प्रेम, गूढ आणि मनाशी संबंधित आहे. चंद्राच्या कलेने पारंपरिक कृषी पद्धतीस मोलाचे मार्गदर्शन केले असून विविध धर्मातील सणांचा चंद्राशी जवळचा संबंध आढळतो.

वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा चंद्र हा आजही संशोधनाचा विषय आहे. खगोलीय पिंडांची निर्मिती आणि उत्क्रांती या गोष्टींबद्दल चंद्राच्या अभ्यासाने मौल्यवान माहिती मिळाली आहे. साठ व सत्तरच्या दशकातील अपोलो मोहिमांमुळे मानवाने चंद्रावर पाय ठेवण्याची किमया साधली ज्यामुळे चंद्रावरील वस्तूंचे नमुने गोळा करणे आणि त्यांवर प्रयोग करणे शक्य झाले. 

अपोलो मोहिमांनी चंद्रावरील निर्जीव वातावरणाचा शोध लावलाच मात्र त्यावरील प्राचीन ज्वालामुखीच्या क्रियाकलापांचा पुरावा सुद्धा यानिमित्ताने मानवास मिळाला.

चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाने पृथ्वीच्या भरती व ओहोटीवर परिणाम होतो हे सुद्धा सिद्ध झाले आहे व ही गोष्ट पृथ्वीच्या समुद्री परिसंस्था आणि जलवाहतुकीसाठी महत्वाची आहे. चंद्राच्या उपस्थितीमुळे पृथ्वीचा अक्षीय झुकाव स्थिर होतो आणि पृथ्वीवरील जीवनासाठी अनुकूल असे स्थिर हवामान चंद्राच्या अस्तित्वामुळे प्राप्त होते. चंद्र हा पृथ्वीसाठी एक वैश्विक ढाल म्हणून सुद्धा कार्य करतो कारण अंतराळातील हानिकारक बदल पृथ्वीवरील जीवसृष्टीस बाधक ठरू शकते व चंद्र या बाधांना पृथ्वीपासून दूर ठेवण्यास मदत करतो म्हणून चंद्रास पृथ्वीचा भाऊ असे सुद्धा म्हटले जाते आणि लहान मुलांसाठी पृथ्वी ही आई तर चंद्र हा त्यांचा मामा असतो.

गेल्या काही वर्षांत चंद्रावर वसाहत करण्यासाठी अनेक देश प्रयत्न करीत आहेत. अंतराळ संशोधन संस्था आणि काही खाजगी संस्था चंद्रावर तळ स्थापन करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत जेणेकरून पुढील काळातील अंतराळ संशोधनासाठी प्रक्षेपण भूमी म्हणून चांद्रभूमीचा वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

चंद्र हा तुलनेने इतर ग्रहांपासून जवळ असल्याने व त्यामध्ये अनेक वैज्ञानिक शोध लागण्याची शक्यता असल्याने इतर ग्रहांवर मानवी पाऊल टाकण्याची पूर्वतयारी म्हणून चंद्राकडे मोठ्या आशेने पाहिले जाते.

खऱ्या अर्थी चंद्र त्याचे मंत्रमुग्ध सौंदर्य आणि वैज्ञानिक महत्व यामुळे मानवासाठी आकर्षणाचा विषय बनला आहे. कला व साहित्यापासून ते वैज्ञानिक शोधांसाठी चंद्र आपल्या जीवनात महत्वाची भूमिका बजावतो. रात्रीच्या आकाशात चंद्राकडे पाहिल्यावर त्याची तेजोमय उपस्थिती आणि चंद्राच्या अस्तित्वाचा पृथ्वीस व येथील जीवनास झालेल्या असंख्य फायद्यांचा विचार केल्यावर पृथ्वीच्या या भावाची प्रशंसा करणे भाग पडते.